मुंबई : विश्वचषकच्या उपांत्य फेरीत भारत-न्यूझीलंडमध्ये रंगलेल्या सामन्यात भारताने यशस्वी बाजी मारली. क्रिकेटचा हा सामना पाहण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामान्यांसह कलाकारांनी देखील मोठी गर्दी केली होती. दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांनी सामन्याला हजेरी लावली नसली तरी त्यांनी केलेल्या पोस्टमुळे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
अमिताभ बच्चन यांनी भारतृन्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीबद्दल एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, 'जेव्हा मी मॅच पाहत नाही तेव्हा भारताचा विजय होतो.' त्यांचे हे ट्वीट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.
अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने चक्क बिग बींना सल्ला देखील दिला आहे. एका चाहत्याने डोळ्यावर पट्टी बांधलेल्या व्यक्तीचा फोटो शेअर करत म्हटले, 'अमिताभ सर कृपया रविवारी असेच राहा.' तर एका चाहत्याने 'धन्यवाद सर, तुम्ही हा सामना पाहिला नाही' असे लिहिले आहे. तर आणखी एका चाहत्याने 'कृपया फायनल पाहू नका.', असा देखील सल्ला दिला आहे.