इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हा कुठला विचार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
19-Apr-2025
Total Views | 26
छत्रपती संभाजीनगर : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठले विचार आहे. याचे मला कधी कधी आश्चर्य वाटते, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली असून अनेकांकडून याला विरोध करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे. सर्वांनी मराठी भाषा शिकायलाच हवी. त्यासोबत दुसरी कुठली भाषा शिकायची असल्यास तीदेखील शिकता येते. पण हिंदीला विरोध आणि इंग्रजीला का नाही? याचे मला कधी कधी आश्चर्य वाटते. इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठले विचार आहे. पण मराठीला कुणी विरोध केल्यास आम्ही सहन करणार नाही," असे ते म्हणाले.
नाशिकमधील दंगलीबाबत बोलताना ते म्हणाले की, "नाशिकमध्ये सुनियोजित पद्धतीने दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर तिथल्या लोकांनी स्वत: ते अतिक्रमण काढण्यासंदर्भात पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी काही लोकांनी जाणीवपूर्वक दगडफेक करून दंगा तयार केला. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे."
भगवतगीता आणि नाट्यशास्त्राची युनेस्कोमध्ये नोंद ही अभिमानाची बाब!
"भगवतगीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवनाचे सत्य सांगणारा विचार भगवतगीतेतून प्रतिपादित झाला आहे. आपले नाट्यशास्त्र अतिशय प्राचिन आहे. त्यामुळे त्याला युनेस्कोमध्ये जागा मिळत असल्यास सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्टी आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.