हवामान बदलाचे बळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2021   
Total Views |

COP 26 _1  H xकॅनडामध्ये हवामान बदलाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या नुकत्याच समोर आलेल्या बातमीने एकच खळबळ उडाली. ‘हवामान बदलाचा रुग्ण’ म्हणजे नेमके काय, असा प्रश्न फक्त कॅनडामध्येच नाही, तर जगभरातील डॉक्टर आणि नागरिकांनाही पडला. हवामान बदलाचा पहिला रुग्ण ठरलेल्या त्या ७० वर्षीय महिलेला नेमके असे काय झाले की, तिची गणना या प्रकारात पहिल्यांदाच करण्यात आली, याविषयीदेखील अनेक चर्चा रंगू लागल्या.
त्यातच ग्लासगोमधील ‘कॉप-२६’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर कॅनडामधील ज्या डॉक्टरने हे निदान केले, त्याच्या दाव्यालाही महत्त्व प्राप्त झाले. पण, ‘हवामान बदल’ ही समस्या निसर्गातील वेगाने बदलत्या परिस्थितीशी निगडित आहे. त्यामुळे लगेच ‘हवामान बदल’ नामक कुठलाही नवा रोग, आजार अथवा महामारीचा डॉक्टरांनी शोध लावला असून, या परिस्थितीमुळे उद्भवणार्‍या आरोग्यविषयक तक्रारींचे मूळ हे हवामान बदलांमध्ये असल्याचेच यानिमित्ताने अवघ्या जगासमोर विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आले.
 

कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात हवामान बदलाचा त्या महिलेच्या आरोग्यावर झालेला दुष्परिणाम समोर आणला, तो डॉ. मेरिट यांनी. या महिलेला उष्माघाताचा प्रचंड आघात सहन करावा लागला. इतका की, तिच्या शरीरातील जलांशही कमी होऊन तिला ‘डिहायड्रेशन’मुळे प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला. कॅनडामधील असली तरी ही महिला आर्थिकदृष्ट्या तितकीशी सक्षम नसल्यामुळे पक्क्या घरात वास्तव्यास नव्हती. ती एका ट्रक-ट्रेलरमध्येही राहत होती. या ट्रेलरमध्ये ‘एसी’ची व्यवस्था नसल्याने आणि ट्रेलर उष्णतेमुळे अधिक तापल्यामुळे या महिलेला उष्णतेच्या तीव्र लाटेचा फटका बसला.
 
 
 
तसेच याच परिसरात अतिउष्णतेच्या लाटेमुळे जंगलात वारंवार वणवा लागण्याच्या घटनाही घडल्या होत्या, ज्यामुळे परिसरात सर्वत्र धूर पसरून नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास जाणवू लागला. डॉ. मेरिट यांचे जवळच असलेले रुग्णालयही श्वसनासंबंधी तक्रारींनी ग्रासलेल्या रुग्णांनी ओसंडून वाहू लागले. त्यातच सदर महिला रुग्ण ही मधुमेही असल्याने आणि तिला हृदयासंबंधी समस्या असल्याने, अशा प्रतिकूल वातावरणात तिची परिस्थिती अधिकच खालावली.
 
 
 
म्हणूनच डॉ. मेरिट स्वत:हून या समस्येची गंभीर दखल घेत, हा सगळा हवामान बदलाचाच परिणाम असल्याच्या महत्त्वाच्या निष्कर्षावर येऊन पोहोचले. त्यामुळे इथे हे समजून घ्यायला हवे की, डॉ. मेरिट यांनी त्या महिला रुग्णावर केवळ औषधोपचाराचे सोपस्कारच पार पाडले नाहीत, तर त्याची अगदी परखडपणे कारणमीमांसाही जगासमोर मांडली. या घटनेवरुन केवळ कॅनडा सरकारच नव्हे, तर जगभरातील देश हवामान बदलाच्या जागतिक समस्येकडे अधिक गांभीर्याने लक्ष देतील, हाच यामागचा डॉ. मेरिट यांचा व्यापक उद्देश होता आणि त्यात प्रारंभी तरी ते यशस्वी झालेले दिसतात.
 
 
कुठल्याही शारीरिक व्याधींसाठी डॉक्टरांकडे गेलो असता, साहजिकच डॉक्टरांकडून औषधे देण्यापूर्वी रुग्णाला नेमका काय त्रास होतोय, ते जाणून घेतले जाते. पोटासंबंधी दुखणे असेल तर डॉक्टरांकडून समोर येणारा पहिला प्रश्न ठरलेला असतो, तो म्हणजे आपण नुकतेच बाहेरचे किंवा उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन केले होते का? त्याचप्रमाणे आता कॅनडातील डॉ. मेरिट यांच्या हवामान बदलाला केंद्रस्थानी आणणार्‍या या निदानामुळे श्वसनासंबंधी, उष्माघातासंबंधी आजारांकडेही आता अधिक गंभीर दृष्टिकोनातून पाहिले जाईल, अशी आशा करायला हरकत नाही.
 
 
या घटनेमुळे हवामान बदल आणि मानवी आरोग्यावर त्याचे होणारे दुष्परिणाम हा मुद्दा चर्चेत आला असला तरी या प्रकाराची ही काही पहिलीवहिली नोंद आहे, असेही नाही. कारण, संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी हवामान बदलामुळे तब्बल दीड लाख नागरिकांचे जगभरात बळी जात असल्याचे विदारक वास्तव उजेडात आणले होते. तसेच हवामान बदलांमुळे ओढवणार्‍या बळींची संख्या २०३० पर्यंत ही दुपटीने वाढण्याची भीतीदेखील याच अहवालात मांडण्यात आली होती.
 
 
 
खासकरुन आफ्रिका, द. अमेरिकेसारख्या उष्णकटिबंधीय क्षेत्रात हवामानबदलाचे भीषण परिणाम भविष्यात जाणवू शकतात, असा इशाराही या अहवालाने दिला होता. तेव्हा, आता केवळ हवामान बदलावरील परिषदा भरवून, केवळ चर्चांचे फड न रंगवता ठोस कृती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जगभरातील देशांनी आपापसातील मतभेद दूर सारत, मानवजातीच्या स्वास्थ्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी हवामान बदलाच्या समस्येवर सामूहिक मात करायलाच हवी.@@AUTHORINFO_V1@@