पतंजलीच्या ‘कोरोनिल’वर महाराष्ट्रात बंदी!

    दिनांक  25-Jun-2020 14:09:31
|

Coronil_1  H xराज्यात कोरोनिल विकले जाणार नसल्याचे गृहमंत्र्यांचे ट्विट!

मुंबई : पतंजलीने निर्माण केलेल्या ‘कोरोनिल’ आणि ‘श्वासारी’ या कोरोना किटला महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. याआधी राजस्थान सरकारने या औषधावर बंदी घातली होती. पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केले आहे. या औषधाबाबत जयपूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सर्व तपासणी करत आहे. योगी रामदेव यांना बनावट औषधांच्या विक्रीला महाराष्ट्रात परवानगी मिळणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनावरचे औषध असा दावा करणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेला हे प्रमाणपत्र कुणी दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्र सरकारने तर पतंजलीकडून सगळी कागदपत्रे मागितली आहेतच, पण ज्या उत्तराखंड सरकारच्या आयुर्वेद मंत्रालयाच्या लायसन्सनंतर हा सगळा दावा केला जात होता, त्यांनीही याबाबत काल धक्कादायक विधान केले आहे. बाबा रामदेव यांच्या औषधाला आम्ही परवानगी दिली, पण ते औषध केवळ प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, ताप आणि खोकल्यावर उपाय म्हणून आम्हाला परवानगी मागितली होती, त्यात कोरोनाचा कुठलाही उल्लेख नव्हता, असे उत्तराखंडच्या आयुर्वेदिक औषध परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.


केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी एका वाहिनाशी बोलताना बाबा रामदेव यांनी मंत्रालयाच्या परवानगीशिवाय हे औषध बाजारात आणायला नको होते अशी प्रतिक्रिया दिली होती. सगळी कागदपत्रे आम्ही त्यांच्याकडून मागितली आहेत. हा विषय आयुष मंत्रालयाच्या टास्क फोर्सकडे सोपवण्यात आला आहे. सर्व परीक्षण झाल्यानंतरच याबाबतीतला निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.