लखनऊ : उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नोव्हेंबर महिन्यात ७ दहशतवाद्यांना अटक करुन इसिसच्या अलिगड मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. यातील अनेकजण अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याची माहिती पुढे आली आहे.
याप्रकरणी एटीएसकडून १० जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत समाविष्ट असलेल्या आरोपींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असता एटीएसला झारखंडमधील शाहनवाज आणि दिल्लीतील रहिवासी रिजवान अश्रफ यांची माहिती मिळाली.
त्यांना अटक करुन अधिक तपास केला असता शाहनवाज आणि रिझवान हे अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या स्टुडंट ऑफ अलिगड युनिव्हर्सिटी (एसएएमयू)) या विद्यार्थी संघटनेशी संबंधित असल्याचे आढळून आले. वजीउद्दीन, अब्दुल्ला अर्शलान, माज बिन तारिक, अब्दुल समद मलिक, फैजान बख्तियार, अर्शद वारसी, मोहम्मद नावेद आणि रिझवान अश्रफ अशी एसएएमयूच्या इतर सदस्यांची नावे आहेत.
दरम्यान, यापैकी शाहनवाज हा बऱ्याच काळापासून इसिसशी संबंधित असून अलिगडमध्ये तो आपले नेटवर्क तयार करत होता. तसेच मोहम्मद रिजवान अश्रफने एसएएमयूच्या इतर सदस्यांना जिहादसाठी शपथ दिली होती. हे सगळे मिळून आपल्या संघटनेचा विस्तार करत होते. तसेच अलिगड मुस्लीम विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांनाही ते इसिसशी जोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना विविध अॅपद्वारे जोडले जात असल्याची माहिती मिळाली आहे.
रामपूर, कौशांबी, संभल, प्रयागराज, लखनऊ आणि अलिगड इत्यादी ठिकाणांवरुन त्यांचे काम सुरु होते. भारताविरुद्ध युद्ध पुकारून इथे शरिया कायदा प्रस्थापित करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सर्व आरोपी छुप्या पद्धतीने शस्त्रे जमा करत असल्याचेही एटीएसच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.