एकनाथजी: एक जीवनव्रती

    18-Nov-2022
Total Views |

एकनाथ रानडे
 
 
 
सुजाण वाचकहो,
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एके काळचे सरकार्यवाह अन् त्याही पुढे जाऊन राष्ट्रीय- आध्यात्मिक- सामाजिक अशा बहुविध पातळ्यांवर काम करणाऱ्या विवेकानंद केंद्राचे संस्थापक मा.एकनाथजी रानडे यांचा १९नोव्हेंबर हा जन्मदिवस.त्या निमित्ताने त्यांना लिखित स्वरूपात वाहिलेली ही आदरांजली.
 
 
कोणत्याही प्रकारचे कार्य उभे करायचे म्हटले की त्यामागे सामाजिक- आध्यात्मिक वा राष्ट्रीय प्रेरणा असणे अत्यंत गरजेचे असते. एकनाथजींनी उभे केलेले हे कार्य म्हणजे त्रिवेणी प्रवाहाचा संगमच आहे.त्याहीपुढे जाऊन एकनाथजींनी उभे केलेले हे कार्य केवळ भारतापुरतेच सीमित न रहाता संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलेले दिसते.खेरीज,आज ह्या विवेकानंद केंद्राने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेले आहे.
 
 
तेव्हा अशा स्वरूपाचे कार्य उभे करीत असताना एकनाथजींच्या मनात काय होती या कार्याविषयीची संकल्पना व त्यामागील हेतू..??अशा स्वरूपाचे कार्य पेलून धरत असताना कशा स्वरुपाचा कार्यकर्ता घडलेला असणे गरजेचे आहे/असते??? कोणत्या वृत्तीचा अंगीकार करणे त्याने आवश्यक असते या सर्व मुद्द्यांचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न मी येथे करणार आहे.
हे विवेकानंद केंद्राचे कार्य म्हणजे आहे मनुष्यनिर्माण व राष्ट्र उभारणी या उदात्त म्हणाव्या अशा दुहेरी हेतूंनी प्रेरित झालेली संघटना.असे जरी असले तरी देखील आध्यात्मिक प्रेरणेतून चालणारे सेवाकार्य अशी संकल्पना मनी बाळगून एकनाथजींनी हे कार्य उभे केलेले होते.हे कार्य उभे करीत असते वेळी स्वामीजींचा संदेश जनमानसात पोहोचविणे हा हेतू एकनाथजींच्या मनात होता.
 
 
स्वामी विवेकानंदांचा असा कोणता बरं संदेश एकनाथजींच्या मनांत खोलवर झिरपलेला होता की जो प्रत्यक्ष कृतीत उतरवून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे त्यांना अत्यावश्यक वाटले...???
 
 
Arise,Awake,And Stop Not Until
The Goal is Reached...
 
 
दशोपनिषदांपैकी स्वामीजींना अत्यंत प्रिय असलेल्या अशा कठोपनिषदांतील
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान्नि बोधत |
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति.|
या मंत्राचा असलेला मथितार्थ म्हणजेच स्वामीजींचा Arise,Awake हा संदेश...!
 
 
आता कठोपनिषदांतील हा त्याचा मथितार्थ असलेला हा संदेश वाचल्यानंतर एकनाथजींच्या मनांत आध्यात्मिक प्रेरणेतून चालणारे सेवाकार्य अशी विवेकानंद केंद्राच्या कार्याची संकल्पना का बरं होती...??याचे उत्तर आपणांस सहजतेने मिळेल.
 
 
कोणतेही कार्य करायचे म्हटले की समर्थ रामदास यांनी म्हटल्यानुसार
सामर्थ्य आहे चळवळीचे | जो जो करील त्याचे
परंतु तेथ भगवंताचे अधिष्ठान पाहिजे||
 
 
या ओवीचा विचार करता एकनाथजींच्या या कार्याला भगवंताचे अधिष्ठान आहेच परंतु त्याचबरोबरीने या विवेकानंद केंद्राचे चालणारे राष्ट्रीय सामाजिक स्वरुपाचे कार्य लक्षांत घेता या कार्याशी संबंधित व्यक्तिने कोणत्या वृत्ती अंगिकारल्या पाहिजेत...?? या मुद्द्याकडे आता आपण वळणार आहोत.
 
 
१}सेवा: कोणतेही सेवाकार्य करताना तत्संबंधी कार्यकर्त्यांच्या मनात सेवाभाव तर उत्कटतेने जागृत असला पाहिजेच परंतु त्याचबरोबरीने मी या समाजाचा एक घटक असून त्या समाजाचं काही देणं लागतो ह्याचे भान मनात सतत जागते असले पाहिजे.तेव्हा अशा स्वरुपाचे कार्य करीत असताना ते नि:स्वार्थ वृत्तीने तर झाले पाहिजेच परंतु त्याखेरीज United We Stand And Devided We Fall अशा संघटनात्मक वृत्तीने काम करता येणे गरजेचे असते.
 
 
२} श्रध्दा: श्रध्दा म्हणजे अढळ विश्वास.स्वत:वरचा आणि स्वतः च्या विचार शक्तिवरचा विश्वास.जेव्हा आपण आपले एखादे ध्येय ठरवून त्यानुसार मार्गक्रमण करु लागतो तेव्हा अनेकदा आपल्या ध्येयापासून आपले चित्त विचलित होईल असे अनेक अडथळे ,संकटं आपल्यासमोर येऊन उभे रहातात. पैसा,सत्ता, प्रसिद्धि इ.च्या निमित्ताने अनेक मोहजालात अडकविणारे अनेक कसोटीचे क्षण येतात. अशा वेळी आपला स्वतःवरील, आपल्या ध्येयावरील विश्वास आजिबात न ढळता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे गरजेचे असते.
 
  
३} समर्पण वृत्ती : आपल्या हिंदू धर्माचा आधार ग्रंथ असणा-या श्रीमद्भगवद्गीतेत समर्पण या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.समर्पण म्हटले की त्याग हा आलाच...! ईशोपनिषदात तेन त्यक्तेन भुञ्जीथा म्हणजेच त्यागानेच भोग घेण्याबाबत सांगितले आहे.
 
 
जेव्हा एखादा कार्यकर्ता कार्य करण्यासाठी म्हणून बाहेर पडतो तेव्हा त्याला वैविध्यपूर्ण अडचणींना सामोरे जावेच लागते.त्यावेळी आपला अहंकार, क्रोध या व अशा सर्व विकारांचे दमन करुन शांत वृत्तीने आल्या परिस्थितीशी सामना करावा लागतो.अशा वेळी आपले संघटन कौशल्य पणाला लावून To Handle Yourself, Use Your HEAD But;To Handle Others Use Your HEART...!हे पक्के ध्यानी ठेऊन सामूहिक रित्या संघर्षाला सामोरे जावे लागते.अशा वेळी एखाद्या वाटचालीला प्रारंभ करणे वा पुढाकार घेणे,संघर्षाशी लढताना साहस व निष्ठा पणाला लावणे, चारित्र्य व कार्य दोन्हींचे पावित्र्य राखणे या व अशा गुणांनी युक्त असा कार्यकर्ता असावा लागतो.
 
 
आज एकनाथजींनी उभे केलेले हे कार्य पाहिले की हे सर्व गुण एकनाथजींच्या अंगी एकवटलेले होते त्यामुळेच एवढे कार्य उभे राहिले याची जाणीव होते. तेव्हा त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन...!
 
 
 
- प्रांजली कुलकर्णी
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.