‘सकारात्मक’ उद्योगकर्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2021   
Total Views |

डॉ. संतोष कामेरकर_1 


‘बुडत्याला काडीचा आधार’ असे म्हटले जाते. मात्र, कठीण प्रसंगात ती काडी सापडणे आणि त्या काडीने किनारा गाठण्याचे कौशल्य संकटात सापडलेल्या माणसातही असावे लागते. ‘लॉकडाऊन’च्या काळात ठप्प पडलेल्या पर्यटनामुळे हॉटेल व्यावसायिकांची गाडी रुळावरून उतरली. काही व्यावसायिकांनी ती गाडी पुन्हा रुळावर आणलीही. त्यापैकीच एक म्हणजे डॉ. संतोष कामेरकर. आपल्या ‘एस. के. रिसॉर्ट’ची गाडी रुळावर आणण्याचे काम डॉ. संतोष कामेरकरांनी मोठ्या खुबीने केले. तेव्हा, कोरोना काळातील त्यांच्या उद्योगप्रवासावर टाकलेली ही एक नजर...‘सकारात्मकता’ हे समृद्ध मानवी आयुष्याचे गमक. विद्यार्थीपणाची भावना ठेवून सातत्याने शिकत राहिल्यानेच माणसाची प्रगती होते. या दोन्ही गोष्टींचा मेळ साधून उद्योगक्षेत्रात मार्गक्रमण करणारे एक धाडसी व्यक्तिमत्त्व म्हणजे उद्योजक डॉ. संतोष कामेरकर. मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा येथे ’एस. के. हॉलिडे होम (रिसॉर्ट) आणि ’स्पाईस ऑफ कोकण’ या हॉटेलचे ते संचालक आहेत. ‘उत्तम हॉलिडे होम’ आणि कोकणचवीच्या लज्जतदार जेवणासाठी आज ’एस. के. रिसॉर्ट’ ओळखले जाते. ‘लॉकडाऊन’मुळे पर्यटन व्यवसायाला जगभरात बसलेल्या धक्क्याचा परिणाम साहजिकच ’एस. के.रिसॉर्ट’वरही पडला. जवळपास आठ ते नऊ महिने ठप्प पडलेले आपले रिसॉर्ट आणि हॉटेल कामेरकरांनी मेहनत, नियोजन आणि सकारात्मकमतेच्या बळावर पुन्हा कार्यरत केले. रत्नागिरीत जन्मलेल्या डॉ. कामेरकरांचे वडील लहानपणीच वारले. म्हणून त्यांनी वयाच्या १३व्या वर्षीपासून हंगामी प्रकारचे व्यवसाय करत उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले. कोकणातील आंबे, फणस मुंबईत विकून त्यांनी छोटे-छोटे हंगामी व्यवसाय आत्मसात करुन आईला, घराला आर्थिक मदत केली. पुढे अशाच प्रकारचे छोटे व्यवसाय करत सन 2000 मध्ये कर्नाळ्यात महामार्गालगतअसलेली एक जमीन त्यांनी खरेदी केली. दोन एकरावर पसरलेल्या या जमिनीत मोठा खड्डा होता. साधारण एक हजार ट्रक मातीचा भराव करून हा खड्डा भरून कामेरकरांनी या रिसॉर्टच्या बांधकामाला सुरुवात केली. मुंबईपासून तास-दीड तासाच्या अंतरावर ’एस. के. रिसॉर्ट’ असल्याने त्याला पर्यटकांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.‘लॉकडाऊन’मुळे ’एस. के. रिसॉर्ट’मधील अन्य राज्यातील कर्मचारी हे हॉटेलमध्येच अडकून पडले. परिस्थिती बिकट झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य दिनेश पाटील यांनी कामेरकरांशी संपर्क साधून वनवासी पाड्यातील बांधवांसाठी मदत मागितली. कामेरकरांनीदेखील अजिबात वेळ न दवडता, तातडीने अन्नधान्याच्या स्वरुपात रिसॉर्टनजीक असलेल्या गावकर्‍यांना मदत मिळवून दिली.

माझ्या उद्योगाच्या यशाचे रहस्य ‘नेटवर्किंग’ व नातेसंबंध जोपासणे हे आहे. त्यामुळे आपला जनसंपर्क वाढतो व आपल्या उद्योगालादेखील फायदा होतो. सोबतच निवडलेल्या उद्योगाबद्दल आपली क्षमता, दोष, संधी आणि धोके ओळखणे आवश्यक आहे.

