क्रीडा‘पद्म’

    29-Jan-2023
Total Views |
Awardee of 'Padma Shri

‘पद्म’ पुरस्कार यादीतील क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तेव्हा या खेळाडूंच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून देत क्रीडा क्षेत्र व ‘पद्म’ पुरस्कार यावरील हा लेख. थोडं ‘पद्म’ पुरस्कारांबद्दल..

१९५४ साली केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ आणि ‘पद्मविभूषण’ हे दोन नागरी पुरस्कार जाहीर केले. यातील दुसर्‍याचे अजून तीन भाग केले गेले. तेव्हा त्यांना ’पहिला वर्ग’, ’दुसरा वर्ग’ आणि ’तिसरा वर्ग’ असे ओळखले जाई. पुढे त्या तीन पुरस्कारांना जरा समर्पक आणि मानाचे असे नामकरण केले गेले. दि. ८ जानेवारी, १९५५च्या राष्ट्रपतींच्या अधिसूचनेवरून आज आपण त्या पुरस्कारांना ‘पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ असे ओळखत आहोत.

दरवर्षी जनतेला आवाहन करून ते पुरस्कार कोणाला प्रदान करावेत, याबद्दल लोकांची मतं मागवतात, तसेच स्वतःलाच असा पुरस्कार हवा असल्यास तसेही सूचवायला सांगितले जाते. त्यासाठी शिफारसी मागवल्या जातात. त्याच्यावर सर्वतोपरी विचार करून ते कोणाला द्यावेत, याबद्दल राष्ट्रपतींकडे शिफारस केली जाते. यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली जाते. याचा विचार करून राष्ट्रपतींच्या कार्यालयातील अधिकारी व राष्ट्रपती नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण करून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा केली जाते.

या २०२३च्या पुरस्कारांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना एकूण १०६ ‘पद्म’ पुरस्कार २५ जानेवारीला संध्याकाळी जाहीर झाले आहेत. त्या घोषणेनुसार, नऊ जणांना ‘पद्मभूषण’, सहा जणांना ‘पद्मविभूषण’ आणि ९१ व्यक्तींना ‘पद्मश्री’ जाहीर झाली असून त्यापैकी तीन जणांना क्रीडा या प्रकारात ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्यात येत आहेत. मार्च अथवा एप्रिल महिन्यात त्यांना सन्मानपूर्वक ते प्रदान केले जातील.

क्रीडा क्षेत्रातील ‘पद्म’ सन्मान

क्रीडा क्षेत्रातील ‘पद्म’ सन्मान जाहीर झालेली यंदाची तीन नावे म्हणजे, ’कलरीपयट्टू’चे एस् आर् डी प्रसाद हे केरळचे आहेत. के शांथोयबा शर्मा (Sanathoiba Sharma) हे मणिपूरचे असून त्यांच्या ‘थांग-ता’ या क्रीडा प्रकारातील कार्यासाठी असे या दोघांना सन्मानित केले जात आहे. दिल्लीतील गुरचरण सिंग यांनी क्रिकेटला दिलेल्या त्यांच्या योगदानाची दखल घेत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित करायचं ठरवलं आहे.के. शांथोयबा शर्मा, एस आर डी. प्रसाद आणि गुरुचरण सिंग या तीन सन्मानित क्रीडापटू व क्रीडेबद्दल आपण येथे थोडक्यात समजून घेऊ. या तीघांपैकी दोघेजण हे पारंपरिक देशी, पौराणिक काळातील क्रीडा प्रकाराशी निगडित आहेत.

