मुंबई : ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ने (व्हीपीएफ) बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहयोगाने राबविलेल्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे रविवार, दि. १३ जुलै रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी, ‘एसएफसी इन्व्हार्यमेंटल टेनोलॉजीज’ चे सहसंस्थापक व संचालक संदीप परब हेदेखील उपस्थित असेल. या प्रकल्पाचे कौतुक करत असतानाच "वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याची संधी मिळाल्यास जरुर शिकावे,” असा सल्ला शेलार यांनी दिला.
‘विवेक पार्क फाऊंडेशन’च्या वाईल्ड लाईफ रिसर्च डिव्हिजनच्या माध्यमातून बोरिवली राष्ट्रीय उद्यानात गवताळ भूमी परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी शेलार यांच्या हस्ते पार पडले.यावेळी ‘एसएफसी’चे संदीप परब यांच्या समेवत राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि वनसंरक्षक अनिता पाटील, ‘विवेक पार्क फाऊंडेशन’चे कार्यकारी संचालक विक्रम शंकर नारायणन आणि संस्थापक संचालक किरण शेलार, गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे प्रोजेट इन-चार्जरोविनतोडणकर उपस्थित होते. यावेळी, अनिता पाटील यांनी शेलार यांचे स्वागत केले, तर किरण शेलार यांनी हा प्रकल्प राबविण्यामागची भूमिका स्पष्ट केली. रोविनतोडणकर यांनी या प्रकल्पातील शास्त्रीय बाबींचा उलगडा शेलार यांच्यासमोर केला.
राष्ट्रीय उद्यानात गवताळ अधिवास निर्माण करण्याचा हा पहिलाच प्रकल्प आहे. याअंतर्गत राष्ट्रीय उद्यानातील गाभा क्षेत्रातील दोन हेटर परिसरावर देशी गवत प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या जागेला कुंपण घालून त्यामध्ये लागवड केली जाणार आहे. वर्षभर या लागवडीची देखरेख करून गवताला वाढण्याचा पुरेसा वेळ देऊन त्यानंतर कुंपण काढण्यात येईल. तृणभक्षी प्राण्यांच्या दृष्टीने कुरण विकासाचा हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वर्षभर गवताला वाढण्याचा वेळ दिल्याने गवताच्या मुळांची आणि ठोंबांची वाढ जमिनीअंतर्गत चांगली होईल. त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांनी जर गवत खाल्ले, तरी पावसाळ्यात ठोंबांमधून पुन्हा फुटवे फुटून त्यामधून गवाताची वाढ होत राहील. महत्त्वाचे म्हणजे वीजवाहक तारांच्या खाली ही लागवड करण्यात आली. कारण वीजवाहक तारांच्या खाली कोणत्याही प्रकारे वृक्ष लागवड केली जात नाही. त्यामुळे त्याठिकाणी कुरण विकासाचा हा प्रकल्प राबविण्यात आला आहे.
वीज वाहकतारांखालील मोकळ्या जागेचा पर्यावरणीय सदुपयोग
हा प्रकल्प राबविल्याबद्दल मी ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ आणि ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासना’चे कौतुक करतो. वीजवाहक तारांच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेचा केवळ सदुपयोग नाही, तर पर्यावरणीयसदुपयोग करण्याचा विचार या प्रकल्पाच्या माध्यमातून झाला आहे. त्यामुळे केवळ गवताची लागवड नाही, तर पर्यावरणीय परिसंस्थेसाठी काय फायदा आहे, याचा विचार झाला आहे.
- आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री