पाईप इंडस्ट्रीजमधील एव्हरेस्ट - नामदेवराव जगताप

    दिनांक  30-Nov-2017    

अंदाजे १९३३चा काळ. सुपे, सासवड. पुण्यातील एक खेडेगाव. या खेडेगावामध्ये अंदाजे ३०-४० घरांचा एक महारवाडा. या महारवाड्यातील जगतापांच्या घरी नामदेवचा जन्मझाला. त्याकाळी अस्पृश्यता पद्धत तशी जोरातच होती. गावकी, तराळकी, महारकी अशा विविध पद्धतींनी आणि नावांनी ती अस्तित्वात होती. गावात एखादं ढोर मेलं की, महारांनी त्याला वेशीबाहेर घेऊन जायचं. लहानग्या नामदेवने हे सारं काही अनुभवलं होतं. या सार्‍या प्रथा आणि पद्धती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांमुळे, चळवळीमुळे, संघर्षामुळे बंद झाल्या. या संपूर्ण क्रांतिकारक प्रवासाचा नामदेवची पिढी साक्षीदार होती. नामदेव त्यावेळची सातवी, जी एसएससीच्या समकक्ष मानली जायची ती पास झाला. जर आपल्याला आपलं घर सुधारायचं असेल, तर आपल्याला शहराशिवाय गत्यंतर नाही, हे नामदेवने जाणलं आणि तो पुण्यात आला.

दरम्यान, तारुण्यात आलेल्या नामदेवचं एका वर्षाने मोठ्या असलेल्या एका मुलीवर प्रेम जडलं. घरात त्याने त्या मुलीसोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, त्याकाळी प्रेमविवाह ही संकल्पना आजच्या इतकी पुढारलेली नव्हती. साहजिकच घरच्यांनी नकार दिला. मात्र, घरच्यांच्या विरोधात जाऊन नामदेवने शारदासोबत विवाह केला आणि दोघेही पुण्यात आले. शारदा पेशाने शिक्षिका होती. पुणे महानगरपालिकेत ती शिक्षिका म्हणून रुजू झाली. नामदेव आणि शारदा हे दोघे पुण्यात एका भाड्याच्या घरात राहू लागले. या दाम्पत्याला ३ मुलं आणि ३ मुली झाल्या. सोबतच शारदाची आई, ३ बहिणी आणि भाऊ सुद्धा राहू लागले. कुटुंब मोठ्ठं होतं. या मोठ्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी नामदेव पडेल ती कामे करायचा. पुण्याच्या रतन टॉकिजसमोर पुस्तकं विक, गणेशोत्सवाच्या काळात पाट विक, ५ रुपये दराने कुणाचं घर चुन्याने रंगवून दे, असं काही ना काही नामदेव कामकरत होता आणि घरखर्च भागवत होता. निर्व्यसनी, प्रामाणिकपणा आणि कष्टाळू हे गुण त्याची बलस्थानं ठरली होती. त्यामुळे तो ज्यांच्या सान्निध्यात यायचा, त्यांचा विश्वास आपोआप संपादन करायचा.

याच काळात नामदेवने इलेक्ट्रिशियनचा मोटर रिपेअरिंगचा एक कोर्स केला होता. १९६० साली उरळीकांचनला डॉ. मणिभाई देसाई नावाचे सद्गृहस्थ होते. हे डॉक्टर भारतीय ऍग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशन नावाची संस्था चालवायचे. तो काळ हरितक्रांतीचा होता. संपूर्ण देशात हरितक्रांतीचा नारा बुलंद झालेला. सरकार उपसा सिंचनासाठी अर्थसाहाय्य करत असे. देसाईंची संस्था हे उपसासिंचनाचे काम करत असे. नामदेव जगताप देसाईंसोबत काम करू लागले. उपसा सिंचनासाठी सिमेंटचे पाईप्स लागत असे. त्यावेळी सांगली जिल्ह्यात हे पाईप तयार होत असत. नामदेव हे पाईप सांगलीवरून आणत आणि पुण्यातील शेतकर्‍यांना जोडून देत. या कामामुळे अनेक शेतकर्‍यांशी चांगले संबंध निर्माण झाले होते. शेतकर्‍यांना शेतीची अवजारे लागायची ती तयार करण्यासाठी नामदेवने असू. इंजिनिअरिंगनावाने वर्कशॉप सुरू केले. त्याकाळी सगळी अवजारे हाताने तयार केली जायची. नामदेवरावांनी वेल्डिंग, लेथ, टर्नर सारख्या मशीन्स आणल्या. त्यावर ते अवजार तयार करत आणि संपूर्ण पुणे जिल्ह्याला ते पुरवठा करत.

