तंत्रज्ञान सातत्याने बदलत असते. त्यात अधिकाधिक प्रगती होत असतेच. वैद्यकीय क्षेत्रामध्ये झालेल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीने सर्वांनाच फायदा झाला आहे. असेच एक नवे तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे, ते म्हणजे ‘व्हर्च्युअल ऑटोप्सी’ अर्थात ‘डिजिटल पोस्टमॉर्टेम’ होय! व्हर्च्युअल ऑटोप्सीच्या नवतंत्रज्ञानाचा लेखात घेतलेला आढावा....
गेल्या काही दशकात, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात जागतिक पातळीवर एक विलक्षण परिवर्तन अनुभवले जाते आहे. नवी संशोधने आणि डिजिटल तंत्रज्ञानातील वेगवान प्रगती यांच्या संयोगाने, एक आगळावेगळा आणि प्रबळ प्रवाह निर्माण झाला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाची ही अभिनव वाट चोखाळताना, आरोग्यसेवेची गाथा पुन्हा नव्याने लिहिली जाते आहे. वैद्यकीय संशोधनात, संगणकाच्या सुरुवातीच्या वापरापासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि टेलिमेडिसिनच्या आगमनापर्यंत, अनेक बदल वेगाने घडत गेले. नवनवीन औषधे, उपचार प्रणाली, त्यांचा वापर, संशोधन, लस निर्मिती रुग्णांवर होणारे चांगले वाईट परिणाम, उपकरणे, या सार्यांची डिजिटल तंत्रज्ञानाशी सांगड घातल्यामुळे, रुग्णांच्या उपचार योजना आणि त्यातून रुग्णांवर होणारा परिणाम यात झपाट्याने सकारात्मक बदल होत गेले. अनेक दुर्धर आजारांचे परिणामकारक उपचार अधिक बारकाईने आणि वेगाने होत गेले. या सार्यातून आरोग्यसेवेच्या नवीन युगाची नांदी सुरू झाली आहे. संगणकीय तंत्रज्ञानाने मानवी जीवनाच्या विविध बाजूंना नुसता स्पर्शच केलेला नाही, तर त्यामध्ये खोलवर प्रवेश केला आहे, हे आपण सातत्याने अनुभवतोच. आज संगणकीय साहाय्याने, अतिशय सहजपणे दररोज केलेल्या अनेक बाबी, फक्त दहा, 20 वर्षांपूर्वी आपण स्वहस्ते दीर्घकाळ काम करून अथवा लांबलचक रांगेत उभे राहून, कशा काय पार पाडीत होतो, याबद्दल आता स्वतःलाच आश्चर्य वाटते! महानगरी वा निमशहरी क्षेत्रे तर सोडाच, ग्रामीण भागातही अशी स्थिती झपाट्याने बदलत आहे, तीही जागतिक पातळीवर. अशाच एका वेगळ्याच पैलूचा परिचय आपण करून घेणार आहोत. डिजिटल ऑटोप्सी उर्फ शवविच्छेदन. डिजिटल पोस्टमार्टम एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये मृत व्यक्तीच्या शरीराची चिरफाड न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, मृत्यूची कारणे शोधली जातात. याला ‘व्हर्च्युअल ऑटोप्सी’देखील म्हणतात.
हा विषय वाचून काही वाचक दचकले असतील. काहीजण मनातल्या मनात इथेही संगणक पोहचला, म्हणजे फारच झाले! असा आश्चर्य उद्गारही कदाचित काढतील. परंतु, जरा वेगळ्या कोनातून विचार केला, तर या क्षेत्रामध्ये नवतंत्रज्ञान पोहोचले हे चांगलेच झाले, असे म्हणता येईल. अपघात, खून, मारामार्या अशासारख्या अनैसर्गिक कारणांमुळे तसेच संशयास्पद परिस्थितीत मृत्यू ओढवल्यास, मृताचे शवविच्छेदन करणे, जगातील सर्वच देशात कायद्यानेच आवश्यक असते. परंतु, यासंबंधीच्या व्यावहारिक अडचणींबद्दल आपण नेहमीच वाचतो, ऐकतो, बातम्यांमध्ये पाहतो. मुळात मृतदेह चांगल्या स्थितीत नसणे, पोस्टमॉर्टेम करण्यासाठी योग्य व्यक्ती न मिळाल्याने, नाहक वेळ जाणे, शिवाय एकंदर पोलिसी खाक्या व सरकारी वृत्ती आणि ढिलाई, या सगळ्यात मृतदेहाची होणारी विटंबना यामुळे, मृताच्या नातलगांना विलक्षण शारीरिक व मानसिक त्रास होतो. शवविच्छेदन अहवाल मिळण्यासाठी कित्येक दिवस ताटकळत राहावे लागते,त्यामुळे नंतरच्या न्यायवैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियांवरही याचा परिणाम होतो. आता मात्र, स्कॅनिंग आणि थ्रीडी इमेजिंग या डिजिटल कार्यपद्धतींमुळे, पोस्टमॉर्टेमचे हे अप्रिय आणि कटकटीचे काम सुलभतेने आणि त्वरेने होईल, असे दिसते.
