बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन ११ ऑगस्टपासून न्यू जर्सीत!

    09-Aug-2022
Total Views |

cnv
  
मुंबई: “जगभरातील मराठी बांधव ज्या अधिवेशनाची आतुरतेने वाट पाहतात, ते मराठी मनाला जोडणारे बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर अटलांटिक शहर न्यू जर्सी येथे दि. ११ ते १४ ऑगस्टदरम्यान आयोजित केले जाणार आहे,” अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली. दर दोन वर्षांनी होणारे हे अधिवेशन कोरोनामुळे गेल्या वर्षी होऊ शकले नव्हते.
 
 
मात्र, आता मोठ्या जोशात आणि जल्लोषात साजरे करण्यासाठी बृहन महाराष्ट्र मंडळ सज्ज झाले आहे. या चार दिवसीय अधिवेशनात मराठी मनाला साद घालणारे एकापेक्षा एक असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ज्यात प्रसिद्ध नाटकापासून चर्चासत्रे, पाककृती, नृत्य, नाट्य आणि सांगीतिक स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. एवढेच नव्हे, तर या अधिवेशनात आपल्या आवडत्या कलाकारांनाही भेटता येणार आहे. त्याचप्रमाणे मराठी नाट्य आणि संगीतक्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती या अधिवेशनाचे खास आकर्षण असेल.
 
 
लोकप्रिय मराठी नाटक ‘आमने सामने’ त्याचप्रमाणे सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे या आपल्या आवडत्या कलाकारांचे कार्यक्रम बघण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. विशेष म्हणजे ४० वर्षांनी प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांनी एकत्र अभिनय केलेले नाटक ‘सारखे काहीतरी होतेय’ ही धम्माल कलाकृतीही या अधिवेशनात सादर केली जाणार आहे.
 
 
या अधिवेशनाचा संस्मरणीय समारोप शंकर महादेवन यांच्या सांगीतिक कार्यक्रमाने केला जाणार असल्याची माहितीही जोशी यांनी दिली. या दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत उत्तर अमेरिकेच्या २५ शहरातील स्थानिक कलाकारांची धमाल सादरीकरणेही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.