मुंबई, दि.१८ : भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला फेब्रुवारी,२०२५ रोजी १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी पश्चिम रेल्वेने उत्सवाचा भाग म्हणून एक प्रदर्शन आणि चर्चासत्र आयोजित केले होते. चर्चगेट रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेल्या प्रदर्शनात लोकोमोटिव्ह, ईएमयू, मेमू आदी मॉडेल्स ठेवण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन मुंबईकरांसाठी पर्वणी ठरत आहे. मोठ्या संख्येने प्रवासी, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक या प्रदर्शनाला भेट देत आहेत.
दि. ३ फेब्रुवारी १९२५ हा दिवस भारतीय रेल्वेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदला गेला. हा दिवस आजच्या भारतीय रेल्वे नेटवर्कवर पहिली इलेक्ट्रिक ट्रेनची ओळख झाली. व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला हार्बरला जोडणारा हा पहिला प्रवास निर्णायक मैलाचा दगड ठरला, ज्याने आपल्या देशाच्या या लाइफलाईनच्या अमर्याद भविष्याची झलक दाखवली.पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचे १०० वर्षे आम्ही साजरे करत आहोत. देशभरातील विविध स्थानकांवर हा उत्सव साजरा होत आहे. पहिल्याच दिवशी हे प्रदर्शन सर्व वयोगटातील आणि सर्व स्तरातील प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले. हे प्रदर्शन १८ आणि १९ फेब्रुवारी २०२५ असे दोन दिवस आयोजित करण्यात आले आहे. अधिकाधिक प्रवाशांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी विशेषतः मुंबईकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.
१८ फेब्रुवारी २०२५ रोजी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चगेट स्थानकावर दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या उद्घाटन समारंभास विविध रेल्वे युनिटचे अधिकारी, सेवानिवृत्त वरिष्ठ रेल्वे विद्युत अधिकारी आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या ऐतिहासिक घटनेवर आधारित थीम साँगही या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आले. हे प्रदर्शन ऐतिहासिकदृष्ट्या जतन केलेल्या OHE फिटिंग्ज, रेल्वे प्रवास, लोकोमोटिव्ह, लोकल ट्रेन आणि OHE सिस्टीमचा क्रांतिकारी प्रवास दाखविणारा आहे. याव्यतिरिक्त, व्हीआर आधारित सिम्युलेशनने भेट द्यायला येणाऱ्या अभ्यागतांना केबिनमधून ट्रेन ऑपरेशन्सचा अनुभव देत आहेत.