‘लव्ह’ आणि ‘लॅण्ड जिहाद’विरोधी आसाममध्ये कायदा करणार!

    दिनांक  27-Mar-2021 12:04:05
|

amit shaha_1  Hकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आश्वासननवी दिल्ली
: “भाजपच्या जाहीरनाम्यात आसामसाठी अनेक गोष्टी आहेत. मात्र, त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आसाममध्ये पुन्हा सत्तेत आल्यावर भाजप ‘लव्ह’ आणि ‘लॅण्ड जिहाद’विरोधी कठोर कायदा करेन,” असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवार, दि. २६ मार्च रोजी आसाममध्ये प्रचारसभेत दिले.


आसाम विधानसभा निवडणुकीसाठी सध्या प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कामरूप येथे एका जाहीरसभेत संबोधित केले. “आसामच्या चौफेर विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी भाजप कटिबद्ध आहे. जाहीरनाम्यामध्ये अनेक बाबींचा समावेश आहे. मात्र, त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाजप पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील प्रमुख समस्या असलेल्या ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’विरोधात कठोरात कठोर कायदा केला जाईल. भाजपने आसामच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या आणि त्यांची अंमलबजावणी केली आहे. राज्याला आंदोलन आणि दहशतवादमुक्त केले आहे. आसाममध्ये रोजगार वाढविणे आणि विकसित राज्य बनविणे यास भाजपचे प्राधान्य आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण जगात आसामची ओळख असलेल्या काझिरंगा अभयारण्यातील गेंड्यांच्या शिकारीसही रोखण्याचे काम भाजप सरकारने केले आहे,” असे अमित शाह यांनी सांगितले.


राहुल गांधी आसाममध्ये पर्यटक म्हणून येत असल्याची टीका शाह यांनी केली. ते पुढे म्हणाले, “बद्रुद्दीन अजमल हे आसामची ओळख असल्याचे राहुल गांधी म्हणतात. मात्र, त्यांना माहिती नाही की आसामची खरी ओळख श्रीमंत शंकर देव आणि माधव देव हे आहेत. त्यामुळे काँग्रेसने कितीही प्रयत्न केले, तरीही भाजप बद्रुद्दीन अजमलना आसामची ओळख बनू देणार नाही. कारण, आसाममध्ये घुसखोरी रोखणे बद्रुद्दीन सरकार नव्हे तर केवळ भाजप सरकारला शक्य आहे,” असेही शाह यांनी यावेळी नमूद केले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.