गडकरी, मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

    दिनांक  21-Oct-2019 11:40:16नागपूर : राज्यभरात मतदारांनी चांगला प्रतिसाद दाखवला आहे. मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली असून अनेक दिग्गजांनी आपला हक्क बजावला. यावेळी, नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पत्नी कांचन गडकरी यांच्यासह दोन मुलांच्या कुटुंबासोबत आपला मतदानाचा हक्क बजावला तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आपल्या कुटुंबीयांसोबत मतदान केले.

 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात जे काम झाले आहे, त्याच्या जोरावर या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळेल. तसेच देवेंद्र फडणवीस हेच पुढील मुख्यमंत्री होतील." असा विश्वास नितीन गडकरी यांनी दर्शविला. तसेच ते पुढे म्हणाले की, "जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, त्यापैकी कुणा एकाला तरी मतदान करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, नागरिकांनी नोटाचा उपयोग टाळणे हे देखील गरजेचे आहे. उपलब्ध उमेदवारांपैकी कोणीच नाही असे म्हणणे आजही लोकशाहीमध्ये योग्य आहे असे मला वाटत नाही."

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नागपूरमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, "महाराष्ट्रातील सर्वात मोठा महोत्सव आज आहे. मी सहकुटुंब मतदान केले आहे. मतदारांनीसुद्धा मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे. लोकशाहीत आपण ज्यांना निवडतो त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असतात"