संघ कार्यालयाची रेकी करणारा दहशतवादी ‘एटीएस’च्या ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2022
Total Views |

nagpur
 
 
 
 
 
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपुरातील महाल येथील केंद्रीय कार्यालय तसेच रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसराची रेकी करून माहिती व छायाचित्र घेण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ‘जैश-ए-मोहम्मद’च्या एका दहशतवाद्याला बुधवारी ताब्यात घेतले आहे.
 
 
 
जम्मू-काश्मीरचा रहिवासी दहशतवादी रईस अहमद असदुल्ला शेख याने १३ जुलै, २०२१ रोजी ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या नेत्याच्या सूचनेवरुन नागपुरातील रा. स्व. संघाच्या केंद्रीय कार्यालय तसेच स्मृती मंदिर परिसराची रेकी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रईस अहमदला जम्मू-काश्मीरमधील पंपोर येथून ग्रेनेडसह अटकदेखील करण्यात आली. यानंतर झालेल्या चौकशीत त्याने नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी केल्याचे उघड झाले होते.
याचदरम्यान, दहशतवादी रईस अहमद असदुल्ला शेख याने रेशीमबाग मैदानातून स्मृती मंदिर परिसर तसेच संकुलाची रेकी केली होती. या सर्व बाबी स्पष्ट झाल्यानंतर त्याला जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ‘प्रॉडक्शन वॉरंट’वर नागपूर ‘एटीएस’ने ताब्यात घेतले आहे. रईस अहमद असदुल्ला शेख हा गेल्या वर्षी जुलैमध्ये नागपुरात आला होता आणि त्याने यादरम्यान इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांचीदेखील रेकी केली होती. त्यानंतर, त्याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली होती.
 
 
 
रईस अहमद १३ जुलै २०२१ रोजी दिल्ली-मुंबई-नागपूर विमानाने नागपुरात आला. त्यानंतर तो सीताबर्डी येथील एका हॉटेलमध्ये थांबला होता. ‘जैश’चा म्होरक्या ओमरच्या सूचनेवरून तो नागपुरात आला होता आणि नागपूरचा स्थानिक सहकारी फोन करुन संपर्क करेल व त्यानंतर सहकार्य करेल, असेही ओमरने त्याला सूचित केले होते. नागपुरात पोहोचल्यानंतर दि. १४ जुलै रोजी रईस अहमद ऑटोमधून ‘गुगल मॅप’चा वापर करीत रेशीमबाग मैदानात पोहोचला. स्मृती मंदिराचे लोकेशनदेखील ओमरने त्याला पाठविले होते. त्याने रेशीमबाग मैदानातून स्मृती मंदिर परिसराचा व्हिडिओदेखील काढला होता व तो त्याने ओमरला पाठविला. पण त्याचा दर्जा व दृश्यता चांगली नसल्याने पुन्हा व्हिडिओ काढण्याचा आदेशदेखील ओमरने दिला होता.
 
 
 
पण, पोलिसांच्या भीतीने त्याने व्हिडिओ न काढता फोन बंद केला आणि ऑटोचालकाला पुन्हा ‘संत्रा मार्केट’ परिसरात तो ज्या हॉटेलमध्ये थांबला त्याठिकाणी पोहोचवून देण्यास सांगितले. त्याठिकाणी तो थांबला आणि १५ जुलै रोजी श्रीनगरला रवाना झाला. यासंदर्भात, ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेविरोधात कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या निर्देशानुसार या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@