ताडोबा अभयारण्यात वाघिणीची शिकार

    दिनांक  13-Apr-2019चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाची शिकार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरीक्षेत्रात एक वाघीण मृतावस्थेत आढळली. मात्र, हा ताडोबातील वाघिणीचा नैसर्गिक मृत्यू नसून तिची शिकार करण्यात आली आहे. शिकाऱ्यांनी लावलेल्या फाशात अडकून दोन वर्षांच्या वाघिणीचा मृत्यू झाला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या सापळ्यात वाघ अडकला. त्यात त्याचा मृत्यू झाला. कोअर झोन हे वाघांसाठी सर्वात सुरक्षित मानले जाते. येथे जंगल आणि वन्यजीवांची सर्वाधिक घनता आहे. अशा ठिकाणी शिकारीसाठी सापळा लावला होता. यामुळे वन विभागाच्या सुरक्षा यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर क्षेत्रसंचालक आणि कोअर विभागाचे उपसंचालकांनी घटनास्थळी भेट दिली असून याची माहिती घेतली. ताडोबात वनअधिकारी असताना अशी शिकार कशी झाली, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat