'उत्सवी' नानासाहेब...

    दिनांक  15-Aug-2019 20:30:59   
 


नानासाहेब शेंडकर शंभरच्या वर कर्मचार्‍यांना थेट रोजगार, सुशिक्षित तरुणांसाठी उद्योजकतेच्या संधी तर देत आहेतच; पण सोबत सामाजिक भान जपत पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची चळवळदेखील उभारत आहेत. त्यांचे कर्तृत्व पुढच्या पिढीसाठी वरदान आहे.

अहमदनगर जिल्हा हा स्वातंत्र्यसैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्याने महाराष्ट्राला, देशाला अनेक नररत्ने दिली. या जिल्ह्यातील लोणी मावळा म्हणजे तटबंदीमध्ये वसलेलं एक टुमदार गाव. या गावातल्या एका बहाद्दराने आपला दोन एकरातला थर्माकोलचा नफ्यातला चालणारा कारखाना बंद केला. कारण काय तर पर्यावरणाला थर्माकोल घातक असतो, याची त्यास जाणीव झाली. पर्यावरणाचा 'प' देखील ज्यावेळेस प्रचलित नव्हता, त्यावेळेस त्यांनी हा निर्णय घेतला होता. आयुष्यात अशाप्रकारे धोका पत्करून आव्हाने पेलण्याच्या क्षमतेमुळे या अवलियाचा ४५० रुपयांच्या मिल कामगाराच्या नोकरीपासून ते २० कोटी रुपयांचा उद्योगसमूह व्हाया एक पर्यावरणस्नेही उद्योजक हा प्रवास रंजक आहे. आयुष्यातली अनेक आव्हाने झेलणारे हे उद्योजक आहेत उत्सवी, साईनेज अ‍ॅण्ड ग्राफिक्स, आर्टिस्ट अशा विविध संस्थांचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब शेंडकर.

 

लोणीमावळा गावातलं शेंडकर कुटुंब म्हणजे एक तालेवार आणि सन्माननीय कुटुंब म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होतं. याच घराण्यातले एक म्हणजे महादू रामजी शेंडकर. त्यांच्या पत्नी सीताबाई. या शेंडकर दाम्पत्याला पाच मुले आणि एक मुलगी. यातलेच एक म्हणजे नानासाहेब. घोडे उधळण्याची कला नानास लहानपणापासून अवगत होती. नानाला गड-किल्ल्यांची लहानपणापासूनच आवड. शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला, तो किल्ला नानांनी वयाच्या दहाव्या वर्षीच सर केला होता. त्यांना लहानपणापासून चित्रकलेची प्रचंड आवड. संपूर्ण शेंडकर कुटुंबातले पुरुष आखाड्यामध्ये दोन हात करणारे, मात्र त्यांनी कुंचला हाती घेतला. चित्रकला आपलीशी केली. लोणी मावळामध्ये आपल्या कलेला काही वाव नाही, हे त्यांनी हेरले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर नाना वयाच्या १८व्या वर्षी मुंबईत दाखल झालेमुंबईत आल्यावर नानांनी कलाकारांची पंढरी मानल्या जाणार्‍या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स महाविद्यालयात 'डिप्लोमा इन आर्ट्स' साठी प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमाचा खर्च स्वत:च करावा लागणार होता. कारण, घरातून असलेला विरोध आणि आर्थिक टंचाई. म्हणून त्यांनी 'कॅलिकोडाईंग' या मिलमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. पगार होता फक्त ४५० रुपये.

 

आता रात्रीचं काम आणि दिवसा अभ्यास असा नानांचा प्रवास सुरू झाला. डिप्लोमा करत असतानाच दुकानावरचे बोर्ड रंगव, छत्रीवर डिझाईन काढून दे, अशी कामेदेखील नाना करत असत. त्यातून काही अंशी वरकमाई होत असे. त्यांनी 'स्टेज क्राफ्ट' या विषयात स्पेशलायझेशन केले. याच दरम्यान नाट्यक्षेत्रातील दिग्गज रघुवीर तळाशीकर, दामू केंकरे यांच्या नाटकांसाठी नेपथ्य केले. त्याप्रमाणे हिंदी सिनेक्षेत्रासाठीदेखील काम केले. टी. के. देसाई, रमेश सिप्पी, मनमोहन देसाई, मुखर्जी बंधू या दिग्गजांसोबतच नवकेतन फिल्म्स या देव आनंद, केतन आनंदच्या जवळपास सर्वच चित्रपटांसाठी 'आर्टिस्ट' म्हणून काम केले. त्याचप्रमाणे मराठीतील सुषमा शिरोमणी यांच्या बहुतांश चित्रपटांचे कलादिग्दर्शन त्यांनी केले.

