संघर्षाचा वनवास भोगून यशस्वी उद्योजक बनलेल्या रामाची कथा

    दिनांक  19-May-2017   
 
 
 
सर्व सजीव पृथ्वीवर निसर्ग नियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत जुळवून घेऊ शकतात, त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. डार्विनचा हा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत १ जुलै १८५८ मधला. हा सिद्धांत प्रत्येक व्यक्तीलासुद्धा लागू होतो. आपल्या भोवतालच्या परिस्थितीला तोंड देत, संघर्ष करत जे पुढे जातात तेच यशस्वी होतात. परिस्थितीला दोष देणारे वा परिस्थिती बदलाची वाट पाहणारे अपयशी ठरतात. अशाच यशस्वी व्यक्तींपैकी तो एक. जगाची तोंडओळख होण्याअगोदरच पोरका झालेला. अनोळख्या मुंबईत येऊन नाईट स्कूलमध्ये शिकून पुढे पदवी मिळविणारा. ङ्गॅक्टरी जळूनसुद्धा परत उभारी घेणारा. शून्यातून औषध उद्योगक्षेत्रात स्वत:चं साम्राज्य उभारणारा. ही कहाणी आहे संघर्षाची. ही कहाणी आहे ‘ग्रिन्डलेज फार्मा’च्या रामकृष्ण कोळवणकरांची. कोकणातल्या राजापूरमधलं मूर हे एक खेडेगाव. या खेडेगावात रामकृष्णचा जन्म झाला. आईच्या वात्सल्याने हे जग कुठेतरी पाहायला सुरुवात करणारं, आईचं बोट धरून चालायला शिकणारं, तो रामकृष्णाचा आधार, त्याची आई काळाने हिरावून नेली. रामला विलवडे या त्याच्या आजोळी आणले गेले. आईनंतर मामांनी लहानग्या रामचा सांभाळ केला. आईविना हे पोर वाढत होतं. ग..म..भ..न गिरवत होतं. तुटक्या पेन्सिलीने ग..म..भ..न गिरवायला पाटी होती तीसुद्धा फुटकी! खायला काय, तर कोंड्याची भाकर. अशा परिस्थितीत प्राथमिक शिक्षण चाललेलं आणि अशातच नियतीने आणखी एक घाला रामकृष्णावर घातला. यावेळी रामकृष्णाच्या बाबांना काळाने हिरावून घेतले. खर्‍या अर्थाने राम पोरका झाला. आता ‘पुढे काय?’ हा मोठा प्रश्न उभा राहिला. मुंबईला जायचं रामच्या बालमनाने ठरविले, पण मुंबईला जाण्यासाठी तिकिटाचे पैसे नव्हते. अनेकांकडे पैशांची माधुकरी रामने मागितली आणि मिळालेल्या पैशातून मुंबई गाठली. मुंबईत चार-पाच मुलांसोबत तो राहू लागला. मिळेल ते काम करू लागला. शिकायची प्रचंड ओढ होती. या ओढीतूनच रामने रात्रशाळेत प्रवेश घेतला. दिवसभर कामकरून रात्रीचा शिकू लागला. दहावी फर्स्ट क्लासने पास झाला. दयानंद महर्षी कॉलेजमध्ये त्याने अकरावी सायन्सला प्रवेश घेतला. पाच वर्षे प्रचंड मेहनत केली. बीएस्सीची पदवी मिळवली. १९६८ साली एका औषध कंपनीत एमआरची नोकरी मिळाली. सात वर्षे नोकरी केल्यानंतर टिपिकल चाकरमानी म्हणून जगायचं नाही, असं रामकृष्णने ठरविले. १९७५ साली नोकरीचा राजीनामा दिला. जमविलेल्या पैशातून छोटासा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय म्हणजे टेलरिंग मटेरियल, किराणा दुकान व स्टेशनरी कटलरी स्टोअर्स. मात्र, सायन्सच्या या पदवीधराला वेगळं काहीतरी करायचं होतं, जे स्वत:च्याच क्षेत्रात म्हणजे सायन्समधलं असेल आणि अशीच एक संधी १९८१ साली चालून आली. कामोठ्याला एक आजारी औषध कंपनी होती. त्या कंपनीमध्ये भागीदार म्हणून कंपनी चालविण्याची संधी होती. मात्र, कंपनीसाठी भांडवल आवश्यक होतं. गरज होती सव्वातीन लाख रुपयांची. रामकृष्णकडे होते फक्त २५ हजार रुपये. यावेळी रामचा मित्र देवासारखा धावून आला. त्याने तीन लाख रुपयांची मदत केली. त्या संधीचं रामकृष्णाने अक्षरश: सोनं केलं. दिवसरात्र प्रचंड मेहनत करून तोट्यात चालणार्‍या कंपनीला नफ्यात आणलं. ही पहिली कंपनी म्हणजेच ’फेरिको लॅबोरेटरीज लिमिटेड.’ या धंद्यात ‘राम’ आहे हे रामकृष्णने ओळखलं आणि याच क्षेत्रात आपले पाय भक्कमपणे रोवले.

