मुंबई : यापुढे उबाठा गटाच्या कुणीही आमच्या नेत्याबद्दल असे वक्तव्य केले तर आम्ही मंत्री आणि आमदार आहोत हे बाजूला ठेवून बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. तसेच त्यांनी आमदार भास्कर जाधव यांचा आदित्य ठाकरेंवर टीका करतानाचा एक व्हिडिओसुद्धा दाखवला.
गुरुवार, १७ जुलै रोजी विधानसभेत राईट टू रिप्लाय अंतर्गत बोलू न दिल्याचा आरोप करत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ झाला. यावरून भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
यावर प्रतिक्रिया देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असंसदीय शब्द वापरले, त्याचा आम्ही निषेध करतो, असे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांचा आदित्य ठाकरेंवर टीका करतानाचा एक जुना व्हिडिओसुद्धा दाखवला.
आता पितळ उघडे पडेल
यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की, "आता भास्कर जाधव यांच्याकडून निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. पण मासा मेला म्हणून त्यांचा अवमान झाला होता. त्यांनी शिवसेना हा नामर्दाचा पक्ष आहे असे विकृत वक्तव्य केले होते. त्यामुळे आता निष्ठा दाखवण्यात काहीही अर्थ नाही. हा व्हिडिओ जनतेला दाखवला तर त्यांचे पितळ उघडे पडेल."
मासा मेला प्रकरण काय?
यावेळी शंभूराज देसाई यांनी मासा मेला प्रकरण काय हे तेसुद्धा विस्तृतपणे सांगितले. ते म्हणाले की, "मातोश्री बंगल्यात एक प्रिय मासा पाळण्यात आला होता. एक दिवस तो मासा मरण पावला. नेमके त्याचदिवशी भास्कर जाधव मातोश्रीवर गेले होते. परंतू, तिथे दुःखाचे वातावरण असल्याने भास्कर जाधव यांना बाहेर काढण्यात आले. त्यावेळीची त्यांची अवस्था आम्हाला माहिती आहे."
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....