सगळेच जर ओबीसीत आले तर आरक्षण कुणाला द्यायचं : भुजबळ
20-Nov-2023
Total Views | 61
मुंबई : सगळेच जर ओबीसीत आले तर आरक्षण कुणाला द्यायचं, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना भुजबळांनी विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवारांना प्रत्त्युत्तर दिले. भुजबळांनी टोकाची भुमिका घेतली असून आम्ही त्यांच्या भुमिकेशी सहमत नाही, असं वड्डेट्टीवार म्हणाले होते. यावर भुजबळांनी जे सोबत राहतील, त्यांच्यासोबत पुढे जाऊ. असा पलटवार केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, "कोणी काय भुमिका मांडली हे मला माहित नाही. मात्र मी मराठा समाजाच्या विरोधात काही बोललो नाही. मी फक्त जरांगे पाटलांना उत्तर दिलं. कारण मागील दोन महिन्यांपासून ते माझ्यावर गलिच्छ भाषेत टीका करत होते. काही लोकांनी तर जाळपोळ, दगडफेकही सुरू केली होती. त्यामुळे त्यांच्यावर भाष्य करणं गरजेच होतं. मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही माझी आणि सगळ्यांचीच इच्छा आहे. परंतु मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण न देता वेगळं आरक्षण द्यावं. या भुमिकेशी सर्व सहमत आहेत."
"मी काय टोकाची भूमिका मांडली, हे विजय वडेट्टीवार यांनी मला सांगावं. मनोज जरांगेंनी तुम्हाला शिव्या घातलेल्या नाहीत, त्यांनी मला शिव्या दिल्या होत्या. त्यामुळे मी त्यांच्यावर बोललो. जरांगे यांनी १४ सभा घेतल्यानंतर मी एक सभा घेतली. मी टोकाची भूमिका कुठे घेतली? मला कोणी वैयक्तिकरित्या बोलत असेल तर मी प्रत्युत्तर देणारच. माझी भूमिका सगळ्यांना टोकाची वाटत आहे, मात्र मनोज जरांगे नक्की काय बोलत आहे, ते सगळ्यांनी पाहावं. त्यांनी कितीही आक्रमक बोललं तरी लोकांना ते टोकाचं वाटत नाही. तुमच्या हिंमत असेल तर जरांगेंच्या वक्तव्यावर बोला." असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.