 
पुढे १९८५ साली ‘ग्रिन्डलेज फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड’, १९८७ साली ‘सनग्रेस केमिकल्स प्रा. लि.’, १९८९ साली महाडची ‘श्री समर्थ रसायन प्रा. लि.’, १९९२ साली ‘आयडियल प्रा. लि.’, १९९४ साली ‘ग्लोबल एन्टरप्राईजेस’ अशा कंपन्या विकत घेतल्या. पुढे ‘ग्लोबल एन्टरप्राईजेस’ कंपनी कार्यबाहुल्यामुळे विकली. २००३ साली खोपोलीला ‘सनग्रेस हेल्थकेअर प्रा. लि.’ या आधुनिक कारखान्याची उभारणी केली. १९८७ साली कोळवणकरांच्या एका कारखान्याला आग लागली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र संपूर्ण मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मात्र, या आगीच्या राखेतून कोळवणकरांच्या विजिगीषू वृत्तीने नव्या उमेदीची झेप घेतली. लवकरच महाड आणि तुर्भे येथील औषध क्षेत्रातील आणखी दोन कंपन्या विकत घेण्याचा रामकृष्ण कोळवणकरांचा मानस आहे. रसायनातील कच्चा माल तयार करणे, औषधी गोळ्यांसाठी लागणारा फॉर्म्युला तयार करणे, औषध तयार करणे असे त्यांच्या उद्योगाचे स्वरूप आहे. रामकृष्ण कोळवणकरांच्या उद्योगसमूहाची या क्षेत्रातील एकूण वार्षिक उलाढाल २७ कोटी रुपये एवढी आहे.
 
कोणत्याही तरुणाला उद्योग सुरू करायचा असेल तर कठोर मेहनतीला पर्याय नाही. दिवसरात्र प्रचंड मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही. यशाला कोणताच शॉर्टकट नसतो, म्हणून भरपूर मेहनत घ्या, हा कानमंत्र रामकृष्ण कोळवणकर तरुणाईला देतात. शून्यातून कष्टाने औद्योगिक साम्राज्य उभारणार्‍या या उद्योजकाला २०१० साली तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते ’उत्कृष्ट उद्योजका’चा पुरस्कार मिळाला. आज त्यांचा मुलगा संतोष आणि अमेरिकेहून पीएच.डी प्राप्त केलेली मुलगी धनश्री हे दोघेही कोळवणकरांच्या खांद्याला खांदा लावून हा उद्योगसमूह पुढे नेत आहेत.
 
त्या रामाप्रमाणे या रामानेदेखील वनवास भोगला. हा वनवास होता गरिबीचा, संघर्षाचा, जगण्याचा आणि पोरकेपणाचा. मात्र, या रामाने या प्रतिकूल परिस्थितीरूपी रावणाचा जबरदस्त इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर पराभव केला.
 
- प्रमोद सावंत