नवीन कळवा पूल अद्याप लोकार्पणाच्या प्रतीक्षेत!

सप्टेंबर सरत आला तरी एकही मार्गिका मार्गी लागेना!

    24-Sep-2022
Total Views | 153

kalva bridge
 
 
ठाणे: दररोजच्या वाहतूककोंडीतून ठाणेकरांची सुटका व्हावी, यासाठी कळवा खाडीपुलावर नवीन तिसरा पूल उभारण्यात येत आहे. ठाणे-कळवा दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या या तिसर्‍या पुलाच्या पोलीस आयुक्तालय ते कळवा नाका व ठाणे-बेलापूर रोड या एका मार्गिकेचे काम कोणत्याही परिस्थितीत ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, ऑगस्ट उलटून सप्टेंबर सरत आला तरी अद्याप नवीन कळवा पुलाच्या लोकार्पणाला मुहूर्त मिळालेला नाही.
 
 
ठाणे आणि नवी मुंबईला जोडणार्‍या मार्गावर वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी कळवा खाडीवर 2.2 किमी लांबीचा पूल बांधण्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. कळवा नवीन पुलाच्या निर्माणासाठी ठाणे मनपाने काढलेल्या निविदेनंतर सदरचा उड्डाणपूल विकसित करण्यासाठी 183 कोटी, 66 लाख, 61 हजार, 353 रुपयांची ‘वर्कऑर्डर’ दि. 12 सप्टेंबर, 2014 रोजी काढण्यात आली होती. ‘जे.कुमार’ या खासगी कंपनीला हे काम देऊन 36 महिन्यांत पूल पूर्ण करण्याची निर्धारित मुदत मनपाने दिली होती. मात्र, अद्याप या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नसल्याने एकही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यास मुहूर्त सापडलेला नाही.
 
 
आयुक्त विपीन शर्मा यांनी मार्च महिन्यात मे 2022 मध्ये एकेरी वाहतूक सुरू करण्याचा मानस व्यक्त केला होता, तर तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोंडी फोडण्यासाठी पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी जुलै 2022 मध्ये केली होती, तर ठामपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवींनीदेखील या पुलाची पाहणी करून पुलाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, काम वेळेत पूर्ण न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही माळवींनी दिला होता, तरीही सप्टेंबर सरत आला तरी या पुलावरून वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही.
 
 
ठेकेदारावर ठाणे महापालिकेचा वरदहस्त
 
 
ठाणे खाडीवरील कळवा पुलाचे काम 36 महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत होती, आता ती मुदतदेखील संपुष्टात आली असून ‘वर्क ऑर्डर’ देऊन सात वर्ष उलटली आहेत. मात्र, अद्याप हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. या दिरंगाई प्रकरणी ठेकेदार जे. कुमार यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि या उड्डाणपुलाच्या कामाची सखोल चौकशीची मागणी आता जोर धरू लागला आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121