मुंबई : पंढरीची वारी केवळ एक धार्मिक यात्रा नसून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे प्रतीक आहे. आजच्या आधुनिक काळात भौतिकतेच्या वावटळीत तिला जपणे, तिचे संरक्षण करणे व तिला अधिक सुसंगत करणे हे मोठे आव्हान आहे. वारीच्या परंपरेला केवळ धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता, ती एक सामाजिक बांधिलकी मानली असून ‘चरणसेवा’ या अभिनव उपक्रमाची संकल्पना साकारण्यात आली आहे. ‘चरणसेवा’ हा उपक्रम मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून राबवला जात असून यात 'अनुलोम' या संस्थेचाही सक्रीय सहभाग आहे. यामध्ये वारकऱ्यांना वैद्यकीय तपासण्या, उपचार आणि आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात.
हा उपक्रम औषध वाटपापुरता मर्यादित नाही. वारकऱ्यांच्या चालून थकलेल्या पायांना आणि दमलेल्या शरीराला स्नेहन व स्वेदन (मसाज) सेवा देण्यात येते. खास आयुर्वेदिक तेलाने पाय, पाठ आणि खांद्यांचा मसाज केला जातो. ही सेवा शारीरिक आराम तर देतेच, पण ती वारकऱ्यांप्रती असलेला सेवाभाव आणि आत्मीयता व्यक्त करणारी असते. या उपक्रमात राज्यभरातील वैद्यकीय शिक्षण संस्था सक्रियपणे सहभागी होतात. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिओथेरपी, नर्सिंग, आयुर्वेद, होमिओपथी आदी शाखांतील विद्यार्थी आणि कर्मचारी पालखीच्या प्रत्येक मुक्कामी सेवा देतात.
या स्वयंसेवकांनी कुठलाही वर्ग, जात, किंवा प्रांत न पाहता दिलेली ही सेवा म्हणजे समरसतेचा प्रत्यक्ष अनुभव आहे. ‘सेवा हीच साक्षात उपासना’ हे या उपक्रमातून वारंवार अधोरेखित होते. ‘चरणसेवा’सारख्या उपक्रमांमुळे वारी ही केवळ आध्यात्मिक यात्रा न राहता, एक समर्पित सेवा चळवळ बनते. वारीसाठी तयार झालेली ही व्यवस्था प्रशासनाची संवेदनशीलता, सेवा-भावना आणि वारकऱ्यांप्रती असलेली आपुलकी दर्शवते. आणि म्हणूनच, हे नेतृत्व केवळ राजकीय नव्हे, तर धर्मनिष्ठ आणि जनसेवेसाठी समर्पित नेतृत्व म्हणून ओळखले जाते. पुण्यापासून या उपक्रमास सुरुवात झाली. फलटणमध्ये चरणसेवा देण्याकरीता फिजिओथेरपीचे २०० विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्या ख्याण्यापिण्याची व्यवस्था तसेच येथे उपस्थित अधिकारी वर्गाच्या निवासाची व्यवस्था अनुलोमच्या माध्यमातून यावेळी करण्यात आली.
हजारो वारकऱ्यांनी घेतला सेवेचा लाभ
वारी मार्गावरील ४३ ठिकाणी 'चरणसेवा' उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला. विशेषतः पुणे जिल्ह्यातील ३० ठिकाणी या उपक्रमाने उल्लेखनीय प्रतिसाद मिळवला. हजारो वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला आणि त्यांच्या थकलेल्या शरीराला दिलासा मिळाल्यामुळे पुढचा प्रवास त्यांनी नव्या उत्साहाने सुरू केला.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक