उद्गीर येथे संपन्न झालेले ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अतिशय जवळून अनुभवल्यानंतर खरंतर ‘भ्रम’निरासच झाला. साहित्य संमेलनाचे एकंदर वातावरण बघता अस्वस्थताच मनाला स्पर्शून गेली. आपण मनात चित्र कल्पून एखाद्या ठिकाणी मोठ्या अपेक्षेने भेट देतो आणि अपेक्षाभंग झाल्यानंतर आपण स्वतःलाच अनेक प्रश्न विचारु लागतो. ‘भ्रमा’च्या चक्रव्यूहात आपण अडकतो आणि उत्तरापर्यंत पोहोचावे की नाही हादेखील शेवटी ‘भ्रम’च राहतो!
‘माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन॥’
अशी ही आपली मायमराठी अमृताहूनही मधुर आहे, असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आणि याचाच प्रत्यय आपल्याला पावलोपावली येत राहतो. आपल्या भाषेचे वैभव, तिचे ऐश्वर्य एखाद्या माणकाप्रमाणे मुकुटात विलसत राहते आणि अशा या लडिवाळ मराठी भाषेचा जर उत्सव होत असेल, तर त्या उत्सवाला भाषाप्रेमींची अलोट गर्दी जमल्यावाचून राहत नाही. मग तो उत्सव देशाच्याच नाही, तर जगाच्या कोणत्याही भागात असो. आणि याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे दरवर्षी भरणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि या संमेलनात सहभागी होणारे मराठी भाषेवर, संस्कृतीवर, मराठी साहित्य आणि साहित्यिकांवर जीवापाड प्रेम करणारे हजारो भाषाप्रेमी. त्याला, यंदाही लातूर जिल्ह्यातील उद्गीर येथे भरलेले ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अपवाद कसे ठरेल म्हणा? इथे तर साहित्य आणि साहित्यिकांवर प्रेम करणार्या रसिकांची तर गर्दी होतीच. परंतु, या रसिकांमध्येही सर्वाधिक गर्दी आढळली ती मान्यवर राज्यकर्त्यांची. मजेचा भाग असा की, साहित्यिकांपेक्षा साहित्य संमेलनातील त्यांचा (आदरणीय राज्यकर्त्यांचा) उत्साह वाखाणण्याजोगा होता आणि तोदेखील अगदी उद्घाटन समारंभापासून ते सांगता समारोहापर्यंत अखंड-एखाद्या निर्मळ झर्याप्रमाणे खळाळत वाहत होता. इतका की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला व्यासपीठावर (‘व्यास’पीठ की ‘विचार’पीठ हादेखील आता ‘भ्रम’ आहे) या राज्यकर्त्यांचीच मांदियाळी.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत नेमके साहित्यिक कोण आणि हे संमेलन कोणाचे, हा प्रश्न डोके वर काढत होताच. मी लहान असताना जेव्हा आई-वडील आवर्जून संमेलनाच्या गोष्टी सांगायचे, तिथे उपस्थित साहित्यिकांची नावे सांगायचे, तेव्हा फार मनस्वी आनंद होई. एका सभागृहात पुलं खोखो हसवायला असायचे, कुठे माडगुळकर, शांताबाई, दुर्गाबाई, इंदिरा संत असायच्या. कधी वसंत बापट ‘फुंकर’घालून डोळे ओलावत, मिरासदारांची खुमासदारी रंगत, कुठे पाडगावकर ‘प्रेम म्हणजे’ काय ते सांगत, तर कधी कुसुमाग्रजांच्या ‘क्रांतीचा जयजयकार’ सर्वत्र दुमदुमे. परंतु, आता काळाबरोबर या जयजयकाराचे स्वरूप पुरते बदललेले दिसते. अर्थात बदल हीच एकमेव कायमस्वरुपी गोष्ट आहे. आता ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ असा काही आवाज संमेलनात दुमदुमताना म्हणा दरवर्षीच ऐकू येतो.त्यामुळे हा बदल थोडा नवीन आणि आश्चर्यकारक वाटला. पण, आश्चर्याचे तरी कारण काय? राजकारण्यांचे साहित्य संमेलनातील आपल्या भाषणाचे विषयदेखील तितकेच महत्त्वपूर्ण आणि राज्यावर, स्थानिक समस्यांवर भाष्य करणारे होते. सीमाप्रश्न, उद्गीर गावाला जिल्ह्याची मान्यता मिळावी, रस्ते दुरुस्ती या विषयाचे गांभीर्य अधिक. शिवाय या समारोहांना आलेला हजारोंचा जनसमुदायदेखील कोणाचा हेदेखील महत्त्वाचेच! साहित्य वगैरे काय विषय होतच राहतील. या सर्वात, अध्यक्ष महोदयांचा सर्व कार्यक्रमातील उत्साह आणि सहभाग हा तर एखाद्या तरुणाच्या शक्तीला लाजवेल इतका सळसळून वाहणारा होता. बालसाहित्यातून जरी अद्भुतरस गायब झाला असला तरी अध्यक्षमहोदयांचा उत्साह हा अद्भुत होता.