वैद्यकीय क्षेत्रात थ्रीडी इमेजिंगचे तंत्र गेल्या दहा, 20 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. शरीरातील विविध अवयवांचे कार्य व त्यामधील बिघाड तपासण्यासाठी तसेच, गुंतागुंतीच्या दीर्घकालीन शस्त्रक्रियेच्या वेळीथ्रीडी इमेजिंगे फार मोठे साहाय्य होते. ‘सोनोग्राफी’ हा थ्रीडी इमेजिंगचाच एक प्रकार आहे. आता तर हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांतूनही, हे स्पेशल इफेक्ट्स पाहायला मिळतात. उदा. हॉलो मॅन. असो, यामुळे पॅथॉलॉजीच्या क्षेत्रातील नोकर्यांचेही एक नवे दालन उघडले जाण्याची शक्यता आहे. या तंत्रांमुळे, शरीराच्या आतील अवयवांची थ्रीडी चित्रे तयार होतात. या चित्रांच्या साहाय्याने, डॉक्टर शरीराच्या आतील अवयवांची तपासणी करू शकतात आणि मृत्यूची कारणे शोधू शकतात.
या तंत्रामध्ये मृतदेहाचे प्रथम ‘फुल बॉडी स्कॅनिंग’ केले जाते. स्कॅनिंगमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे, संपूर्ण देहाचे तपशीलवार थ्रीडी इमेजिंग तयार केले जाते. हे काम फक्त दहा मिनिटांत पूर्ण होते. हे चित्र मोठ्या आकाराचा हाय रिझॉल्यूशन संगणकावर पाहता येते. प्रतिमेचे विश्लेषण करणारे डॉक्टर वा पॅथॉलॉजिस्ट, यावरून मृतदेहातील गडबडीचा अहवाल देऊ शकतात. विशेष म्हणजे, या सॉफ्टवेअरमधील इतर थ्रीडी निर्मिती क्षमतांचा फायदा घेऊन, मृतदेहाच्या संदर्भात गुन्ह्याच्या वा अपघाताच्या परिसराचे, साधारण चित्रही तयार करता येते तज्ज्ञांनी दिलेला हा अहवाल गरजेनुसार, लगेचच किंवा संगणकात साठवून नंतरही वापरता येतो.
डिजिटल ऑटोप्सीच्या या नवतंत्रज्ञानाचे काही फायदे तर उघड आहेत. पहिला म्हणजे, मानवतावादी दृष्टिकोनातून होणारी शवाची तपासणी (विच्छेदन नव्हे). एखाद्या व्यक्तीच्या अनपेक्षित मृत्यूमुळे तिचे नातलग वा मित्रमैत्रिणी, विलक्षण मानसिक तणावाखाली असतात. फौजदारी व न्यायिक प्रक्रियांना तोंड देतानाच, आधी उघडून नंतर पुनः शिवलेले शव त्यांच्या ताब्यात दिले जाते. मृतदेहाची विटंबना आणि हा ताण तर या नवतंत्राने पूर्णतः टळेल. शव-परीक्षणाचे हे तंत्र वेगवान असल्याने, सर्वांचाच वाया जाणारा वेळ वाचेल. विच्छेदनाच्या वेळी एखादी बाब मानवी निरीक्षणातून निसटू शकते, तशी ढिलाई हे सॉफ्टवेअर दाखवणार नाही. फोरेन्सिक मेडिसिन अर्थात न्यायवैद्यकशास्त्राच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची ठरते. शिवाय शवपरीक्षणाचा अहवाल, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साठवणे आणि कोठेही पाठवणे अधिक सहजशक्य आहे.
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)
डॉ. दीपक शिकारपूर
deepak@deepakshikarpur.com