लापिडरुपी हिंदूद्वेष्टी गोचीड...

    29-Nov-2022
Total Views |
 
नदाव लापिड
 
 
 
 
इस्रायलमधील चित्रपट दिग्दर्शक आणि संहितालेखक नदाव लापिड याने गोव्याच्या ‘इफ्फी’ चित्रपट सोहळ्यात ‘द काश्मीर फाईल्स’ला प्रपोगंडा आणि अश्लील चित्रपट ठरवत हिंदूविरोधी पूर्वग्रहदूषित मानसिकतेतूनच ही टिप्पणी केली. त्यामुळे लापिडसारख्या अशा या हिंदूद्वेष्ट्या गोचिडींना वेळीच ठेचण्याची आज नितांत गरज आहे.
 
 
चित्रपट समीक्षा हे खरंतर एक शास्त्र आणि शास्त्र म्हंटलं की त्याचेही नियम ओघाने आलेच. अशा या शास्त्रात एखाद्या चित्रपटाची समीक्षा नेमकी कोणत्या आधारावर आणि कशी करावी, याचेही काही निकष ठरलेले. जसे की, चित्रपटाचे दिग्दर्शन, संहिता, संवाद, संगीत, वेशभूषा इत्यादी. पण, हल्ली चित्रपटाविषयी एकतर अपार अज्ञानी किंवा एकांगी दृष्टिकोनातूनच बघणार्‍या तथाकथित समीक्षकांचीच सद्दी जास्त! त्याचाच प्रत्यय गोव्यातील 53व्या ‘इफ्फी’ सोहळ्याच्या सांगतेनिमित्ताने आला. यावेळी ज्युरी प्रमुख म्हणून भूमिका निभावणारा इस्रायलचा चित्रपट दिग्दर्शक आणि संहितालेखक नदाव लापिडने ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर या चित्रपटावर चक्क ‘प्रपोगंडा आणि अश्लील चित्रपट’ अशी वाह्यात शेरेबाजी केली. आधी म्हटल्याप्रमाणे लापिडने समीक्षणाच्या चौकटीत ‘द काश्मीर फाईल्स’मधील गुणदोषांवर नेमकेपणाने बोट ठेवले असते, त्यातील त्रुटी सप्रमाण अधोरेखित केल्या असत्या, तर त्यावर आक्षेप घेण्याचे मुळी कारणच नाही. कारण, शेवटी ‘ज्युरी’ म्हणून, समीक्षक म्हणून तो त्यांचा अधिकार मान्य करावाच लागेल. परंतु, 47 वर्षीय लापिडने समीक्षणाचे नियम-निकष चक्क पायदळी तुडवत विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या गाजलेल्या चित्रपटाला ‘प्रपोगंडा’ असे शिक्कामोर्तब करून आपल्या कद्रू मानसिकतेचाच परिचय करून दिला. त्यातच या ‘फिल्म फेस्टिव्हल’मध्ये जरी लापिड ज्युरी प्रमुख असला तरी इतरही या क्षेत्राशी संबंधित मंडळी ज्युरी म्हणून सहभागी होतीच. परंतु, लापिडने ‘द काश्मीर फाईल्स’विषयीचे स्वत:चे मत चक्क ज्युरी म्हणून ‘आम्हा सर्वांचे मत’ म्हणून लादण्याचा मस्तवालपणाही केला. परंतु, नंतर इतर ज्युरी सदस्यांनीही लापिडच्या मताशी आम्ही सहमत नसून ते त्यांचेच वैयक्तिक मत असल्याचे सांगत या आक्षेपार्ह टिप्पणीपासून फारकत घेतली. त्यामुळे लापिडने चित्रपट समीक्षेच्या नावाखाली भारताच्याच भूमीतून, ‘द काश्मीर फाईल्स’सारख्या संवेदनशील विषयावर बरळून केलेला हा आगाऊपणाच म्हणावा लागेल.
 
