काम होवूक व्हया!

    दिनांक  17-Aug-2019 22:45:32


 


अहो, आधीच आपल्या कोकणात लांब लांबपर्यंत माणूस माणसा दिसणा नाय आणि त्यात याची भर. नाय मी काय म्हणतंय, सुधारणा हवीच. नको कशी. पण माणसासारखं जगायला पण शिकूक हवं की नाय सांगा तुमी...


आमच्या गावात सोमवारी लाईट जातात, हे ऐकून होतो. आज संध्याकाळी ते गेले आणि ऐकीवात असलेली गोष्ट प्रत्यक्षात अवतरली. भक्तनिवासात मी एकटाच होतो. गावी आम्हा मुंबईकरांचा वेळ जाणं आधीच कठीण. त्यात हे लाईट... जरा फेरफटका मारावा म्हणून बाहेर पडलो. कोपर्‍यावर पिंपळाचा पार होता. गावातील 'पिकलेली पानं' काळ वेळ न जुमानता त्यावर गजाली मारत बसत. आमच्या सिंधुदुर्गात 'गजाली' हा एक नित्यक्रम. 'गजाली' मारायला जागेचा काही नियम वगैरे कधीच नसतो. एखाद्याची रिक्षा, चहाची टपरी, न्हाव्याचं दुकान, वडा-पिंपळाचे पार या अन् अशा कुठल्याही जागा चालतात. अट काय, तर टेकवायला एखादं आसन हवं. ते एखादा दगड असो वा खुर्ची. मग अगदी राजकारणापासून ते एखाद्याच्या घरच्या भांडणापर्यंत इथे चर्चा रंगतात. बरं, हे करताना आपल्या वेळेचा अपव्यय वगैरे होतोय असं वाटलं तर तो कोकणी माणूस कुठला? त्या पिंपळाच्या पारावर बसलेल्या 'पिकल्या पानां'मध्ये मीही जाऊन बसलो. 'पानां'ची संख्या दोन-तीनचीच होती. पण चर्चा ऐन रंगात आलेली. कुठल्याशा 'घरातील जागेचं लफडं' हा चर्चेचा विषय होता. मी पारावर बसताच "काका छान जागा आहे तुमची..." असं म्हटलं. त्यावर "मुंबईतून इलस वाटतं?" मी ''हो.. का ओ?" असं विचारता 'नाय ह्या जागेक छान बोलणारे मुंबईतून हैसर चार एक दिवस र्‍हाऊक इलेले पावणेच असतात... गावातल्यांका ही जागा म्हणजे विटाळच वाटता...

 

आता आमका तरी या वयात दुसरं काय जमतलं... बरं गावात घर कुठेशी तुमचं?" मी "त्या खालच्या सुतारवाड्यात सुरुवातीलाच ते देसायांचं मातीचं घर आहेना तेच.." असं म्हणताच... "अरे म्हणजे धोंडी मास्तरांचे घर ते का? तुम्ही कोण त्यांचे?" त्यावर मी 'पणतू' असं म्हणता त्या तीनही 'पानां'चे हात नकळत जोडले गेले. "अरे धोंडी मास्तर म्हणजे मोठा माणूस हो... आमी जी काय शाळा शिकलो दुसरी-तिसरीपर्यंत का असेना ती तुमच्या पणजोबांमुळे. मी तुमका सांगतंय असा राजबिंडा माणूस परत या गावात होणा नाय हा. शाळेत पाय ठेवला की अख्खी शाळा उभी राहायची. गावात सरपंचापेक्षा धोंडी मास्तराक मान. गावासाठी खूप केलंय हा तुमच्या पणजोबांनी. लाख माणूस..." हे सगळं बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या सोबतचे बाकी दोघेही एखादं कीर्तन तल्लीन होऊन ऐकावं तसं ऐकत होते. "काय चहा बी घेतलं? नाय म्हणजे तेवढाच आमका समाधान. मास्तरांका गुरुदक्षिणा तुमका चहा पाजून" आम्ही सगळे हसलो. मोकळं हसणं काय असतं, ते या माझ्या गावच्या पिंपळाच्या पारावर बरेच दिवसांनी अनुभवायला मिळत होतं. घोटभर चहा झाला. चहा घेईस्तोवर त्यांचं त्यांचं काहीतरी बोलणं सुरू होतं. मग त्यातील दोघे नमस्कार करीत "चला येतो हां" असे म्हणून घराकडे जाण्यास निघाले. उरलेलं एक 'पान' अजूनही बसून होतं. "तुमका सांगतंय मी... गाव आता पयल्यासारखं रवणा नाय हा. लाईट इली, टेलिफोन इले, आता तर काय ते नेट का काय ते पण इला. पण, माणसं लांब गेली बघा.

 

अहो, आधीच आपल्या कोकणात लांब लांबपर्यंत माणूस माणसा दिसणा नाय आणि त्यात याची भर. नाय मी काय म्हणतंय, सुधारणा हवीच. नको कशी. पण माणसासारखं जगायला पण शिकूक हवं की नाय सांगा तुमी... आता तुमच्या पणजोबांसारखे लोक असत का सांगा मला. जो तो पैसा ओरबाडण्यात गुंतलेला. आता लोकांचे पाय त्या रवळनाथाक आणि नारायण मंदिराक वळतात ते कामं करवून घेण्याक, हे योग्य असता का? तुम्हीच सांगा. नाय म्हणजे तुम्ही मुंबईतली शिकलेली माणसं. ह्यांका कोण समजवणार? या अडाण्यांका सगळं खाटलावर हवा. मग आमी चार टाळकी बसतो या पारावर. आमचं काय हो, एक दिवस या पिंपळाच्या पिकल्या पानासारखं आमी पण गळून पडणार..." असं म्हणत तो माणूस उठला. आपला नेसलेला पंचा वजा धोतर सावरत तो मार्गस्थ झाला. मी मनात कल्पिलेली 'पिकल्या पानां'ची उपमा याने कशी ओळखली याचं मला आश्चर्य वाटलं. भोवती पडलेल्या अंधाराने हा देवचार किंवा एखादं पिशाच्च असल्याचे वाटून मी त्याचे पाय उलटे आहेत का, हे बघण्याचा प्रयत्न करू लागलो. पण, दुसर्‍याच क्षणाला त्याच्या उलट्या पायावरून माझं लक्ष त्याने सांगितलेल्या काही वाक्यांमुळे माझ्या सुलट्या झालेल्या विचारावर येऊन सुखावलं होतं. मीसुद्धा उद्याच्या सकाळी रवळनाथाला 'माझं अमुक एक काम होवूक व्हया' असं साकडं घालायला जाणार होतो!

 

- डॉ. अमेय देसाई