चीनमध्ये कोरोना मार्चमध्येच आटोक्यात !

    दिनांक  28-Jun-2020 15:52:57
|
Xi_JingPing_1  
वॉशिंगटन : जगभरात कोरोना रुग्ण संख्या आता एक कोटीच्या घरात गेली आहे. केवळ १८० दिवसांत कोरोनाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले. ३१ डिसेंबर २०१९ रोजी चीनतर्फे जागतिक आरोग्य संघटनेला याबद्दल प्रथम माहिती देण्यात आली होती. त्यावेळी चीनमध्ये ५४ रुग्ण होते. तीन महिन्यांनी दोनशेहून अधिक देशात कोरोनाने फैलाव केला आहे.


या महामारीची सुरुवात जरी चीनमध्ये झाली मात्र, अमेरिका, ब्राझील, रशिया, भारत आणि ब्रिटेन या देशांना जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक फटका बसला आहे. या देशांमध्ये एकूण कोरोना बाधितांपैकी ५३ टक्के म्हणजेच ५३ लाख २८ हजार ४४९ रुग्ण आहेत. चीनमध्ये ६ मार्च २०२० नंतर दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचे प्रमाण शंभरहून कमी झाले. तीन महिन्यांतच कोरोनावर नियंत्रण मिळवले. आत्तापर्यंत तिथे ८३ हजार कोरोना रुग्ण आढळले होते. त्यात मृत्यूचा दर हा खूपच कमी होता. चीनमध्ये कोरोनामुळे ४ हजार ६३४ जणांचा मृत्यू झाला. 


संक्रमणाचा वेग पाहिल्यास २५ लाख कोरोना रुग्ण हे सुरुवातीच्या १११ दिवसांत आढळले. मात्र, पुढील ६७ दिवसांत कोरोनाचे ७५ लाख रुग्णसंख्या वाढली, जगभरात कोरोनाच्या संक्रमणाची संख्याच इतकी आहे की, अनेक देशांची लोकसंख्याही त्याहून कमी आहे. १४४ असे देश आहेत, तिथली लोकसंख्या ही एक कोटींच्या खाली आहे. इस्त्रायल, युएई, ऑस्ट्रीया, बेलारुस आदी देशांचा यात सामावेश होतो. 


जगभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ५३ लाखांहून अधिक आहे. जगात कोरोना रिकव्हरी रेट हा ५४.०८ टक्के इतका आहे. प्रत्येकी शंभर रुग्णांमागे ५४ रुग्ण बरे झाले आहते. जगातील सर्वाधिक प्रभावी देशांमध्ये सर्वात जास्त रिकव्हरी रेट हा रशियाचा ६१.६६ टक्के इतका आहे. ब्राझील ५४.४९ टक्के आणि अमेरिकेचा ४१.८६ टक्के इतका आहे. मात्र, कोरोनाने जगभरात पाच लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. जगाचा मृत्यू दर हा पाच टक्क्यांवर आहे. ब्रिटेन १४.०३ टक्के अमेरिका ४.९९ टक्के, ब्राझील ४.३८ टक्के, भारत ३.०७ टक्के, असे विविध देशांचे मृत्यूदर आहेत. सर्वात कमी मृत्यू दर असलेला देश रशिया आहे. तिथल्या मृत्यूदराचे प्रमाण हे १,४२ टक्के आहे. 


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.