अध्यक्ष म्हणत आहेत तर नक्कीच आपण ‘भ्रमयुगा’त प्रवेश केला आहे, (कदाचित त्यांचे ‘भ्रमयुग’ हे वेगळे आहे आणि माझे वेगळे असावे!) आणि हे मी नाकारणे शक्यच नाही. येथे मला आनंद झाला की, किमान एक तरी व्यक्ती खरे बोलत आहे. (येथे माझ्यासाठी) संमेलनाचे वातावरण पाहता हे विधान करणे वावगे ठरणार नाही. कारण, या संमेलनाच्या साहित्यनगरीत प्रवेश केल्यापासून ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आमचे स्वागत करण्यासाठी येथे होर्डिंग्जवर राज्यकर्त्यांची आणि प्रथितयश कलाकारांची छायाचित्रेच झळकत होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या, भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीत राजकारण्यांचे आणि कलाकारांचे कसे बरे छायाचित्र, हा प्रवेश करताच निर्माण झालेला माझ्या मनातील एक ‘भ्रम.’ कसे असते, आपण अनेकदा एखाद्या ठिकाणी जाणार म्हणजे मनात एक काल्पनिक चित्र रेखाटतो, मी कशी या गोष्टीला अपवाद ठरेन म्हणा?
मराठी भाषेचा मुकुट असलेल्या संमेलनात जाणार म्हणजे त्यातील हिरेदेखील त्याच मुकुटाचे असणार अशी भाबडी आशा मनात होती. म्हणजे काय तर होर्डिंग्जवर राम गणेश गडकरी असावेत, वि. स. खांडेकर, आरती प्रभू, ते नाहीत तर आजच्या युगातील कोणी साहित्यिक असावेत, असा गैरसमज नेमका झाला आणि माझादेखील त्या नगरीबरोबर जणू ‘भ्रमयुगा’त प्रवेश झाला. पुढे आत संमेलनस्थळी पोहोचल्यावर थोडे हायसे वाटेल, ‘भ्रम’ दूर होईल, असा आशेचा छोटासा किरण मनात कायम होता. पण, त्याचेही फारसे चालले नाही. आत येऊन पाहते तर काय, सर्व सभागृहांना/सभामंडपांना लोकनेत्यांचीच नावे! मनुष्याचे अंदाज चुकू शकतात, पण एवढे! मला माझाच राग येऊ लागला. अनेक गोष्टी निसटतानासुद्धा हाती थोडे काही लागते तसे झाले. अध्यक्ष महोदयांचे बालसाहित्य ‘विपुल’प्रमाणात असल्याने बालकांना प्रोत्साहन देणारे विविध कार्यक्रम आयोजिले होते, तेथील रूपरेषा, माहोल लहानांना आकर्षित करेल असाच होता. त्यात त्यांचे कथाकथन, काव्यवाचन, मुलाखत अशा विविध कार्यक्रमांचा सहभागही उत्स्फूर्त होता. त्यातही बालदोस्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
ग्रंथदालन तर खरोखरच समृद्ध करणारे होते. ‘ग्रंथ’ हा साहित्याचा अविभाज्य भागच. येथे वाचकांचा प्रतिसाददेखील तसाच होता. परंतु, प्रत्यक्ष हे ‘ग्रंथ’ आपल्या ‘दालनात’ किती जणांनी नेले, हा प्रश्न सर्वेक्षणातूनच सुटू शकतो. असो. त्याचबरोबर आणखी एकदा मनापासून आनंद झाला, ते अभिजात मराठी भाषा दालन पाहिल्यानंतर. आपली मराठी भाषा किती अर्थपूर्ण आहे, त्यात किती अनेकार्थता आहे, किती विविध पैलू आहेत, किती मोठा आहे प्रवास तिचा, किती दिग्गज साहित्यिक तिच्या कुशीत जन्मले... आणि हे दालन पाहताना सुरेश भटांच्या ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी’ या गीताचा पुनःप्रत्यय आला. पण, इथून बाहेर पडून पुन्हा एकदा माझा प्रवेश ‘भ्रमयुगा’तच झाला. कार्यक्रम पत्रिका बघून मनात प्रश्न पडले की, साहित्य हे एकाच चौकटीतच अडकले आहे का? वास्तववादी लिखाण करणारे ते साहित्यिक आणि स्वप्नरंजन करणारे, कोणत्याही ‘वादा’त न अडकणारे ते कोण? घुमून फिरून त्याच त्या विषयांवर चर्चा, इतर निखळ, आनंदी विषय हे चर्चेचा विषय असू शकत नाहीत का?
प्रश्न तर मनात खूप होते. एवढ्या मोठ्या व्यक्तींचा पाठिंबा, तेवढीच उत्तम सोय. भर उन्हाळ्यात, झोपण्यासाठी आपले पुस्तकांचेच मंडप, कानाशी कुमार गंधर्वांऐवजी गुणगुणारे डास, इतर विधींची अत्युत्तम व्यवस्था, भरपूर पाणी, भरघोस वीजपुरवठा, अशी पंचतारांकित सोय-एवढी दक्षता, आपल्या आलेल्या पाहुण्यांची घेणे, याबद्दल आभार कसे मानावेत, हा मला पडलेला आणखी एक प्रश्न किंवा ‘भ्रम.’ खरेतर असे अनेक ‘भ्रम’ मला मांडावेसे वाटतायत, पण नेमके कोणते आणि किती मांडू हादेखील ‘भ्रम’च आहे. तूर्तास थांबते आणि साहित्यनगरीच्या त्या राजकीय ‘भ्रमयुगा’तून शरीराने कधीच बाहेर आले, तसे मनातूनही हे ‘भ्रमयुग’ लवकरच ओसरेल, अशा आशा!
- वेदश्री दवणे