‘पुणे तिथे काय उणे’ असं अगदी अभिमानाने म्हटलं जातं. कारण, येथे जो आला त्याची भरभराट झाली आहे. या पुण्याच्या गुणामुळेच अनेक लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी पुण्यात दाखल होतात. काटेशिरसगावचे अनंतराव साळुंके आणि त्यांची पत्नी लक्ष्मी हे जोडपंदेखील कामाच्या शोधासाठी १९४३ साली पुण्यात आलं. अनंतरावांना स्वस्तिक रबर कंपनीत सुपरवायझरची नोकरी मिळाली. एकीकडे देशात स्वातंत्र्यचळवळ जोरात होती. मात्र, साळुंके कुटुंब परिस्थितीशी दोन हात करत आपली गुजराण करत होते. साळुंके दाम्पत्यांच्या पोटी तीन मुले आणि एका मुलीचा जन्म झाला. अत्यंत साध्या अशा या कुटुंबाकडे पाहून त्याकाळी कोणी भाकित केलं असतं की, ‘पुढे जाऊन या मुलांपैकी एक करोडपती उद्योजक होईल,’ तर त्याला लोकांनी वेड्यातच काढलं असतं. मात्र, अनंतरावांच्या प्रभाकरने एक नवीन इतिहास निर्माण केला. अगदी शून्यातून सुरुवात करुन आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला ‘सुमीत ग्रुप’ नावाचा उद्योगसमूह निर्माण केला.
पुण्याच्या स्वामी विवेकानंद शाळेतून दहावी झाल्यानंतर प्रभाकरचं मन शिक्षणात रमलंच नाही. मुलगा असाच उनाडक्या करण्यापेक्षा त्याला आपल्यासोबत कामाला घ्यावं म्हणून अनंतरावांनी ते काम करत असलेल्या स्वस्तिक रबर कंपनीत मालकाला सांगून प्रभाकरला कामाला ठेवले. १९८५ साली प्रभाकर महिना ८०० रुपये पगारावर स्क्रीन प्रिंटर म्हणून काम करु लागला. झपाट्याने काम करणं हा प्रभाकरचा हातखंडा. अजून काय काम करु, असे तो आपल्या वरिष्ठांना विचारायचा. तिथे अनंत काते नावाचे एक संचालक होते. प्रभाकरचा हा उत्साह पाहून अनंत काते यांनी प्रभाकरला स्क्रीन प्रिंटिंगचं एक छोटंसं कंत्राट दिलं. रबरवर स्क्रीन प्रिंटिंगचं काम होतं ते. काम उत्तम झालं. प्रभाकरचा उत्साह दुणावला. दरम्यान, काही कंपन्यांचे कंत्राट त्यास मिळाले. त्याचे काही नातेवाईक आणि मित्र व्यवसायात मदत करु लागले. प्रिंटिंगच्या निमित्ताने तो अनेक कंपन्यांमध्ये जात असे. तेव्हा त्या कंपन्यांना सफाई काम करणार्या कंपन्यांची गरज असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
या कंपन्यांना आपण अशा सुविधा पुरवल्या तर? डोक्यात कल्पना चमकून गेली. प्रभाकर स्वस्थ बसला नाही. लगेच त्याने आपल्या भावाला कल्पना सांगितली. त्यातूनच १९९२ साली जन्माला आली ‘सुमित फॅसिलिटीज.’ बँक ऑफ महाराष्ट्राकडून पाच हजार रुपयांचे कर्ज आणि वडिलांनी दिलेले ३५० रुपये अशा भांडवलावर ही कंपनी सुरु झाली. जिथे आयुष्यातील पहिली नोकरी केली, त्या कंपनीनेच स्वच्छतेचे कंत्राट दिले आणि हा प्रवास सुरु झाला. त्यानंतर प्रभाकरला कळलं की, काही कंपन्यांना सुरक्षा रक्षकाची गरज आहे. त्याने सुरक्षा रक्षक पुरवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या कामगारांना नवीन गणवेश आणि बूट्स देण्याइतपतदेखील पैसे नव्हते. प्रभाकर पुण्यातील जुन्या बाजारात जात आणि तेथील सैनिकांचे जुने गणवेश आणि जुने बूट्स सायकलवरुन घरी आणत असे. प्रभाकरची पत्नी सुनंदा हे गणवेश धूत असे, त्यांना इस्त्री करत असे, बूटांना पॉलिश करुन देई. यातूनच आजची अद्ययावत साधनांनी सुसज्ज अशी युनिक डेल्टा फोर्स सिक्युरिटी प्रा.लि नावाची उभी राहिली.
