‘प्रधानमंत्री आप से बात करना चाहते है’ : मोदींच्या फोनमुळे मुकुंदरावांना सुखद धक्का

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2020
Total Views |
PM Modi and Mukund Kulkar
 
 
 
 
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी प्रदेश कार्यालय सचिव मुकुंदराव कुलकर्णी यांना शुक्रवारी सकाळी मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने मुकुंदरावच बोलत आहेत का याची खात्री केली आणि सांगितले, “ फोन डिसकनेक्ट मत किजीये, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आपसे बात करना चाहते है !” 
 
मुकुंदराव कुलकर्णी यांना आश्चर्याचा धक्का बसला. देशाचे पंतप्रधान आपल्याशी काय बोलतील अशा विचारात ते पडले असतानाच पलिकडे फोन जोडला गेला आणि आश्वासक आवाज ऐकू आला, “मुकुंदराव कैसे हो ?” कोरोनाच्या जागतिक साथीच्या संकटाचा सामना भारतही करत आहे. या गंभीर परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळात वेळ काढून आपल्यासारख्या कार्यकर्त्याला फोन करून विचारपूस करावी, हा अनुभव विलक्षण होता.
 
 
"आपण घरी असाल म्हणून तुमची चौकशी करण्यासाठी फोन केला. तुमच्या सारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी चाळीस - चाळीस वर्षे पक्षाचे काम केले आहे, हे कधी विसरता येणार नाही. देशावर कोरोनाचे संकट आहे, पण आपल्याला त्यातून देशाला बाहेर काढायचे आहे. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, असे मा. मोदी मुकुंदराव कुलकर्णी यांना म्हणाले.
 
 
अनपेक्षितपणे पंतप्रधानाचा फोन आल्यामुळे आणि त्यांनी कोरोनाच्या संकटकाळात आपुलकीने चौकशी केल्यामुळे मुकुंदरावांना आनंद झाला आणि भरूनही आले. त्यांनी जनसंघाच्या काळापासून पक्षाचे काम केले आहे. भाजपाच्या स्थापनेसाठी १९८० साली मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन झाले त्यावेळी त्या अधिवेशनाच्या व्यवस्थेत ते पक्षाचा पदाधिकारी म्हणून सहभागी होते. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी त्यांचा परिचय होता. श्रद्धेय अटलजी त्यांच्या घरी आले होते. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणींचा स्नेह त्यांना लाभला. कार्यालय सचिव म्हणून भाजपा प्रदेश कार्यालयाची जबाबदारी त्यांनी दीर्घकाळ सांभाळली. त्यानंतर सध्या ते प्रदेश कार्यालयाच्या ग्रंथालय आणि डॉक्युमेंटेशन विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत.
 
मोदींशी पूर्वी परिचय झाला होता. परंतु, २०१४ साली ते पंतप्रधान झाल्यानंतर कधीही संपर्क आला नाही. अचानक त्यांचा फोन यावा आणि त्यांनी आवर्जून पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्याची कोरोनाच्या संकटात विचारपूस करावी, हा अनुभव थक्क करणारा होता.
देशावर कोरोनाचे भयानक संकट आले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी डगमगले नाहीत. ते ठामपणे निर्णय घेत आहेत आणि प्रभावी कारवाई करत आहेत. विविध समाज घटकांशी बोलत आहेत. लोकांना त्यांचा भरवसा वाटतो. मुकुंदराव यांनी मोदीजींना आवर्जून लोकभावना सांगितली. अवघ्या दोन मिनिटांच्या या संभाषणामुळे आयुष्यभर जपावा असा आठवणीचा ठेवा त्यांना मिळाला.
 
 
( मुकुंद कुलकर्णी हे भाजपचे माजी प्रदेश कार्यालय सचिव व प्रदेश कार्यालयाच्या ग्रंथालय आणि डॉक्युमेंटेशन विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत.)
 
@@AUTHORINFO_V1@@