अधोरेखित झालेला तिसरा सूर

    10-Dec-2022   
Total Views |

 sulochana chavan
 
 
 
 
 
सुलोचना बाई गेल्याचं समजलं आणि सगळी कलासृष्टी हळहळली. काही माणसं जन्मजात काही खुबी घेऊन येतात. कला ही बहुतेकदा वारसा परंपरेने पुढच्या पिढीकडे जाते. म्हणतो ना, आपला पहिला गुरु म्हणजे आपली आई. आई किंवा घरातली इतर मंडळी.. जन्माला आलेलं मूल आपल्या भोवताली असलेल्या वातावरणातून शिकत असतं. अनुकरण करणं आणि जे सापडलं ते आपल्यात तंतोतंत ठसवून घेणं हे त्यांचं वैशिष्ट्य. पण आडात नाही ते पोहऱ्यात कसं यायचं? काही असामान्य प्रतिभावंत ते उपजत घेऊन येतात. त्यापैकीच एक म्हणजे सुलोचना चव्हाण.
 
 
सुलोचना बाई पाचव्या सहाव्या वर्षांपासून गाऊ लागल्या. गाणं म्हणजे काय? गीतातील शब्दांचा अर्थ / भावना सूर आणि तालाच्या आधाराने नेमका ठेका धरत समोरच्यापर्यंत पोहोचवण. या भावना आपल्याला जोवर भिडत नाहीत तोवर त्या समोरच्यापर्यंत कशा पोहोचतील? ही दैवी देणगीच! सुलोचना बाई जेव्हा गाऊ लागल्या आणि लावणी सादर करू लागल्या तेव्हा एका बाजूला लतादीदी, आशा भोसले सुद्धा लावणी गात असत. आणि दुसऱ्या बाजूला मराठी माणसाला वेड लावणाऱ्या बैठकीच्या लावण्या, ठुमरी, तमाशाचे फड रंगत होतेच. या लोक कलांच्या विलोभनीय अदा आणि प्रथितयश गायिकेचा गोड गळा, सूर न सूर मोजून संगीतबद्ध केलेली गाणी. त्या काळात रांगडा शृंगार लावण्यांतून पाहायला मिळायचा. आजसारखी रेकॉर्डेड गीतं केव्हाही ऐकायला मिळावी अशी माध्यमं नव्हती. भारंभार माध्यमांचं आक्रमण झालं नव्हतं. आणि त्यामुळेच शृंगार कला रसिकांची मोठी गर्दी विठाबाई नारायणगावकर आणि तत्कालीन लावणी सादर करणाऱ्या कलाकारांच्या फडांना व्हायची. एका बाजूला अभिजनांना चार चौघात ऐकायला अभिमान वाटेल असं सुरेल संगीत सादर करणाऱ्या लता, आशा, उषा आणि दुसऱ्या बाजूला अस्सल गावरान, ग्रामीण, रांगड्या शृंगारिक लावण्या गाणाऱ्या फडातील कलावंत. या दोन्ही गाजलेल्या प्रकारांना किंचित बाजूस सारून मुसंडी मारून प्रसिद्धी मिळवली त्या सुलोचना बाई. कोणत्याही प्रकारचा वारसा किंवा प्रशिक्षण नसताना आपल्या शैलीची छाप पडून रसिकांचा कान आपल्याकडे वळवून घेतला तो सुलोचनाबाईंनी. हाच तो अधोरेखित झालेला तिसरा सूर! ज्या दर्जाचं गाणं त्यांनी रसिकांना दिलं तेवढंच प्रेम रसिकांनी बाईंना दिलं.
 
 
सुलोचनाबाईंनी लावणीची चित्रपट सृष्टीला ओळख करून दिली. कलाक्षेत्रात लावणीला अभिजात स्थान मिळवून दिलं. शहरी, आणि अभिजनांना तेव्हाही थोडी वाकडी वाट करून लावणी कार्यक्रमांचा कानोसा घ्यावासा वाटे. त्याकाळात ते सुलभ करून दिलं बाईंनी. आणि मग अगदी लता मंगेशकरही लावणी गाऊ लागल्या. लावणी सादर करावी, गाऊन पाहावी असं कलाकारांना वाटू लागलं.
 