गुरचरण सिंग

दि. २५ मार्च, १९३५ रोजी रावळपिंडी, अटक जिल्ह्यातील गंडकस गावात जन्मलेले गुरचरण सिंग हे १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या वेळी निर्वासित म्हणून पतियाळा येथे आले. त्यांनी पतियाळाच्या महाराजा यादवेंद्र सिंग यांच्या पुढाकाराने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. गुरचरण सिंग हे उजव्या हातानेच फलंदाजी आणि ‘ऑफ ब्रेक’ गोलंदाजी करत. ३७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये खेळलेले गुरचरण सिंग यांंनी प्रतिनिधित्व केलेल्या संघांमध्ये पतियाळा, पतियाळा ब्ल्यू, पूर्व पंजाब राज्य संघ, दक्षिण पंजाब आणि रेल्वे यांचा समावेश आहे. गुरचरण सिंग यांनी पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेतून प्रशिक्षकाचे शैक्षणिक प्रमाणपत्र संपादन केले आणि ते तिथे प्रशिक्षक झाले. त्यानंतर ते नवी दिल्ली येथील (SaI) ’भारतीय क्रीडा प्राधिकरण’च्या केंद्रात मुख्य प्रशिक्षक झाले. १९७७ ते १९८३ दरम्यान उत्तर विभागाचे प्रशिक्षक, १९८५ मध्ये मालदीवचे मुख्य प्रशिक्षक आणि १९८६ ते १९८७ या काळात भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांच्या काही उल्लेखनीय प्रशिक्षणाच्या जबाबदार्‍या सांभाळल्या. दिल्लीतील त्यांच्या कार्यकाळात गुरचरण सिंग हे १९८४च्या शीखविरोधी दंगलीतून सुदैवाने थोडक्यात वाचलेले आहेत.



गुरचरण सिंग हे शारीरिक शिक्षण देणार्‍या राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय महाविद्यालय आणि संयुक्तपणे सुरू करण्यात आलेल्या ‘पेस बॉलिंग अकादमी’चे संचालकपद त्यांनी सांभाळले होते. ग्वाल्हेरमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या संचालक मंडळात ते होते. गुरचरण सिंग यांनी दिल्ली ‘ब्लूज’ हा कल्ब की जो पूर्वी ‘वेटरन्स क्लब’ म्हणून ओळखला जात असे आणि ‘नॅशनल स्टेडियम क्रिकेट सेंटर’ नावाचे दोन क्रिकेट क्लबमध्येे ते कार्य करतात. हे क्लब क्रिकेटपटूंना प्रत्येक दोन वर्षांनी इंग्लंडला क्रिकेट दौर्‍यावर घेऊन जातात. १०० हून अधिक प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंव्यतिरिक्त, त्यांनी मनिंदर सिंग, सुरिंदर खन्ना, कीर्ती आझाद, विवेक रझदान, गुरशरण सिंग, अजय जडेजा, राहुल संघवी आणि मुरली कार्तिक यांच्यासह १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना प्रशिक्षण दिले आहे. गुरचरण सिंग यांनी दिल्लीतील अनेक शालेय क्रिकेटपटूंना प्रशिक्षण दिले आहे.भारतातील सर्वोच्च क्रीडा प्रशिक्षकांसाठीच्या ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित झालेले दुसरे क्रिकेट प्रशिक्षक असलेल्या गुरचरण सिंग यांना आता भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले आहे.


Shanthoyba Sharma
’थांग ता’..


थांग ता. ’मणिपूर’ राज्यातील ’मिथी’ या जमातीचे लोक ’थांग ता’ हा मर्दानी खेळ खेळतात. हा खेळ तलवार, भाला व काठी या शस्त्रांनी खेळला जातो. ’थांग’ म्हणजे तलवार आणि ’ता’चा अर्थ होतो ’भाला.’ तलवार आणि भाला याच्या साहाय्याने केले जाणारे द्वंद्व.‘थांग-ता’ हा मणिपूरमधील लढाऊ खेळ, हल्लीच्या दशकांत विस्मृतीत गेला होता. वयाने ६८चे असलेले के. शांथोयबा शर्मा यांनी या खेळाला स्वतःला वाहून घेतलं आहे. मणिपूर प्रांतातील ’संस्कार भारती’चे ते अध्यक्षही आहेत. १९७४ साली गुवाहाटी विश्वविद्यालयातून (रॉयल सायन्स) शास्त्र शाखेचे ते पदवीधर आहेत. वयाच्या सातव्या वर्षांपासून या खेळात ते रस घेत असल्याचे बघताच वयाच्या १४व्या वर्षी त्यांना जी गौरकिशोर शर्मा व जी साना शर्मा या मामांनी/काकांनी या धार्मिक कला/क्रीडा रुपी पारंपरिक खेळाची दिक्षा दिली आहे.

