पालिकेचे ‘बजेट’ कोलमडण्याची चिन्हे

    16-Jan-2020
Total Views | 70

उत्पन्नात घट; _1 &nb


आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढण्याची विरोधी पक्षांची मागणी



मुंबई : देशातली सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या उत्पन्नामध्ये प्रचंड घट झाली असून, उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असल्याने पालिकेचे बजेट कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत. विरोधी पक्षांनी तर पालिकेच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.

महापालिकेचे ३० हजार कोटी रुपयांहून अधिक बजेट असले तरी सध्याच्या स्थितीत उत्पन्नाला घरघर लागली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात २५ हजार, ५१३ कोटी रुपये उत्पन्नाचे लक्ष्य होते. मात्र, नोव्हेंबरअखेर यापैकी १२ हजार, ९३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. महसुलाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या माध्यमातून ५,०१६ कोटी रुपयांचे लक्ष्य असताना १३८७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दुसरीकडे खर्चात मात्र वाढ होते आहे. कर्मचार्‍यांना वेतनापोटी दिली जाणारी रक्कम १७ हजार कोटींवरून १९ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. बेस्ट उपक्रमाला सुमारे २१ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. महापालिकेच्या ७० हजार कोटी रुपयांच्या ठेवी असल्या तरी त्या कोस्टल रोड, गारगाई-पिंजाळ प्रकल्प, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी त्यातून पैसा पुरवावा लागणार आहे. त्यामुळे बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत.

प्रकल्पांकरिता निधीकसा उभारणार?

भविष्यात पालिकेच्या सुरू असलेल्या प्रकल्पांकरिता कशाप्रकारे निधी उभारला जाणार आहे, याची माहिती पालिकेने द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. पालिकेला अनुदान म्हणून मिळणारे ४३३१ कोटी रुपये राज्य सरकारकडून अद्याप मिळालेले नाहीत. हे अनुदान राज्य सरकारकडून मिळवण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत, याची सविस्तर माहिती श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून स्थायी समिती आणि गटनेत्यांच्या बैठकीत सादर करावी, अशी मागणी महापौर आणि आयुक्तांकडे करण्यात आल्याची माहिती रवी राजा यांनी दिली.

आर्थिक परिस्थितीवर श्वेतपत्रिका काढा

पालिकेचे उत्पन्न कमी होण्यास प्रशासनाचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विकासकामे आणि प्रकल्पांचे काम करण्यासाठी दरवर्षी बँकांमधील ठेवी काढल्या जात आहेत. पालिकेचा महसूलही कमी प्रमाणात वसूल होत आहे. असेच सुरू राहिल्यास पालिकेला तुटीचा अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे. यामुळे पालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर श्वेतपत्रिका काढून स्थायी समिती व गटनेत्यांच्या सभेत सादर करावी, अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून करण्यात आली आहे. तसे पत्र महापौर आणि पालिका आयुक्तांना दिले असल्याची माहिती विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली.






अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121