गेले ३० वर्ष सेवेत असणारी गोदावरी एक्सप्रेस बंद !

    13-Nov-2023
Total Views |
 
Godavari Express
 
 
मुंबई : गेल्या ३० वर्षांपासून सेवेत असणारी गोदावरी एक्सप्रेस दि. १३ नोव्हें. पासुन बंद करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मनमाड ते मुंबई असा या एक्सप्रेसचा प्रवास होता. या गाडीच्या जागी मध्य रेल्वेने सीएसएमटी ते धुळे ही नवीन ट्रेन सुरु केली आहे. नाशिकहून मुंबईला जाणारे नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी आणि या भागातील सर्वसामान्य प्रवाशांची त्यामुळे मोठी गैरसोय झाली असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. पूर्वीप्रमाणे गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथून सोडण्यात यावी अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रवासी संघटनांनी दिला आहे.
 
कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी ट्रेन क्रमांक 12118 एलटीटी – मनमाड सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबईतून सकाळी 8.35 वाजता सुटायची आणि दुपारी 1 वाजता मनमाडला पोहचायची. ही गाडी नोकरदार, व्यापारी, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होती. या ट्रेन ऐवजी आता मध्य रेल्वेने 12 नोव्हेंबर पासून ट्रेन क्रमांक 11011 / 11012 सीएसएमटी – धुळे एक्सप्रेस सुरु केली आहे. 12 नोव्हेंबरपासून ट्रेन क्रमांक 11011 सीएसएमटी – धुळे एक्सप्रेस सीएसएमटी येथून दुपारी 12 वा. सुटून धुळ्याला रा. 8.55 वाजता पोहचणार आहे. परतीची ट्रेन 11012 धुळे – सीएसएमटी ही धुळ्याहून सकाळी 6.30 वाजता सुटून दुपारी 2.15 वाजता सीएसएमटीला पोहचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड जंक्शन, नांदगाव, चाळीसगाव, जमढा, शिरुड असे थांबे असणार आहेत. या गाडीला 16 एलएचबी डबे असणार आहेत. एक एसी चेअर कार, 13 नॉन एसी चेअर कार ( 5 आरक्षित आणि 8 अनारक्षित ), 1 जनरल सेंकडक्लास कम ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर अशी डब्याची रचना असणार आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.