विस्मृतीत गेलेल्या भारतीय ऐतिहासिक लढाऊ कलेचे पुनरुज्जीवन होण्यास मदत होईल, या दृष्टीने सध्याच्या केंद्र सरकारने खेळांच्या विकासासाठी चालू केलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत असलेल्या ’खेलो इंडिया’मध्ये या ‘मार्शल आर्ट्स’मधील क्रीडा प्रकाराचा अंतर्भाव करण्यात आल्याचे आपल्याला आढळेल.


ब्रिटिश होते घाबरून...

स्वातंत्र्यपूर्व म्हणजे आज अंदाजे ४०० वर्षांपूर्वी मणिपूरच्या राजा-महाराजांनी जी कला खेळाच्या स्वरुपात विकसित केली होती, ती आज आता राज्य, राष्ट्रीय एवढेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारताना दिसत आहे. १७व्या शतकात या ‘मार्शल आर्ट्स’चा उपयोग मणिपूरच्या राजांनी उचलून धरला.स्वातंत्र्यपूर्व काळात या कलेला विकसितच होऊ दिले जात नव्हते. ब्रिटिशांना त्या कलेची भीती वाटत असे. कारण, जर ही कला नंतर वृद्धिंगत होत गेली, तर उद्या हे हिंदुस्थानी योद्धे त्याचा वापर आपल्याशी लढण्यासाठी करतील, असे असूनदेखील मणिपुरी युवकांनी त्यात रस घेत त्या कलेचा एक शास्त्रशुद्ध क्रीडाप्रकार म्हणून विकास घडवून आणला. आज हा खेळ ‘खेलो इंडिया’च्या खेळांच्या यादीत समाविष्टदेखील झाला आहे.



S. R. D. Prasad's game

कलरीपयट्टू..


हा वरती आपण जो क्रीडा प्रकार बघितला त्याच जातकुळीतला अजून एक क्रीडा प्रकार म्हणजे ’कलरीपयट्टू’. काही जणं त्याला फक्त ‘कलारी’ नावाने संबोधतात. ब्रिटिशांना नकोसा असलेला हा खेळदेखील नंतर केरळी लोकांनी वाढवला उन्नत केला.
‘कलारीपयट्टू’ हा शब्द दोन मल्याळम शब्दांचा संयोग आहे - कलारी (प्रशिक्षण मैदान किंवा रणांगण) आणि पयट्टू (मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण), ज्याचे साधारणपणे युद्धभूमीच्या कलांमध्ये सराव असे भाषांतर केले जाते.या क्रीडा प्रकाराबाबत एस् आर् डी प्रसाद हे एक दंतकथा सांगतात.

पौराणिक संदर्भ


त्या पौराणिक कथेनुसार, परशुरामाने ही कला शिवाकडून शिकून घेतली आणि केरळला समुद्राच्या तळातून वर आणल्यानंतर लगेचच केरळच्या मूळ रहिवाशांना ती शिकवली असे मानले जाते. मल्याळममधील एक गाणे परशुरामाच्या केरळच्या निर्मितीचा संदर्भ देते आणि शत्रूंचा नाश करण्यासाठी केरळमधील पहिल्या २१ कलारीपयट्टू गुरूंच्या सूचनेसह संपूर्ण केरळमध्ये पहिल्या १०८ कलारींच्या स्थापनेचे श्रेय त्याला देते.

‘कलारीपयट्टू’ या क्रीडा प्रकाराच्याबद्दल मीनाक्षी अम्मा, वडाकारा येथील ७३ वर्षीय गुरुक्कल आणि चवक्कड येथील गुरुक्कल शंकर नारायण मेनन चुंदाइल यांना भारत सरकारने आधीच ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यात आता आणखीन एकाची म्हणजे एस् आर् डी प्रसाद यांच्या रुपाने आज भर पडत आहे.


dand prahar


काठी आणि क्रीडा..