 

नानांनी १९७८ साली 'साईनेज अ‍ॅण्ड ग्राफिक्स' नावाची कंपनी सुरू केली. या कंपनी अंतर्गत मोठमोठ्या दुकानांचे, मॉल्सचे बोर्ड्स, ट्रॅफिक बोर्ड, एक्झिबिशनमधले स्टॉल्स, शाळा-महाविद्यालयातले बोर्ड्स, कॉर्पोरेट्स कंपन्यांचे दिशादर्शक फलक तयार केले जातात. टाटा, आदित्य बिर्ला, गोदरेज, रिलायन्स, व्होडाफोन, हिंदुस्तान पेट्रोलियम, एअर इंडिया, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, सॅमसंग, स्टेट बँक ऑफ इंडिया अशा अनेक बहुराष्ट्रीय, सार्वजनिक उपक्रम, लघु-मध्यम दर्जाच्या कंपन्यांना सेवा पुरवते. कलाकार, ग्राहक आणि उद्योजक यांना व्यासपीठ मिळावे व एकाच छताखाली ग्राहकांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी नानासाहेबांनी 'आर्टिस्ट' नावाची संस्था उभारली.

 

२००१ साली थर्माकोलचा दोन एकरमधला ५० ते ७५ कारागीरांचा कारखाना बंद केल्यानंतर नानासाहेबांनी पर्यावरणपूरक मखर तयार करण्यासाठी कागदी पुठ्ठ्यांचा वापर केला. खरे तर ही सुरुवात १९९७ सालीच झाली होती. थर्माकोलला पर्याय म्हणून बांबू, चटई, लाकूडही वापरून पाहिले. सरतेशेवटी पाच वर्षांच्या संशोधनानंतर लो बजेट, वापरायला, बाळगायला, हाताळायला सोप्या असलेल्या पुठ्ठ्याचा पर्याय त्यांनी निवडला. त्यातूनच जन्माला आले कागदी पुठ्ठ्यांचे पर्यावरणस्नेही इकोफ्रेंडली मखर.

 

हे मखर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी कार्यशाळा व माहितीपर उपक्रम राबवले गेले. अल्पावधीत त्यांच्या मखरांची कीर्ती चहूकडे पसरली. अमेरिका, जर्मनी, दुबई, अबुधाबी, श्रीलंका या देशांमध्ये 'उत्सवी'च्या मखरांना मोठी मागणी आहे. म्हणूनच या देशांतील गणपती, 'उत्सवी'च्या पर्यावरणस्नेही मखरांमध्ये स्थानापन्न होतात. घरगुती तीन फुटांपासून ते अगदी सार्वजनिक ३० फुटांपर्यंतचे मखर येथे उपलब्ध आहेत. आज 'उत्सवी' संस्थेत पन्नासच्या आसपास कारागीर कार्यरत आहेत. पर्यावरणस्नेही मखरांसोबतच, दिवाळीसाठी पर्यावरणस्नेही कंदील, पर्यावरणस्नेही ख्रिसमसचे देखावेदेखील तयार केले जातात.

 

शिवाजी महाराज आणि गड-किल्ले हे नानासाहेबांचे जिव्हाळ्याचे विषय. पर्यावरणपूरक मखर तयार करायला घेतल्यापासून गड-किल्ल्यांचे प्रतिकात्मक मखर तयार करायचे त्यांच्या डोक्यात होते. यासाठी त्यांनी आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, डिझायनर्स अशा तंत्रज्ञांची मदत घेतली. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे पर्यावरणस्नेही मखर तयार करण्यात त्यांना यश आले. हे मखर तयार करण्यास अजून एक कारण होतं ते म्हणजे मुंबईतील लहान मुलं. मुंबईतील मुलांना किल्ले तयार करण्यासाठी या काँक्रीटच्या जंगलात मातीच उपलब्ध नाही. महाराष्ट्राच्या वैभवसंपन्न इतिहासाची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे ही मुले थर्माकोल वा प्लास्टर ऑफ पॅरिससारख्या निसर्गास घातक ठरणार्‍या घटकांकडे वळतात. त्यांना पुठ्ठ्यांचे हे मखर सशक्त पर्याय म्हणून आता उपलब्ध झाले आहेत.

 

घडी घालण्यायोग्य व कुठेही सहज वाहून नेण्याजोगे असल्याने हे मखर लोकप्रिय होत आहेत. फक्त गणेशोत्सवच नव्हे, तर अगदी शिवजयंती सोहळ्याच्या सजावटीस उत्तम पर्याय म्हणून या मखरांकडे पाहिले जात आहे. हे मखर नानासाहेब स्वत:च्या खिशाला चाट लावून तयार करतात. गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, या चळवळीमध्ये आपला देखील खारीचा वाटा असावा, या अपेक्षेने ते आर्थिक भुर्दंडदेखील सोसत आहेत. नानासाहेब शेंडकर शंभरच्या वर कर्मचार्‍यांना थेट रोजगार, सुशिक्षित तरुणांसाठी उद्योजकतेच्या संधी तर देत आहेतच; पण सोबत सामाजिक भान जपत पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची चळवळदेखील उभारत आहेत. त्यांचे कर्तृत्व पुढच्या पिढीसाठी वरदान आहे. आज खर्‍या अर्थाने नानासाहेब शेंडकरांसारख्या सामाजिक उद्योजकांची जगाला गरज आहे. (८१०८१०५२३२)