भाजावळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
 
 
कोकणातले शेतकरी पिढ्यान्पिढ्या जमिनीची भाजावळ करतायत आणि त्याचे फायदे अनुभवतायत. ‘भाजावळ सर्वथा अयोग्य आहे,’ असा कृषी विद्यापीठांकडून आणि पर्यावरणवाद्यांकडून जो एकांगी प्रचार सुरू आहे, तो चुकीचा आहे. याच्या दोन्ही बाजू बघितल्या जायला हव्यात.
 

कोकणातले शेतकरी पेरणीअगोदर जमिनीची भाजावळ करतात ती सर्वथा अयोग्य आहे, असा एक सूर कृषी विद्यापीठांकडून आणि पर्यावरणवाद्यांकडून आळवला जातो. ‘भाजावळीमुळे धूर होऊन हवेचं प्रदूषण होतं; जमिनीतले सूक्ष्मजीव, गांडूळ इ. मरतात; तणांचं बी नष्ट होऊन त्याचा जैवविविधतेवर विपरीत परिणाम होतो; भाजावळीसाठी वृक्षतोड होते; पालापाचोळा जाळला गेल्यामुळे जमिनीतल्या सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कमी होतं; इत्यादी कारणांस्तव जमिनीची भाजावळ चुकीची आहे,’ असा एक मतप्रवाह बऱ्याच शेतीतज्ज्ञांमध्ये आणि पर्यावरणतज्ज्ञांमध्ये आहे. यामध्ये तथ्य असेलही, पण कोकणातल्या गावांच्या बाबतीत मात्र ही सगळी विधानं तंतोतंत लागू पडत नाहीत. दुसरं म्हणजे भाजावळीचे पर्यावरणावर काही दुष्परिणाम होत जरी असले तरी ती पूर्णपणे थांबवणं शेतकऱ्यांना शक्य आहे का? याही गोष्टीचा विचार व्हायला हवा. या संदर्भात कोकणातलं माझं अणसुरे गाव (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) आणि अन्य काही गावांमधलं निरीक्षण केल्यावर आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी बोलल्यावर भाजावळीबाबत निदर्शनास आलेल्या काही गोष्टी या लेखात मांडत आहे. हेच अंतिम सत्य आहे, असा माझा दावा नाही. पण भाजावळीविरुद्ध सध्या कृषी विद्यापीठांकडून आणि पर्यावरणवाद्यांकडून जो एकांगी प्रचार सुरू आहे, तो चुकीचा आहे. याच्या दोन्ही बाजू बघितल्या जायला हव्यात.

 

घाटावर जशी एकरोन्एकरी, लांबच्यालांब पसरलेली सलग शेतजमीन आहे, तशी कोकणात नाही. ती छोट्या छोट्या दळ्यांमध्ये विभागली गेली आहे. कोकणातलं डोंगरउतारावरचं क्षेत्र हे झुडूपी जंगलांनी आणि फळझाडांनी व्यापलेलं आहे. डोंगरांवरच्या सडेजमिनी आणि समुद्रसपाटीलगतच्या मळेजमिनी इथे थोडीफार भात, कडधान्य आणि भाजीपाल्याची शेती होते. जांभ्या दगडामुळे कोकणातली बहुतांश ठिकाणची माती ही भुसभुशीत नसून खडकाळ आहे. भरपूर पावसामुळे आणि उताराच्या जमिनींमुळे इथली बारीक माती सगळी वाहून जाते. पाऊस हे कोकणासाठी जरी वरदान असलं तरी इथल्या मातीची नैसर्गिक उत्पादकता ही तुलनेने कमी आहे. आमचं गाव खाडीकिनारी येत असल्यामुळे इथे मळेजमीन मुख्यत्वेकरून आढळते. सडेजमीन क्वचित आहे. इथले शेतकरी पिढ्यान्पिढ्या जमिनीची भाजावळ करून शेती करतायत आणि त्याचे फायदे अनुभवतायत. गेल्या चार-पाच वर्षांपासून गावातल्या आणि आजूबाजूच्या काही शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग म्हणून भाजावळ बंद करून पाहिली. मात्र त्याची त्यांना जी किंमत मोजावी लागते आहे, त्यावरून आधुनिकतेच्या वा पर्यावरणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भाजावळ बंद करायला सांगणं कितपत योग्य? हा प्रश्न उपस्थित होतो.

 

शेतकरी भाजावळ करतात ते मुख्यतः तणांचं बी मरून शेतात तण वाढू नये म्हणून. यासाठी भाजावळीचा निश्चित फायदा होतो. जास्त पावसामुळे कोकणात तणांचं प्रमाणही जास्त आहे. माझ्या पाहण्यातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी भाजावळ बंद केली त्या त्या शेतकऱ्यांच्या शेतात तण पहिल्यापेक्षा चौपट वाढलं. खुरपणी करण्याचे श्रम आणि खर्च वाढला. काही सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तणनाशक औषधंही शेतात घालावी लागली. असे शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडतात. ‘भाजावळ करू नका’ असं सर्वत्र ‘तज्ज्ञांकडून’ सांगितलं जातं, प्रत्यक्षात भाजावळ बंद केली तर शेतात तण उच्छाद मांडतं. मग नेमकं करायचं काय? या द्विधा मनस्थितीतून मग तणनाशक औषधं घालण्यासारखे अघोरी आणि पर्यावरणाला खरोखर घातक असलेले उपाय अवलंबले जातात. इथे साहजिकच एक प्रश्न उपस्थित होतो की, तण नियंत्रणात आणण्यासाठी रसायनं वापरावी लागत असतील, तर मग भाजावळ केलेली काय वाईट? भाजावळीचा आणखी एक मुख्य फायदा म्हणजे शेतजमिनीवर जाळलेल्या पातेऱ्याची राख मातीत मिसळते आणि आपसूकच जमिनीला पोटॅशियमचा पुरवठा होतो. (राखेत भरपूर पोटॅशियम असतं.) त्यासाठी कुठलं रासायनिक खत घालायची जरुरी भासत नाही. राखेमुळे पिकाला कीड-मुंगी लागण्याचं प्रमाणही कमी होतं. भाजावळीमुळे जमिनीतले गांडूळासारखे उपयोगी जीव मरतात, हे काही प्रमाणात सत्य असेलही. पण ही गोष्ट तात्कालिक आहे. त्यांचं पुनरुत्पादनही तेवढ्या वेगाने होत असतं. शिवाय शेणखत घालून जमिनीतल्या उपयोगी जीवांचं प्रमाण वाढवता येतं. भाजावळ ही साधारणतः मार्च-एप्रिलच्या दरम्यान वर्षातून एकदाच केली जाते. ३६५ दिवसांपैकी फक्त एक दिवस, तेही दिवसातला फार फार तर तासभर पातेरा पेटवून जमीन भाजली जाते. त्यामुळे एखादी जीवजातीच कायमची नष्ट होईल, एवढा तिचा प्रभाव निश्चितच नसतो.

 

