मुंबई : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. बाळासाहेब राजकारणात जितके सक्रिय होते तितकेच त्यांचे कलेवर प्रेम होते आपण सर्वच जाणतो. उत्तम व्यंगचित्रकार असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांना चित्रपटांचे नितांत वेड होते. चित्रपट क्षेत्रात खरंतर पहिल्यांदा हस्तक्षेप असा बाळासाहेबांनी दादा कोंडकेंच्या 'सोंगाड्या'मुळे केला. तो कसा जाणून घेऊयात...
दादांच्या 'सोंगाड्या'मुळे बाळासाहेबांचा चित्रपट क्षेत्रात पहिल्यांदा हस्तक्षेप
शिवसेना पक्षाची स्थापना होऊन चार वर्षं लोटली होती. मराठीचा मुद्दा घेत शिवसेना विविध क्षेत्रात शिरकाव करत होती. मात्र, मनोरंजन क्षेत्राकडे बाळासाहेब ठाकरेंची अजून नजर गेली नव्हती. अशातच १९७१ साली अभिनेते-दिग्दर्शक दादा कोंडके यांचा 'सोंगाड्या' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे तुफान चालू लागला. याच चित्रपटाच्या अनुषंगाने घडलेल्या एका घटनेनं शिवसेनेने आणि पर्यायाने बाळासाहेबांनी चित्रपटक्षेत्रात पहिल्यांदा हस्तक्षेप केला.
'सोंगाड्या'च्या प्रदर्शनावेळी वाद झाला होता. कारण होतं अभिनेते देवानंद यांचा 'तेरे मेरे सपने' हा चित्रपटही नेमका त्याचवेळी प्रदर्शित झाला होता. त्यामुळे मुंबईतल्या दादरमधल्या कोहिनूर चित्रपटगृहाने दादा कोंडकेंचा 'सोंगाड्या' चित्रपट लावण्यास नकार दिला होता. मग दादा कोंडके यांनी थेट चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी बाळासाहेब ठाकरेंकडे धाव घेतली. मराठी चित्रपटाला जागा देत नाही म्हणून बाळासाहेबांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालत थिएटर मालकाला समज दिली. आणि त्यानंतर सोंगाड्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घातला हे जग जाहीर आहेच.