सांगलीहून पाईप्स आणण्यापेक्षा तुम्ही इथं पुण्यातच पाईप्स का नाही तयार करत? एका ग्राहकाने विचारलेल्या प्रश्नाने नामदेवरावांना जणू एक राजमार्गच सापडला. गावची ४ एकरची जागा विकून आलेले ९० हजार रुपये आणि बँक ऑफ बडोदाचे १ लाख ७३ हजार रुपये कर्ज असे मिळून २ लाख ६३ हजार रुपयांचं भांडवल नामदेवरावांनी उभारलं. पुणे-सोलापूर रोडपासून २० किलोमीटर आत असणार्‍या कुंजीरवाडी येथे एव्हरेस्ट स्पर्न पाईप इंडस्ट्रीजनावाने पहिलं युनिट सुरू केलं. वर्ष होतं १९७९ आणि नामदेवरावांचं वय होतं ४८ वर्ष. कंपनीचं पहिलं उत्पादन अर्थात पहिल्या पाईपची निर्मिती ही १९८० सालच्या गुढीपाडव्याला झाली. टिकाऊ आणि मजबूत पाईप्स म्हणजे एव्हरेस्टचे पाईप्स हे जणू समीकरणच बनले. ग्राहकांनी पाईप्सची गॅरंटी विचारल्यास नामदेवराव म्हणायचे, ’’जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत पाईपची गॅरंटी.’’ सुखद बाब म्हणजे, वयाच्या ४८व्या वर्षी पाईप इंडस्ट्री सुरू करणारे नामदेवराव आज ८४ वर्षांचे आहेत आणि त्यांनी पुरविलेले पाईप्स ४० वर्षे झाली तरी सुस्थितीत आहेत. म्हणूनच की काय, त्यांचे मान्यवर ग्राहक असलेली इंडियन आर्मी एव्हरेस्टचेच पाईप्स वापरतात. इंडस्ट्रियल आरसीसी पाईप्स, वॉटर टँक्स, सेप्टिक टँक्स अशी विविध उत्पादने ते तयार करतात. एव्हरेस्टच्याच बाजूची ४ एकर जागा घेऊन १९९३ साली शारदा सिमेंट वस्तूनिर्मिती आणि २००३ साली असु कॉंक्रिट प्रॉडक्टअसे आणखी २ युनिट सुरू केले. २ लाख ७३ हजार रुपये भांडवल आणि २०-२५ कामगारांनिशी सुरू झालेल्या या कंपन्यांचा पसारा ९.५ एकर क्षेत्रफळात पसरला आहे. यामध्ये अंदाजे १२० हून अधिक कामगार कार्यरत आहेत, तर ८ कोटींची वार्षिक उलाढाल आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्व महानगरपालिका, टेल्को, सहारा इंडिया, जीएममोटर्स, महिंद्रा लिमिटेड, आयआरबी लिमिटेड, शापूरजी पालनजी, परांजपे बिल्डर्ससारख्या अनेक नामवंत ग्राहकांची मांदियाळी आज नामदेवरावांच्या कंपनीकडे आहे. नामदेवरावांची तीन मुले सतीश, अविनाश आणि संजय हे सध्या हा व्यवसाय पुढे नेत आहेत. कायद्याची पदव्युत्तर पदवी आणि व्यवस्थापनाची पदवी घेतेलेले अविनाश जगताप हे कंपनीचे सीईओ म्हणून धुरा वाहत आहेत. आज कंपनीकडे पाईप्सची ने-आण करण्यासाठी स्वत:ची वाहनव्यवस्था आहे. यामध्ये ६ ट्रक्स, २ डम्पर, एक क्रेन आणि एका ट्रॅक्टरचा समावेश आहे. यामुळे सामानाची डिलिव्हरीसुद्धा लवकर होते. ‘‘शासनकर्ती जमात व्हा,’’ असा कानमंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला दिला होता. याचा अर्थ निव्वळ राजकीयदृष्ट्या शासनकर्तीनव्हे, तर प्रत्येक क्षेत्रात तुमचं कर्तृत्व सिद्ध करून नेतृत्व कराअसा होतो. नामदेवरावांनी ते कर्तृत्व सिद्ध केले. तेदेखील मागासवर्गीय असल्याचे कोणतेही लाभ न घेता, ही खरंच मोठी बाब आहे. नामदेवराव जगतापांसारखे आणखी काही उद्योजक या समाजात घडले, तर हा समाज निश्चितच एका वेगळ्या स्तरावर असेल. कदाचित बाबासाहेबांचे अनुनय करणारी ही जमात उद्योगविश्वात राज्यकर्ती जमात म्हणून उदयास येईल.
 
 
प्रमोद सावंत