बंगाली लोकांचा ’लाठी खेला’, परशुरामाच्या पौराणिक काळातील आणि नंतर शिवरायांच्या काळातील ढालीबरोबर तलवार, लाठी-काठी, दांडपट्टा, असे पारंपरिक खेळ या काठीच्या साहाय्याने आपण खेळत असतो. लाठीचा वापर आपण नियमितपणे संघ शाखेत करत असतो. त्याच काठीचा म्हणजे दंडाचा वापर आपण नुकताच केला. दि. १६ डिसेंबर, १९७१ रोजी भारतीय सेनेच्या पराक्रमापुढे ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करली होती. या दिवसाला आपण ‘विजय दिन’ म्हणून साजरा करतो. त्या १६ डिसेंबर या दिवशी संघ स्वयंसेवक आपल्या ’दंडा’चा वापर करून भारतीय सैन्यदलाला आदरांजली वाहण्याचा दंड ‘प्रहार दिन’ साजरा करतात. थोडक्यात काय तर ही ’काठी’ भारतभरात सर्वत्र प्रिय असते. आपण ज्या दोघांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, त्यांच्याही क्रीडा प्रकारात म्हणजे ‘थांग-ता’ आणि ‘कलरीपयट्टू’ यात काठी’चा वापर विविध प्रकारे केला जातो. जिथे तलवार उपलब्ध नसते तेथे ही ’काठी’च कामी येते.

’स्लॅक पिरियड’


आधुनिक चेंडू फळीचा प्रशिक्षक असो अथवा पौराणिक क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षक असो; २०२३च्या ‘पद्म’ पुरस्कारात क्रीडेतील तीन ’गुरूं’ना स्थान मिळालेल बघून माझ्यासारख्याच्या बरोबर तुमच्यासारख्या क्रीडाप्रेमींना क्वचितच आनंद झाला असेल. पण, गेल्यावर्षी २०२२च्या ‘पद्मश्रीं’च्या यादीत नऊ क्रीडाप्रकार होते त्याची घसरण होऊन यावेळेस तीन झाल्याची खंत तेवढी वाटते. चला आता परत तीनाची चढती भाजणी होऊ देत २०२४ मध्ये म्हणू तीन एकेतीन तीनदुने सहा ... तीन चोक १२ ... कबुल ज्या काळात अंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा होतात. तेव्हा, हा आकडा वाढतो, २०२४ला ऑलिंम्पिक असेल पॅरिसमध्ये आपले खेळाडू उत्तम कामगिरी करतील आणि ते योग्यच आहे. पण, ’स्लॅक’ पिरियड मध्ये असे होता कामा नये. खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातील सगळ्यांनीच आपले ध्येयधोरण बदलले तर हे होऊ शकते. ’स्लॅक पिरियड’ हा प्रकारच नको राहायला. भारतीय हॉकी संघाला आत्ता अशीच एक नामी संधी होती.



पुढील वर्षांतील ‘पद्म’ पुरस्कारांबद्दल त्यांच्यापैकी कोणाचे नामनिर्देशन देता आले असते. पण, नाही झाले तसे. असो. यातूनही काही शिकायला मिळणार असेल. क्रीडा क्षेत्रातील पुरस्कारनंतर येतील त्यात आपण अनेक पुरस्कार मिळवू, पण म्हणून ‘पद्म’ गमवायचं नाही. त्याचे ध्येय वेगळे ठरवायचंय आता आपल्यालाच. नरेंद्र मोदींसारखं सरकार आपल्या पाठीशी असणार आहेच. आता आम्ही सगळे यांना आशीर्वाद देत, अशी इच्छा व्यक्त करू की यावेळेस असलेले गुरूंचे अनेक चेले आणि क्रिकेट, थांग-ता, कलरीपयट्टू यांच्यासारख्याच खो-खो, मल्लखांबसारख्या देशी व अन्य क्रीडा प्रकारातही अनेक गुरू व त्यांचे अनेक शिष्य घडत राहो आणि आपले सरकार त्यांना अनेक पुरस्कार प्रदान करत राहो. केरळच्या मार्शल आर्ट ‘कलारीपयट्टू’ यासहीत सगळ्यांनाच गुरूस्थानी असलेल्या देवाच्या अवताराला आपण मनोभावे ही प्रार्थना करू. ‘ॐ जामदग्न्येय विद्महे महावीराय धीमहि तन्नो परशुराम: प्रचोदयात्॥’




(लेखक माजी हॉकीपटू आणि वनवासी कल्याण आश्रम, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, खेलकूद आयाम प्रमुख, पुणे आहेत.)

-श्रीपाद पेंडसे
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.