जैवविविधतेचे जतन व संवर्धन करणे मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. यास्तव वसुंधरेचं देणं फेडण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी तुमची-आमची सर्वांची आहे, हे आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लक्षात घेणे गरजेचे आहे.
‘निसर्ग’ हे मानव, वन्यजीव, जलचर प्राणी, पक्षी अन् वनसंपत्ती यांना लाभलेलं मोठं वरदान आहे. या पार्श्वभूमीवर निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आधी आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करणं गरजेचं आहे. कारण, पर्यावरणाचा समतोल बिघडणे म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणं होय. सध्याच्या काळात जल, वायू व ध्वनिप्रदूषणामुळे वसुंधरेचं स्वास्थ्य बिघडत चाललं आहे. कारण, प्रदूषणामुळे पर्यावरणाचं नुकसान होत असल्याची जाणीव नसणं, हे बौद्धिक मागासलेपणाचे लक्षण आहे. पर्यावरणाच्या संवर्धनातून वसुंधरेचा बचाव करण्यासाठी जागतिक पातळीसह देशस्तरावर पर्यावरणवादी चळवळीची व्याप्ती वाढीस लागणे, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. पुढे जाऊन ती लोकचळवळ झाली, तर ते सर्व घटकांच्या दृष्टीने अधिक लाभदायक ठरेल, हे निश्चित.पृथ्वीवरील मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन व्हावे, तसेच जल अन् वायुप्रदूषण थांबावे, या उद्देशाने ५ जून, १९७२ रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत १३० देशांनी हजेरी लावली होती. त्यातून ‘पर्यावरण’ हा विषय सर्वदूर शालेय जीवनापासून अभ्यासक्रमात सामील करण्यात आला. हे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल आहे. वैश्विकस्तरावर ५ जून हा दिवस १९७४ सालापासून ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा होऊ लागला आहे. ‘ओन्ली वन अर्थ’ या घोषवाक्याने पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला. तेव्हापासून पर्यावरण समस्यांवर जागतिक पातळीवर ठोस उपाय शोधले जात आहेत.
तथापि, बदलती जीवनशैली, वाढणारे शहरीकरण, त्यातून होणारी प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा अमर्याद वापर, बांधकामांसाठी टेकड्या-पर्वतांचे खोदकाम, नद्या-खाड्यांमधून होणारे रेती उत्खनन, जल-वायुप्रदूषण, अणू चाचण्या, वाढत्या वाहनांमुळे होणारे वायू-ध्वनिप्रदूषण या सर्व गोष्टींमुळे पर्यावरणाचे अन् त्या परीने वसुंधरेचं बेसुमार नुकसान होत आहे. जीवसृष्टीच्या दृष्टीने जीवनरक्षक कवच असलेला ‘ओझोन वायू’चा थर कमजोर होणं, म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणे होय. पर्यावरणाचा असमतोल झाल्याने अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, अतिवृष्टी, अतिउष्णतामान, ऋतुमानात होणारे बदल, भूकंपाचे हादरे येणे, या समस्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे सर्व थांबविण्यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकाने सरकारला जल-वायुप्रदूषण रोखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने हातभारासाठी हिरिरीने पुढे यावे, असे आवाहन करण्यात येते.
वृक्षारोपण मोहिमेत राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तन-मन-धनाने भाग घ्यावा. ‘एक मूल, एक झाड’ लावून, त्याची निगा राखण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कडक कायदे करून जंगलांमधील वृक्षतोड कुठल्याही परिस्थितीत रोखली पाहिजे. इतकेच नव्हे, तर जंगलांच्या संवर्धनासाठी वन्यप्राण्यांचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे. ‘वाघ’ हा खरा जंगलचा राजा असल्याने, त्याची संख्या कशी वाढेल, यादृष्टीने वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात. जलप्रदूषण थांबविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांद्वारे सोडले जाणारे केमिकलयुक्त पाणी नद्या, खाड्या, समुद्राच्या पाण्यात मिसळणार नाही, यासाठी राज्याचा उद्योग विभाग आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर निर्बंध लादावेत. जेणेकरून जलप्रदूषणास आळा बसू शकेल.‘आपणही जगा अन् इतरांनाही जगू द्या’ हे ध्येय उराशी बाळगून नागरिकांनी आपले जीवन मार्गक्रमित करावे, म्हणजे पर्यावरणाचे संवर्धन होऊन ‘वसुंधरा बचाव’ लोकचळवळ यशस्वी होऊ शकेल.
पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या कामात राज्यातील युवा-युवतींसह शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अन् महिला मंडळे सर्वशक्तिनिशी सामील झाल्यास त्याला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होईल. प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मुलं-मुली अन् शिक्षक, कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक हे सर्व मोठ्या आवडीने या मोहिमेत भाग घेताना दिसत आहेत, ही आनंदाची गोष्ट असून, त्याचे आपण स्वागतच केले पाहिजे. ‘मी कचरा करणार नाही अन् इतरांना करू देणार नाही’ ही भावना प्रत्येकात रुजावी, हेच प्रयत्न शासकीय पातळीवर झाले पाहिजेत. पर्यावरण रक्षण करतेवेळी निसर्गासह त्यातली हवा (प्राणवायू), पाणी, माती, झाडं, प्राणी, पक्षी, फुले या प्रत्येकाला आपल्याला जपावं लागेल. त्याला पर्याय नाही. याशिवाय हवेतील प्रदूषण कमी व्हावे, यासाठी भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांवर अधिक भर द्यावा. तीर्थस्थळांवरील नद्याचे संवर्धन करणे हेही पर्यावरणाच्या दृष्टीने गरजेचं आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत स्वच्छ राखणे अगत्याचे आहे. हे सर्व साध्य करण्यासाठी लोकांच्या सहभागाची खूप आवश्यकता आहे.