 
 
‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने नव्वदच्या दशकात काश्मिरी हिंदूंवरील अनन्वित, अमानवी अत्याचार पडद्यावर पुनश्च जीवंत केले. काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला या चित्रपटाने वाचा फोडली. एवढेच नाही, तर या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काश्मिरी हिंदूंना ज्या नरकयातना भोगाव्या लागल्या, तो नरसंहारच होता, हे खुद्द संयुक्त राष्ट्रांनीही मान्य केले. या चित्रपटाने केवळ भारतातच नाही, तर विदेशातही अनेकांच्या काळजाला थेट हात घातला. 300 कोटींच्या वर या चित्रपटाने देशविदेशात गल्ला जमवला. काश्मिरी हिंदू बांधव-भगिनींनीही चित्रपटगृहात आपल्या भावनांना अक्षरश: अश्रूंनी वाट मोकळी करून दिली. चित्रपट कित्येत राज्यांत टॅक्स-फ्री घोषित झाला, तर कित्येकांसाठी या चित्रपटाचे मोफत शो देखील आयोजित करण्यात आले. सांगायचे तात्पर्य एवढेच की, भारतीय हिंदू जनमानसालाही हादरवून सोडणारा, त्यांना त्यांच्याच धर्मबांधवांचा पुसलेला खरा इतिहास पुन्हा डोळ्यांदेखत उभा करणारा हा चित्रपट भारतीयांनाही उचलून धरला. परंतु, हिंदूद्वेष्टे, मोदी विरोधकांनी या चित्रपटाला तेव्हाही ‘प्रप्रोगंडा’च ठरवत काश्मिरी हिंदूंप्रती त्यांची काय किंमत आहे, हे दाखवून दिले होते. काँग्रेसपासून ते केजरीवालांपर्यंत आणि ठाकरेंपासून ते अब्दुल्लांपर्यंत ‘काश्मीर फाईल्स’वर तोंडसुख घेत या विषयाला तेव्हा राजकीय वळण दिले गेले. दुर्दैवाने इस्रायली दिग्दर्शक नदाव लापिडने याच पुरोगामी सेक्युलरांच्या आक्रोशाचा कित्ताच पुन्हा गिरवला. खरंतर भारताच्या अत्यंत संवेदनशील, भळभळती जखम ठरलेल्या या चित्रपटाविषयी नदाव लापिडसारख्या एका ज्यू-इस्रायली दिग्दर्शकाने इतके असंवेदनशील वक्तव्य करणे अत्यंत क्लेशकारकच. कारण, ज्याप्रमाणे हिटलरने जर्मनीत ज्यूंचा अपरिमित छळ करून नरसंहार केला, तशीच गत काश्मीर हिंदूंचीही. त्यामुळे लापिडसारख्या ज्यू दिग्दर्शकाने तरी ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटामागील भावनांप्रती सहसंवेदनेने विधाने करणे अपेक्षित होते. पण, त्याउलट या चित्रपटातील महिलांवरील राक्षसी अत्याचाराच्या प्रसंगांवरून थेट चित्रपटालाच ‘अश्लील’ शिक्का मारणारा लापिड हा गांभीर्याने चित्रपट निर्मिती करणारा दिग्दर्शक आहे का, अशीच शंका उपस्थित व्हावी.
 
 
 