‘गरज ही शोधाची जननी आहे’ असे म्हटले जाते. त्यादृष्टीने प्रभाकर हे उद्योगजगताला कोणत्या सेवेची आवश्यकता आहे, याचा सातत्याने शोध घेत असतात. या शोधातूनच मनुष्यबळ पुरवणारी ‘ईगल इंडस्ट्रीअल सर्व्हिसेस प्रा.लि,’ अभियांत्रिकी सेवा पुरवणारी ‘सुमित कॉर्पोरेशन’प्रा. लि, इलेक्ट्रॉनिक सॉफ्ट स्टार्टर तयार करणारी ‘इनोव्हेटिव्ह इलेक्ट्रोसॉफ्ट इंडिया प्रा. लि,’ ई-सिक्युरिटी सेवा देणारी ‘युनिक डेल्टा टेक्नॉलॉजिझ प्रा. लि’ या कंपन्या निर्माण झाल्या. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ‘विशिष्ट सेवा मेडल’ प्राप्त केलेल्या ब्रिगेडियर महेश इरण्णा हे सुमित ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. संदेश नायर हे नौसेनेतून सेवानिवृत्त होऊन आज समूहामध्ये संचालकपदावर कार्यरत आहेत. गेली १७ वर्षे ते प्रभाकर साळुंकेची सावलीसारखी सोबत करत आहेत. यावरुनच या समूहाची ताकद कळून येते.
‘सुमित ग्रुप’ भारतातील १३ राज्यांमध्ये कार्यरत आहे. टाटा, विप्रो, टेक महिन्द्रा, ओएनजीसी, ह्युन्दाई, हिंदुस्थान पेट्रोलियम, फियाट, इन्फोसिस, किर्लोस्कर, भाभा अणुसंशोधन केंद्र, कॅपेजेमिनी, सह्याद्री अतिथीगृह, महाराष्ट्र सदन अशा उद्योगजगतातील आणि सरकारी मातब्बर संस्थांना सेवा पुरविण्याचे कार्य प्रभाकर साळुंके यांचा ‘सुमित ग्रुप’ मोठ्या जोमाने करतो. त्यांचे चिरंजीव सुमित आणि अमित हे दोघेही या उद्योगसमूहाची धुरा समर्थपणे वाहत आहे. पाच हजार रुपयांनी सुरु झालेली प्रभाकर साळुंकेंची वाटचाल ३०० कोटी रुपयांच्या उद्योगसमूहापलीकडे झेपावत आहे. या समूहात २० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहे.
‘हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन’च्या विनंतीनुसार स्थानिक पोलिसांसोबत सहकार्य करुन ‘युनिक डेल्टा फोर्स सिक्युरिटी’च्या ‘क्विक रिस्पॉन्स टीम’च्या गाड्या आज हिंजवडी शहरात गस्त घालत असतात. त्यामुळे या परिसरात कायदा- सुव्यवस्था उत्तम आहे. सुरक्षारक्षकांना शारीरिक प्रशिक्षण देण्यासाठी ‘डेल्टा सिक्युरिटी ट्रेनिंग अकादमी’ कार्यरत आहे. तिथे सुरक्षारक्षकांना अत्याधुनिक दर्जाचे सुरक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. वॉचमनचा मुलगा वॉचमन, सफाई कामगाराचा मुलगा सफाई कामगार हे दुष्टचक्र भेदून या नवीन पिढीने आधुनिक कौशल्य अवगत करावे, या हेतूने प्रभाकर साळुंके यांचा मुळशी भागात ‘सुमित ग्रुप’च्या कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा उभारण्याचा मानस आहे.१० एकर परिसरात २०० विद्यार्थी येथे उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊ शकतात. प्रभाकर साळुंके यांच्या कौशल्य विकास क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल श्रीलंकेच्या विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली आहे. माणसांशी जिव्हाळ्याचं नातं, विश्वास, चिकाटी, प्रचंड कष्ट, नाविन्याचा शोध आणि आधुनिकतेची कास या गुणांवर हा उद्योगसमूह उभा राहिला आहे. पुण्याच्या रस्त्यावरुन एखादी मोटरकार जाताना कौतुकाने तिच्याकडे पाहणारा तो मुलगा आज ३०० कोटी रुपयांचा उद्योगसमूह उभारतो हे कोणत्याही युवकासाठी प्रेरणादायी आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
Rahul Narvekar felicitated program organized by the Cuffe Parade Federation...