धारावीतील हाय रिस्क झोनमध्ये क्वारंटाईन क्षमतेत वाढ

    दिनांक  09-May-2020 20:36:15
|

dharavi_1  H x
मुंबई
: धारावीतील हाय रिस्क झोनमध्ये क्वारंटाईन क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. धारावीत सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित सापडत आहेत. या परिस्थतीत क्वारंटाईन क्षमता वाढवा अशा सूचना मुंबईत पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने मुंबई महापालिका प्रशासनाला केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.


मुंबईत वाढत चाललेला कोरोना संसर्ग चिंतेची बाब ठरत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे एक पथक मुंबईत दाखल झाले होते. या पथकाने मुंबईतील वरळी, धारावी आदी हाय रिस्क भागांची पाहणी केली. यावेळी वरळी कोळीवाडा हे देशातील कोरोनामुक्तीचे एक उत्तम उदाहरण होऊ शकते, असा विश्वास या पथकाने व्यक्त केला होता. वरळी कोळीवाड्याप्रमाणे धारावीतील हाय रिस्क झोनमधल्या लोंकाना क्वारंटाईन करण्याची क्षमता जास्तीत जास्त वाढवा अशा सूचनाही या पथकाने केल्याची माहिती पालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. केंद्रीय पथकाने केलेल्या सूचनेनुसार आम्ही धारावीत क्वारंटाईन क्षमता वाढविली असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय पथकाने आपल्या पाहणीतील निष्कर्ष मुख्यमंत्र्यासमोर मांडले. यात प्रामुख्याने डोअर टू डोअर सर्व्हेवर भर दिला जावा, त्यासाठी स्वंयसेवकांची संख्या वाढविण्यात यावी अशा सूचनाही पथकाने केल्या आहेत. त्याचीही अंमलबजावणी धारावीत केली जात असल्याचे सहाय्यक आयुक्त दिघावकर यांनी सांगितले.


धारावीत दिवसभरात २५ नवे रुग्ण


धारावीत गेल्या २४ तासांत २५ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ८३३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत गेल्या २४ तासांत एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २७ वर पोहोचला आहे. मुस्लिम नगर , माटुंगा लेबर कॅम्प , इंदिरा नगर , लक्ष्मी चाळ , जनता सोसायटी , सर्वोदय सोसायटी , सोशल नगर, मुकुंद नगर, सोशल नगर, काळा किल्ला, कुंची कुरवे नगर, या परिसरात आतापर्यंत कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण मोठ्या संख्येने सापडले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.