दुसरीकडे ज्यूंच्या नरसंहारावर ‘शिंडलर्स लिस्ट’, ‘अ‍ॅन फ्रँक डायरी’, ‘द लाँग वे होम’, ‘कॉन्सिपरसी’ असे आजवर कित्येक चित्रपट प्रदर्शित झाले. या सगळ्या चित्रपटांमधूनही ज्यूंवरील नृशंस नरसंहाराची करुण कहाणी जगासमोर मांडली गेली. मग त्याच न्यायाने खुद्द ज्यू असलेल्या लापिडला हे चित्रपटही इस्रायली सरकारचा ‘प्रपोगंडा’ वाटले का? की आपल्या धर्मबांधवांवरील नरसंहारच काय तो सत्य आणि अशाच इतिहासातील इतर धर्मीयांच्या बाबतच्या घटना तुच्छ, अशी लापिडची यामागची भावना? असाच प्रश्न उपस्थित होतो. आणि सिनेमा हे प्रपोगंडाचे माध्यम आहे, हे कबूल केले आणि ‘द काश्मीर फाईल्स’च्या माध्यमातून हिंदू प्रपोगंडा राबविला गेला, हेदेखील क्षणभर मान्य केले, तर मग बिघडले तरी कुठे? इतर धर्मियांनी त्यांच्या धार्मिक प्रपोगंडाचा प्रचार-प्रसार केला तर ते कौतुकास्पद, पण हिंदूंनीही असेच काही केले तर मग त्यात गैर ते काय? त्यामुळे लापिडसारख्या हिंदूद्वेष्ट्या गोचिडांची हिंदूविरोधी असुयाच यातून डोकावते, हेच खरे. अशा या लापिडविषयी अधिक खोलात जाऊन माहिती काढल्यावर त्याच्या स्वत:च्या मातृभूमीविषयीचे, इस्रायलविषयीचे त्याचे विचारही असेच कलुषित असल्याचे लक्षात येते. त्याच्या ‘सिनोनॉम्स’ चित्रपटावरील एका मुलाखतीत बोलताना लापिड याने “इस्रायली सामूहिक आत्मा हा एक आजारी आत्मा आहे,” अशा आशयाचे एक धक्कादायक विधान केले होते. तसेच, इस्रायली सरकारने सुरू केलेल्या ‘शॉमरॉन फिल्म फंडा’ला लापिडसह इतर 250 इस्रायली चित्रपटनिर्मात्यांनी विरोध करत सरकारला पत्र लिहून धारेवर धरले होते. या फंडाचा उपयोग इस्रायली सरकार वेस्ट बँकमध्ये इस्रायली ज्यूंना वसवण्यासाठी करणार असल्याचा ठपका या चित्रपटनिर्मात्यांनी ठेवला होता. त्यामुळे ज्याप्रमाणे सरकारी ध्येय-धोरणांना विरोध करणारा अनुराग कश्यपसारखा एक कंपू बॉलीवूडमध्ये सक्रियपणे कार्यरत आहे, तशीच या लापिड आणि अन्य हिंदूद्वेष्ट्यांची गत. पण, लापिडच्या या एकंदरच वक्तव्याचा भारतातील इस्रायलच्या राजदुतांनी अगदी खरपूस शब्दांत पत्र लिहून जाहीर निषेध नोंदवला. कारण, साहजिकच लापिडचे विचार हे इस्रायली सरकारचे मत असूच शकत नाही. त्यामुळे भारत-इस्रायल संबंधांमध्ये साधा मिठाचा खडाही पडू नये, म्हणून इस्रायल सरकारनेही भारताचीच बाजू उचलून धरत लापिडचे कान टोचले ते उत्तमच!
 
 
 
आज लापिडच्या या अनावश्यक टिप्पणीमुळे ऐन गुजरात निवडणुकांच्या तोंडावर भारतातील पुरोगाम्यांना यानिमित्ताने का होईना मोदी सरकारविरोधात बरळण्यासाठी आयते खाद्य मिळाले. पण, या असल्या अपप्रचारावर जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाही जनतेने विश्वास ठेवला नाही आणि आजही कोणी याला फारसे गांभीर्याने घेणार नाहीच. उलट भारतात येऊन, काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला अपमानित करण्याचा, भारतीय चित्रपटाचीच खिल्ली उडवण्याचा हा प्रयत्न भारतीयांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलाच धुडकावून लावला. तेव्हा पाहुण्यासारखे आलात, तर पाहुण्यासारखेच राहा, भारतात येऊन येथील लोकांचा, हिंदू संस्कृतींचा, हिंदूंच्या संवेदनांचा असा अपमान आता भारतीय कदापि सहन करणार नाहीत, हेच खरे!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.