 
विलोभनीय डोळ्यांची लवलवती पाती, शेलके शब्द, मनोहर अंगविक्षेप, मधूनच उगारलेली नजर, याशिवाय असलेलं लावणीतलं लावण्य फक्त सुलोचना बाईंना गवसलं होतं. शालीनतेने लावणी सादर करणं त्यांचं वैशिष्ट्य. त्यांच्या बद्दल अजून एक सांगायचं म्हणजे त्याना गुरु नाही. कोणत्याही प्रकारचं शिक्षण त्यांनी घेतलं नाही. न कळत्या वयात त्या गाऊ लागल्या, घरच्याच मेळ्यात नाटकं करू लागल्या, मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू अनेक भाषेत त्यांनी काम केलं. श्री कृष्ण बालमेळ्यापासून झालेली ही सुरुवात आचार्य अत्र्यांनी "लावणीसम्राज्ञी" ही पदवी बहाल करेपर्यंत बहरत राहिली, आणि पुढेही अशीच अखंड सुरु राहिली.
 
 
त्यांच्याच मेळ्यातले मेकपमन दांडेकर त्यावेळी सिनेसृष्टीशी संबंध ठेऊन होते. त्यांच्याच मार्फत सिनेसृष्टीत बाईंनी पदार्पण केले. पहिले व्यावसायिक गाणे त्यांनी अवघ्या नवव्या वर्षी गायले. ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज करायच्या. कदाचित गुरु नसल्यामुळेच की काय त्यांना आत्मशोध घेता आला. आत दडून बसलेली कला त्यांची त्यांना गवसली. शाम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्या 'कृष्ण सुदामा' या हिंदी चित्रपटात त्या पाहिलं गाणं गायल्या. मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केलं आणि याचवेळी मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या नावाजलेल्या गायकांसोबत गाण्याची संधी त्यांना मिळाली.
 
 
लावणीशिवाय गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी भाषेत त्यांनी भजन, गझल असे काही प्रकारही हाताळले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं त्यांचंही काहीसं होतं. वत्सला बाई कुमठेकरांची 'सांभाळ गं सांभाळ गं' ही लावणी लहान असताना त्या वारंवार गात. त्यावेळी त्यांची आई त्यांना फार रागावत. मुलीने लावण्या गाऊ नये, ऐकू नये, लावणीचा नाद वाईट असे त्या म्हणत, आणि म्हणूनच शालीनतेच्या लावणीतील लावण्य आणि नजाकत त्या फक्त आवाजाच्या माध्यमातून रसिकांसमोर पोहोचवू शकल्या असाव्या. आचार्य अत्रेंच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ चित्रपटात त्यांनी पहिली लावणी गायली. संगीतकार वसंत देसाई आणि चेहरा हंसा वाडकर यांचा. हंसा बाईंच्या उन्मत्त अभिनय कौशल्याला देसाईंचं संगीत आणि सुलोचनाबाईंचा आवाज असे तीन सूर एकत्र जुळून आले, त्यातूनच त्यांच्या लावणीची ओळख कलासृष्टीला झाली, दिवसेंदिवस ती बहरत गेली.
 
 
मागे अंतरे कसेही असोत मात्र मुखड्याची सुरुवात ठसकेबाजच व्हायला हवी असं त्यांचं ठाम मत होतं. त्यांच्या प्रत्येक लावणीत याची प्रचिती येते.
 
 
फड सांभाळ तुऱ्याला गं आला, कळीदार कपूरी पान, मी बया पडली भिडंची, गोरा चंद्र डागला किंवा आई चिडली, बाबा चिडला, काय करू तुझ्यावर माझा जीव जडला अशा त्यांच्या गाजलेल्या लावण्या. लावणीच्या शब्दातच भाव असतो, तो पोहोचवायचं काम गायिकेचं. त्यामुळे गायिकेच्या आवाजाला जो लहेजा हवा, जो गावरान बाज हवा, जी आर्तता त्या सूरात हवी, जे आर्जव, जी विनंती, आणि आपल्या स्पष्टपणे मांडलेल्या भावनांवरचा अधिकार, तो त्यांच्या आवाजातून त्या सहज व्यक्त करत. हाच त्यांचा विजय.
 
 
त्यांना अनेक पुरस्कार जाहीर झाले, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा २००९ सालचा राम कदम कलागौरव पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा ’मल्हारी मार्तंड’ या चित्रपटाच्या पार्श्वगायनाकरिता १९६५ सालचा पुरस्कार, संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०१०चा "लता मंगेशकर" पुरस्कार, चिंचवडच्या रोटरी क्लबतर्फे जीवनगौरव पुरस्कार, असे अनेक. नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
 
 
त्यांच्या या प्रदीर्घ सांगीतिक कारकिर्दीला मनाचा मुजरा. त्यांच्या पश्चातही त्यांचा आवाज आपल्यासोबत अखंड राहील या एवढं सुख नाही!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.