कोरोना काळात हॉटेल्स बंद असल्याने रस्त्याने प्रवास करणारे चाकरमानी उपाशीपोटी प्रवास करत होते. अशावेळी अन्नछत्र उघडून कामेरकरांनी ’अन्नदान हे श्रेष्ठदान’ हा संदेश सार्थकी लावला. यादरम्यान कर्मचार्‍यांच्या पगाराचा मुद्दादेखील तितकाच महत्त्वाचा होता. अशावेळी कर्मचार्‍यांनी स्वत: कमी पगार घेऊन त्यांची रिसॉर्टमध्येच राहण्याची व्यवस्था करण्याची विनंती कामेरकरांकडे केली. त्यांनीदेखील कर्मचार्‍यांना अन्नधान्य पुरवून रिसॉर्टमध्येच राहण्याची मुभा दिली. अशा डगमगलेल्या परिस्थितीतदेखील त्यांनी एकाही कर्मचार्‍याला कामावरून कमी केले नाही. ‘लॉकडाऊन’च्या नियमांमध्ये शिथीलता आल्यानंतर रिसॉर्टच्या व्यवस्थापनाचे आव्हान कामेरकरांसमोर होतेच. कारण, आठ ते नऊ महिने रिसॉर्ट आणि हॉटेल बंद असल्याने या दोन्ही वास्तूंची स्वच्छता, रिसॉर्टमधील जलतरण तलावाची स्वच्छता आवश्यक होती. हे काम करून त्यांनी पुन्हा उद्योगाला जोमाने सुरुवात केली. ‘कोविड’ काळात मोजक्या पाहुण्यांसह सर्व नियम पाळून लग्नाची परवानगी मिळाल्यानंतर ’एस. के. रिसॉर्ट’ला एक लग्नसमारंभ पार पाडण्याची संधी मिळाली. एका रात्रीत सर्व व्यवस्था-सोयी पूर्ण करत कामेरकरांनी हा लग्न समारंभ यशस्वीपणे आयोजित केला. त्यानंतर दोन-तीन लग्न सोहळे एस. के. रिसॉर्टमध्ये पार पडले. ’आजचा दिवस हा माझा दिवस आहे’ ही मानसिकता ठेवूनच कामेरकरांनी ही आव्हाने पूर्ण करत उद्योगाला पुन्हा नव्याने सुरुवात केली. या काळात कर्मचार्‍यांबरोबरच उद्योजक मित्रपरिवार, मुलगा सिद्धेश, मुलगी साईली, पत्नी श्रद्धा कामेरकर आणि स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभल्याचे कामेरकर आवर्जून सांगतात. ’डेस्टिनेशन वेडिंग’ क्षेत्रात यापुढे काम करण्याचा त्यांचा मानस आहे. सोबत रिसॉर्टच्या वाढीसाठी ‘ओपन गार्डन’ आणि खोल्यांमध्ये वाढ करण्याचे नियोजन आहे. येणार्‍या एप्रिल-मे महिन्यात ’कोकण आणि आंबा महोत्सवा’चे आयोजन करण्याचा त्यांचा विचार आहे.


डॉ. संतोष कामेरकर_1 


सामाजिक कार्य हे उद्योजकांचे कर्तव्य असल्याचे कामेरकर सांगतात. ’आदर्श प्रतिष्ठान’मार्फत गेल्या १३-१४ वर्षांपासून त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग आहे. वनवासी शाळांमध्ये ग्रंथालयांची निर्मिती करणे, पाड्यांमध्ये अन्नधान्याचे वाटप करण्याचे काम प्रतिष्ठान करते. ठाण्यातील ’विश्वास फाऊंडेशन’मधील मतिमंद मुलांना रिसॉर्टमध्ये आणून त्यांच्याकरिता एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन कामेरकर दरवर्षी करतात. तसेच अनाथ मुलांना व वृद्धाश्रमातील लोकांनाही समाजसेवा म्हणून रिसॉर्टमध्ये आणतात. यामागे आपण समाजाचे देणे लागत असल्याची भावना असून देण्याने आनंद वाढत असल्याचे कामेरकर सांगतात. आपल्याकडील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीमध्ये लोकांचे योगदान असल्याने, समाज हा आपलाच असल्याची भावना कामेरकर मानतात. तसेच त्यांच्या आई वनिता(आक्का) यांची ही शिकवण आहे, असे ते अभिमानाने सांगतात. हॉटेल व्यवसायात अनेक अडचणी असतात. या क्षेत्रात पडेल ते काम करावे लागते. त्यामुळे अनुभवी डॉ. कामेरकर हे स्वत: उद्योग मार्गदर्शक व ‘मोटिवेशनल स्पीकर’ आहेत. उद्योजक विकास प्रशिक्षण कार्यशाळा आणि कोर्स पूर्ण करून त्यांनी स्वत:चा विकास साध्य केलाच आहे. अनेक पुस्तकांचे वाचन, आंतरराष्ट्रीय उद्योजकांची व्याख्याने ऐकून त्यांनी स्वत:मध्ये बदलही केले. नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच ते स्वत: त्यातून शिकण्याचा आनंद घेत असतात. यशस्वी उद्योगासाठी त्यांनी लिहिलेली साधारण १५ पुस्तके बाजारात उपलब्धही आहेत. त्यामधील ’मला श्रीमंत व्हायचंय!’, ‘उद्योजक व्हा, श्रीमंत व्हा!’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. उद्योगातील यशाबाबत कामेरकर सांगतात की, “मेहनत आणि नियोजनामुळेच उद्योग यशस्वी होतो. एखाद्या व्यक्तीने चूक केल्यावर त्याला ओरडण्यापेक्षा प्रेमाने समजावल्यास तो अधिक कृतिशीलपणे काम करतो. वस्तूंचा वापर करावा आणि माणसांवर प्रेम करावे. मात्र, बर्‍याच ठिकाणी हे उलटे घडताना दिसते. लोक हे आपल्याकडील माणसांचा वापर करतात आणि वस्तूंवर प्रेम करतात.” लहानपणी हलाकीच्या परिस्थितीत कामेरकरांनी ज्या ज्या गाड्या धुतल्या, त्या त्या गाड्या विकत घेतल्या! यावरूनच कामेरकरांची स्वप्नपूर्तीच्या दिशेने असलेल्या चिकाटीची प्रचिती येते.


@@AUTHORINFO_V1@@