भाजावळीसाठी शेतकरी वृक्षतोड करतातहे विधान कोकणच्या बाबतीत तरी धादांत खोटं आहे. कोकणात भाजावळीसाठी कुठलाही शेतकरी झाडं तोडत नाही, हे मी इथे पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो. भाजावळीसाठी फक्त पातेरा (वाळलेला पालापाचोळा) वापरला जातो. कोकणात डोंगरउतारांवर फळबागा आणि सागवान, शिवण, किंजळ, हसाणी, कुंभा, चारोळी, फणस, बांबू अशी भरपूर पानगळ होणारी झाडं विपुल प्रमाणात असल्यामुळे पावसाळ्यानंतर पुष्कळ पातेरा पडलेला असतो. त्यातलाही फार फार तर निम्मा पातेरा भाजावळीसाठी वापरला जातो. बाकी तसाच पडलेला असतो. त्याच्यामुळे झाडं तोडण्याचा प्रश्नच येत नाही. निरीक्षणातून हे सहज कोणाच्याही लक्षात येईलराहता राहिला मुद्दा प्रदूषणाचा. भाजावळ करताना धूर होतो हे खरं आहे. परंतु जैविक कचरा जाळला जात असल्याने यातून निघणारा बराचसा वायू हा कार्बन डायऑक्साईड असतो आणि थोड्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साइड हवेत सोडला जातो. कार्बन डाय ऑक्साईड झाडांकडून शोषला जात असल्याने तो निसर्गचक्राचा एक भाग आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणेच भाजावळ ही ३६५ दिवसांमधून फक्त १ दिवस, तीही जेमतेम तासभर केली जाणारी गोष्ट असल्यामुळे औद्योगिक प्रदूषणाच्या तुलनेत भाजावळीतून होणाऱ्या प्रदूषणाचं प्रमाण अत्यल्प आहे. कारखान्यांमधून २४ तास ३६५ दिवस हवेत धूर सोडला जात असतो. गेल्या दोनशे वर्षांत पेट्रोलियम, कोळसा, सिमेंट आणि इतर उद्योगांमधून तसंच वाहनामधून सोडल्या जाणाऱ्या धुरांमुळे हवेचं प्रदूषण अवाजवी पातळीला पोहोचलं आणि आता गळ्याशी आल्यावर,“भारतातले शेतकरी भाजावळ करून हवेचं प्रदूषण करतात; गाईच्या रवंथ करण्यातून मिथेन वायू बाहेर पडतो आणि त्यामुळे जागतिक तापमानवाढ होते,” अशा उलट्या बोंबा अमेरिकादी पाश्चात्त्य राष्ट्रं मारू लागली आहेत. ‘जागतिक समस्या’ बनण्याइतकं प्रदूषण भाजावळीतून मुळीच होत नाही.

 

शेवटी शेती हा माणसाने निसर्गात केलेला हस्तक्षेपच आहे. हा हस्तक्षेप कुठल्या पातळीपर्यंत मर्यादित ठेवायचा याचा विवेक बाळगणं महत्त्वाचं आहे. जंगलात राहून नुसती कंदमुळं आणि फळं भक्षण करणं ही सगळ्यात कमी हस्तक्षेपाची पहिली पायरी झाली. त्यानंतरची पायरी म्हणजे मातीत नुसत्या बिया पेरून बाकी काहीही न करता जे काही धान्य मिळेल ते घेणं. (मासानुबो फुकुओका यांच्या ’एका काडातून क्रांती’ सारखं). आणखी थोडा हस्तक्षेप वाढवणं म्हणजे नांगरणी, भाजावळ, उखणणी, खुरपणी इत्यादी भौतिक पद्धती वापरून शेती करणं. त्याच्याही पुढची पायरी म्हणजे संकरित बियाणी, रासायनिक खतं, कीटकनाशके वापरून केलेली शेती. या सगळ्या हस्तक्षेपाच्या पातळ्या आहेत. यापैकी तिसऱ्या पातळीवर गेल्या कित्येक पिढ्या भारतीय शेती स्थिरावली आहे आणि भाजावळ हे तिचं एक अविभाज्य अंग बनून गेलं आहेतात्पर्य, भाजावळीचा विचार हा सार्वत्रिकरित्या न होता प्रदेशनिष्ठ व्हायला हवा. भाजावळीमुळे खरोखरच एखाद्या प्रदेशात समस्या निर्माण होत असेल, तर त्याला पर्यायी पद्धती जरूर शोधाव्यात. भाजावळ न करताही यशस्वीपणे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची उदाहरणं कोकणात आहेत, पण ज्यांना भाजावळ केल्यावाचून गत्यंतर नाही, अशा शेतकऱ्यांना ती करताना अपराधीपणा वाटणार नाही, याची काळजी कृषी आणि पर्यावरणतज्ज्ञांनी घ्यावी, एवढीच अपेक्षा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@