राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेस कर्णावतीमध्ये उत्साहात प्रारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2022
Total Views |

rss
 
 
कर्णावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक शुक्रवार, दि. ११ मार्चपासून गुजरातमधील कर्णावती येथे सुरू झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीचा शुभारंभ केला. रविवार, दि. १३ मार्च रोजी ही बैठक संपन्न होणार आहे.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन शुक्रवार दि. ११  ते रविवार, दि. १३  मार्च या कालावधीदरम्यान गुजरातमधील कर्णावती येथे करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी संघकार्याचा आढावा पत्रकारांसमोर ठेवला. वैद्य यांनी सांगितले की, “कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संघशाखा बंद ठेवाव्या लागल्या होत्या. परंतु, आता शाखा परत सुरू झाल्या असून मार्च २०२० च्या तुलनेमध्ये ९८.६ टक्के स्थानांवर पुन्हा संघकार्य सुरु झाले आहे. वर्तमानस्थितीत ६० हजार शाखा सुरू असून, संघाच्या साप्ताहिक व मासिक मिलनांची संख्यासुद्धा वाढली आहे,” असे त्यांनी नमूद केले.
 
 
ते पुढे म्हणाले की, “संघाच्या शाखांपैकी ६१ टक्के शाखा विद्यार्थ्यांच्या असून, ३९ टक्के शाखा या व्यावसायिकांच्या आहेत. यावरून संघामधे तरुण कार्यकर्त्यांची संख्या वाढते आहे, हे दिसून येते. येणार्‍या दोन वर्षांत सर्व मंडळांमध्ये शाखा असतील या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत,” असे त्यांनी सांगितले.
 
 
याप्रसंगी वैद्य यांनी रा. स्व. संघाच्या ‘जॉईन आरएसएस’ या योजनेविषयीसुद्धा माहिती दिली. ‘जॉईन आरएसएस’च्या माध्यमातून २०१७ ते २०२१ या कालखंडात प्रतिवर्ष सुमारे एक ते सव्वा लाख तरुणांनी संघाशी जोडून घेण्याची इच्छा दर्शवली. याशिवाय थेट संघशाखेच्या माध्यमातूनसुद्धा तरुणवर्ग संघाशी जोडला जातो. रा. स्व. संघाच्या संघ शिक्षा वर्गांविषयी माहिती देताना वैद्य यांनी सांगितले की, “प्रतिवर्षी होणारे हे संघ शिक्षा वर्ग कोरोना कालावधीत होऊ शकले नाहीत. आता दोन वर्षांनंतर १५ एप्रिलपासून प्राथमिक, प्रथम, द्वितीय संघ शिक्षा वर्गांचे देशभर आयोजन केले जाईल, तर तृतीय संघ शिक्षा वर्ग नागपूर येथे होईल,” असे त्यांनी सांगितले.
 
 
याप्रसंगी संघ कार्यकर्त्यांनी कोरोना कालावधीत केलेल्या समाजसेवेचासुद्धा वैद्य यांनी उल्लेख केला. तसेच, “केवळ संघ स्वयंसेवकच नव्हे, तर समाजानेसुद्धा कोरोना कालावधीमध्ये सरकारला साहाय्य केले. या कालखंडात भारतासारखी सक्रियता इतर कोणत्याही देशात दिसून आली नाही,” असे त्यांनी सांगितले.
 
 
“समरसता, कुटुंब प्रबोधन, गोसंवर्धन, ग्रामीण विकास, इ. विषयांमध्ये संघ स्वयंसेवक समाजाबरोबर काम करत आहेत,” असेही मनमोहन वैद्य यांनी सांगितले. रविवार, दि. १३ मार्च रोजी सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे पत्रकार परिषदेसह संबोधित करतील व तेव्हा पत्रकार त्यांना प्रश्नही विचारू शकतात, अशी माहिती त्यांनी दिली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@