‘जैवविविधता’ ही पृथ्वीवरील मानव, वृक्षवल्ली, वन्य पशू-पक्षी, जलचर प्राणी यांच्या जीवनाचा मूळ आधार आहे. या पार्श्वभूमीवर जैवविविधतेचे जतन व संवर्धन करणे मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. यास्तव वसुंधरेचं देणं फेडण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी तुमची-आमची सर्वांची आहे, हे विसरायला नको. प्रदूषणाला आळा घालून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी ‘एंड प्लास्टिक पोल्यूशन’ हे घोषवाक्य घोषित होऊन त्या अनुषंगाने शासकीय यंत्रणेमार्फत प्लास्टिक उत्पादन अन् वापरावर स्थायी स्वरूपाचे निर्बंध घालण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करून ‘वसुंधरा बचाव’ ही आता लोकचळवळ उभी राहिली आहे.‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.....’ हा संदेश संतांनी रयतेला दिला आहे. ‘वृक्ष’ ही वसुंधरेची हिरवी फुप्फुसे असून याच फुप्फुसांच्या माध्यमातून तुम्हा-आम्हास जगण्यासाठी आजीवन प्राणवायू (ऑक्सिजन) मिळत असतो. यास्तव वसुंधरेच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी कर्तव्यबुद्धीतून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही मोहीम तन-मन-धनाने राबविली जाणे, ही काळाची गरज आहे.
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते असून, त्यात ‘वायू’ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण, वायूविना मानवी जीवनाची कल्पना करणंच अशक्यप्राय आहे. शुद्ध हवा, अर्थातच प्राणवायू आपल्याला झाडांपासून मिळतो. ही झाडं पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टीची संजीवनी आहे. वृक्षांमध्ये प्राणवायू पुरविण्याची तसेच वातावरणातील अशुद्ध व विषारी वायू शोषून घेण्याची क्षमता असते. तात्पर्य, वृक्ष हे जीवसृष्टीचे खर्या अर्थाने जीवनदाते असल्याने जुन्या वृक्षांची काळजी घेत, जास्तीत जास्त नवीन वृक्ष सातत्याने लावले पाहिजेत, त्यामुळे पाण्याचा भूगर्भात निचरा होऊन शेतकर्यांच्या शेतातील विहिरींना भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकेल. शहरांमधील हाऊसिंग सोसायट्यांनी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबवत पावसाचे पाणी अडवून पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले पाहिजे. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची टंचाई भासणार नाही. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी ‘जल’ हा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा असल्याने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे अभियान राबवून पृथ्वीवरील जलसाठ्याचा वापर सुयोग्य पद्धतीने केल्यास मानवाला पाण्याची कमतरता कधीच भासणार नाही.
वास्तविक पाहता, पर्यावरणामध्ये असमतोल निर्माण झाल्यास अवकाळी पाऊस, ऋतुमानात होणारे अचानक बदल, चक्रीवादळ, भूकंपाचे हादरे, अतितापमान, अतिपर्जन्यवृष्टी या नैसर्गिक आपत्ती उद्भवत असतात. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने शासकीय व अशासकीय संस्थांनी लोकसहभागातून जागोजागी वृक्षारोपण अभियान राबविले पाहिजे, त्यातून आपणास भरपूर प्रमाणात ‘ऑक्सिजन’ मिळू शकेल. त्याप्रमाणेच नद्या, नाले, समुद्राचे पाणी प्रदूषित होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अभयारण्ये व तेथील वृक्षवल्ली अन् नद्या, नाले, पर्वत, सागर ही वसुंधरेची कवचकुंडले आहेत. त्यांचे जतन व संरक्षण केल्यास पर्यावरणाचे रक्षण अन् संवर्धन हमखास होईल. इतकेच नव्हे, तर त्यातून पृथ्वी म्हणजेच वसुंधरेच्या सौंदर्यात अधिकाधिक भर पडून, ती मानवाला व अन्य जीवसृष्टीला आपल्या कुशीत सामावून मायेची ऊब देईल. आज कोरोना महामारीत देशभरात रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी प्राणवायूची कमतरता भासत आहे, त्यामुळे लाखो लोकांना नाहक आपले प्राण गमवावे लागलेत. यावर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे केंद्र व राज्य सरकारने लोकसहभागातून व्यापक प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबवून प्राणवायूचे भांडार निर्माण करावे, जेणेकरून भविष्यात प्राणवायूअभावी कोरोनासारख्या महामारीने निरपराध लोकांचे प्राण जाऊ नयेत. चला तर, अखिल मानवजातीचे रक्षण करण्यासाठी झाडं लावूया म्हणजे त्याद्वारे नैसर्गिकदृष्ट्या प्राणवायूनिर्मिती होऊन आपणास व आपल्या भावी पिढ्यांना सुरक्षित व आरोग्यदायी जीवन लाभेल, हे सूर्यकिरणांएवढे शुभ्र सत्य आहे. आपणास जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
- रणवीर राजपूत