महाविकास आघाडीत बिघाडी : मिलिंद देवरांचे सोनियांना पत्र

    दिनांक  28-Jan-2020 12:23:50
Milind-Devora-Sonia-Gandhमुंबई :
मिलिंद देवरा यांनी थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहील्याने तीन दिवसांत तिसऱ्यांदा महाविकास आघाडीतील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीदरम्यान आपण दिलेल्या आश्वासनांची पूर्ती महाविकास आघाडी सरकारने करावी, अशी अपेक्षा देवरा यांनी व्यक्त केली आहे. देवरा यांनी हे पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांकडे न देता थेट पक्षाच्या अध्यक्षांना दिल्याने याबद्दल पक्षात नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
 
महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी यांनी त्यांच्या मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसनेही वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात करावी, असे मिलिंद देवरा यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रात म्हटले. महाविकास आघाडी राज्यात चांगले काम करत आहे. मात्र, काँग्रेसकडून आश्वासनांची पूर्तता लवकर करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांकडून वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच ठेवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाला अशोक चव्हाण यांनी शिवसेनेकडून संविधानाबाहेर कुठलेही काम केले जाणार नाही, याची लेखी हमी घेतल्याचे विधान केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने या वक्तव्यावरून अशोक चव्हाणांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. 'अशोक चव्हाणांनी चुकीच्या प्रकारे वक्तव्य केले', अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.