‘ऑक्सिजन’चा तुटवडा आणि मृत्यू प्रकरणाची खा. संजय राऊत यांना माहितीच नसावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2021
Total Views |

sambit patra_1  

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचा टोला


नवी दिल्ली :‘ऑक्सिजन’च्या अभावी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही माहिती राज्यांनी केंद्र सरकारला पाठविली आहे. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत त्यावरून केंद्रावर टीका करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पाठविलेल्या आकडेवारीविषयी संजय राऊत यांना माहितीच नसावी,” असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी बुधवार, दि. २१ जुलै रोजी पत्रकार परिषदेत लगाविला.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ‘ऑक्सिजन’च्या अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असे केंद्र सरकारने राज्यांकडून आलेल्या माहितीच्या आधारे लोकसभेत लेखी उत्तराद्वारे मंगळवारी सांगितले होते. त्यावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका सुरू केली आहे. भाजपतर्फे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी त्यावरून विरोधी पक्षांचा समाचार घेतला.
 
 ते म्हणाले, “ऑक्सिजन अभावी  राज्यात एकही मृत्यू झाला नाही, ही महाराष्ट्र सरकारची अधिकृत माहिती आहे. मृत रुग्णांची नातेवाईकांनी न्यायालयात याचिका दाखल केली असता राज्य सरकारने तसे प्रतिज्ञापत्रदेखील मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर सादर केले आहे. त्यामुळे संजय राऊत केंद्र सरकारवर करीत असलेली टीका बिनबुडाची आहे. कारण, राज्य सरकारने न्यायालयात काय सांगितले याची माहितीच संजय राऊत यांना नाही. त्यामुळे राऊत हे ज्याप्रकारे खोट्या माहितीवरून राजकारण करीत आहेत, ते अतिशय धक्कादायक आहे,” असे डॉ. पात्रा यांनी सांगितले.
 
“मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीदेखील केंद्राकडून तातडीने ऑक्सिजन पुरवठा झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे संजय राऊत हे कोरोना मृत्यूंचे राजकारण करीत आहेत. चूक झाली असल्यास ती राज्यांकडूनच झाली आहे, याची त्यांनी माहिती घ्यावी. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने संसदेत जे उत्तर दिले, त्यासाठी राज्यांकडून आलेली माहिती व आकडेवारीचा संदर्भ घेण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकार दिशाभूल करीत असल्याचा आरोप करण्यापूर्वी विरोधी पक्षांनी आपापल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क करावा आणि त्यांनी केंद्रास खोटी आकडेवारी दिली का, हा प्रश्न विचारावा,” असेही डॉ. पात्रा यांनी नमूद केले.
@@AUTHORINFO_V1@@