अॅड. मानेचा राष्ट्रवादीच्या लीगल सेलशी संबंध नाही : राष्ट्रवादी

    दिनांक  04-May-2021 15:25:05
|

nitin mane_1  Hमुंबई :
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपने साम-दाम-दंड-भेदचा वापर करण्यात आला असून या निवडणुका पार्ट घेण्यात याव्या अशी मागणी राष्ट्रवादीच्या लीगल सेलच्यावतीने करण्यात आली आहे. ऍड. नितीन मानेने याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. मात्र, ही बातमी साफ चुकीची असून, अशी कुठलीच मागणी राष्ट्रवादी लीगल सेलने केली नाही. अॅड. नितीन माने यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस लीगल सेलशी काहीएक संबंध नाही, असा खुलासा राष्ट्रवादी लीगल सेलचे राज्य अध्यक्ष अॅड. आशिष देशमुख यांनी अधिकृत पत्रक काढत केला आहे.राष्ट्रवादीने आपल्या पत्रकात सांगितले आहे की, अॅड. नितीन माने ही व्यक्ती स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलच्या महाराष्ट्र कार्यकारिणीची सदस्य असल्याचे भासवत आहे. या व्यक्तीने तसे लेटरहेड देखील बनवले आहे तसेच या लेटरहेडचा वापर करून, पार्टी लिगल सेलच्या नावाचा गैरवापर करून, खोटी निवेदने व तक्रारी ही व्यक्ती देत आहे.अॅड. नितिन माने यांच्यावर सेलच्या आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास ठेवू नये व पत्रव्यवहार करू नये, असे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड. आशिष देशमुख यांनी जाहीर केले आहे.अॅड. नितिन माने नावाच्या व्यक्तीशी राष्ट्रवादीच्या लिगल सेलचा काहीही संबंध नाही. त्यांना कोणतेही नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही वा त्यांनी दिलेल्या कोणत्याही निवेदनाशी अथवा तक्रारीशी सेलचा दूरान्वयानेही संबंध नाही, असे सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड. आशिष देशमुख यांनी जाहीर केले आहे.

प्रसार माध्यमात व्हायरल होत असलेल्या बातमीत स्वत:ला राष्ट्रवादी कॉंग्रेस लीगल सेलचे अॅड. नितीन माने यांनी आरोप केले आहेत, की विधान परिषद विद्यमान आमदार प्रशांत परिचारक आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या कारखान्यावर कार्यरत असणारे सर्व सभासद, कर्मचारी यांना निवडणुकीपूर्वी तीन दिवस डांबून ठेवले होते. तसेच त्यांना धमकी देऊन भाजपला मतदान करा, अन्यथा कामावरुन काढून टाकू, असेही सांगण्यात आले. त्यामुळे धमक्‍या देण्याचा संशय निर्माण होत असून, त्या संदर्भातील काही मागण्या त्यांनी केल्या आहेत. याबाबतचा व्हिडीओदेखील माने याच्या सोशलमीडिया खात्यावरून शेअर केला आहे.


यात नितीन मानेने म्हणत आहे की, प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे या दोन्ही कारखानाच्या तसेच कार्यालयाच्या आणि घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. दोघांचे फोन रेकॉर्डिंग तपासावेत. समाधान आवताडे यांच्या कन्स्ट्रक्‍शन कंपनीचा पूर्ण ऑडिट तपासावा. नवडणुकी दरम्यान दोन्ही सदस्यांच्या प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे हे संचालक असणाऱ्या सर्व संस्था, कारखान्यातील आणि कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या सर्व बॅंक खात्यांची चौकशी करावी. माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून या निवडणुकीची चौकशी करावी. समितीच्या अध्यक्षतेखाली फेरनिवडणूक पारदर्शक पद्धतीने घ्यावी. अशा मागण्या केल्या आहेत. तसेच याबाबत त्यांनी मुख्य निवडणूक आयोगासह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, सोलापूर जिल्हाधिकारी, पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही पत्र पाठवल्याचे म्हटले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.