आळंदी यात्रेच्या निमित्ताने सर्वतोपरी सज्ज

    20-Nov-2022
Total Views |

yatra
 
 
आळंदी : आज दिनांक २० नोव्हेम्बर रोजी आळंदीतील समाधी उत्सव सप्ताहानिमित्त यात्रेचं आयोजन केलं आहे. ही यात्रा उत्पत्ती एकादशीच्या दिवशी असते. संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२६ वा संजीवन समाधी दिन सोहळा कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारीला वेग आला आहे. शहरात पोलीस बंदोबस्त, पास व्यवस्था, पाणी व्यवस्था, दर्शनबारी, आरोग्य सुविधा यांची तयारी सुरु आहे. शहरात प्रमुख चौकांमध्ये पोलिस मदत केंद्रे उभारण्यात येत आहेत. मंदिरात भाविकांना माऊलींच्या दर्शनाची व्यवस्था सुरु आहे.
नागरिकांच्या आरोग्यासाठी शहरात जंतुनाशक धुर फवारणी करण्यात येत आहे. देखभाल दुरुस्तीचे कामही पूर्णत्वास येत आहे. टाळ, पखवाज, फुल - प्रसादाची दुकाने गजबजली आहेत. शहरात ठिकठिकाणी दुकाने, तात्पुरती हॉटेल्स उभारणी सुरु आहे. विशेषतः कार्तिकी यात्रेसाठी २४ तास सुमारे अडीच हजार पोलिसांचा खडा पहारा तैनात करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले.
कार्तिकी यात्रेसाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडून ८ सहायक पोलीस आयुक्त, ५० पोलिस निरीक्षक, १९३ उपनिरीक्षक, १२५० अंमलदार, २५० वाहतूक अंमलदार, ६५० होमगार्ड यांचा समावेश आहे. तसेच एसआरपीएफच्या ३ कंपन्या, एनडीआरएफच्या २ तुकड्या, बीडीडीएसचे २ पथक मदतीला पाचारण करण्यात येणार आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि आवश्यक त्या ठिकाणी पोलिस मदत केंद्रे उभारण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात २३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.
या निमित्त दूरवरून जमलेल्या भाविकांसाठी ध्वनिक्षेपकांद्वारे सूचना देण्यात येत आहेत. यात्रेनिमित्त आलेल्या दिंड्यांच्या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग नेमण्यात येणार आहेत. सहा हॉकर्स स्कॉड तैनात असणार आहे. या पाश्ववभूमीवर यात्रेला मोठ्या दिमाखात सुरुवात झालेली आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.