'आयसीएसई'च्या परीक्षांना परवानगी नाही ! : राज्य सरकारची भूमिका

    दिनांक  24-Jun-2020 19:44:34
|
Uddhav_Thackeray_1 &

मुंबई : महाराष्ट्रात आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यास परवानगी देणार नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात मांडली. या संदर्भातील पुढील सुनावणी सोमवारी २९ जून रोजी होईल. आयसीएसईची दहावीची उर्वरित विषयांची परीक्षा २ ते १२ जुलै दरम्यान आणि बारावीची उर्वरित परीक्षा १ ते १४ जुलै दरम्यान घेण्याचे बोर्डाने जाहीर केले होते.मुंबईसह आणि संपूर्ण राज्यभरात कोरोनाचा धोका वाढतच असल्याने त्याविषयी चिंता व्यक्त करतानाच अशा परिस्थितीत आयसीएसई बोर्डच्या दहावी व बारावीच्या उर्वरित परीक्षेविषयी परवानगी देणार की नाही, याबद्दल राज्य सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, असे निर्देश मुख्य न्यायूमर्ती दीपांकर दत्ता व न्या. एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने दिले होते.राज्याचे माहाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. हा निर्णय मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आला. खंडपीठाने पुढील सुनावणी सोमवारी ठेवली आहे. राज्यावर कोरोना संकट कायम असताना दहावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा २ ते १२ जुलैदरम्यान आणि बारावीची उर्वरित परीक्षा १ ते १४ जुलैदरम्यान घेण्याचा बोर्डाचा निर्णय विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठीही धोकादायक आहे', असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले.  मुंबईतील एका विद्यार्थ्याचे पालक असलेले उच्च न्यायालयातील वकील अॅड. अरविंद तिवारी यांनी याचिकेद्वारे त्याला आव्हान दिले आहे. यावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.