तब्लीग-ए-जमात : मरकझमध्ये उपस्थिती लावलेले पुण्यातील ६० लोक विलगीकरणात

    दिनांक  01-Apr-2020 10:47:35
|

delhi markaz_1  


एकूण उपस्थित लोकांपैकी ५० जणांचा शोध अद्याप सुरूच...


पुणे : दिल्लीतील निझामुद्दीन तब्लीग मरकझ येथील धार्मिक कार्यक्रमात पुण्यातील १३० हून अधिक लोक उपस्थित होते, आतापर्यंत यातल्या ६० लोकांना शोधून विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या १३० पुण्यातील लोकांचा शोध घेतला जात आहे त्यातले अनेक लोक हे सध्या पुण्यात नाही किंवा त्यांचा शोध लागत नाही अशीही माहिती त्यांनी दिली आहे.


विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या ६० लोकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाही, मात्र त्यांचे टेस्ट सॅम्पल पाठवण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे, तर उर्वरित लोकांचा शोध घेतला जात आहे असंही ते म्हणाले.


तब्लीग मरकझमधील २४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झालं. या परिसरातील ३०० जणांना दिल्लीतील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थिती लावलेल्या ७ जणांचा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला होता. त्यातील ६ हे तेलंगणामधले होते तर १ जण काश्मीरमधला होता. तब्लीग मरकझमध्ये ८ मार्च ते २१ मार्च या काळात धार्मिक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमासाठी देशातूनच नाही जर जगभरातून लोक आले होते. जवळपास ३ हजार लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.