ऑलिम्पिक ढकलणार पुढे? जपानचे संकेत

    दिनांक  23-Mar-2020 13:38:56
|

Olympic 2020_1  

दुहेरी दणक्यानंतर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे नरमले

 
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. चीन, इटली सह अनेक देशांमध्ये कोरोनामुळे नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. तसाच क्रीडा क्षेत्रालाही कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने जगभरातून समोर आले होते. त्यानंतर सर्व महत्त्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आणि काही स्पर्धा पुढे ढकललेल्या होत्या. पण जपानने अद्याप टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकबाबत कुठलाही निर्णय घेतला नव्हता. तसेच आहे त्याच वेळापत्रकानुसार ऑलिम्पिक होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता ऑलिम्पिक पुढे ढकलणार असल्याचे संकेत जपानकडून देण्यात येत आहेत.
 
 
 
यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद जपानकडे आहे. २४ जुलै ते ९ ऑगस्ट या दरम्यान ही ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित आहे. करोनाच्या संकटामुळे स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलावे अशी मागणी विविध स्तरातून केली जात होती. पण स्पर्धा नियोजित वेळीच होणार असा पवित्रा जपानचे सरकार आणि ऑलिम्पिक समिती यांच्याकडून घेण्यात आला. त्यानंतर आधी कॅनडा आणि नंतर ऑस्ट्रेलियाने आपले खेळाडू या स्पर्धेसाठी पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे या दुहेरी दणक्यानंतर जपानचे सरकार नरमलं असून प्रथमच ऑलिम्पिकचे आयोजन लांबणीवर टाकण्याचे संकेत देण्यात आले आहेत. सध्याची स्थिती पाहता ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलणे हे कदाचित अनिवार्य असल्याचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी म्हटले आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.