मुंबई : उद्धव ठाकरेंचे कोकणातील शिलेदार राजन साळवी हे पक्षाला रामराम करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर ते ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आता राजन साळवी यांनी स्वत: पत्रकार परीषद याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.
राजन साळवी म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत आम्ही पराभावाला सामोरे गेलो आहोत. ते दुःख, खंत आणि वेदना माझ्यासकट माझ्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना आणि सामान्य जनतेला आहे. पराभवाची खंत असतानाही भविष्याकडे शिवसेना मार्गक्रमण करते आहे. मी नाराज आहे, भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहे, हे मला तुमच्या माध्यमातून समजत आहे. पण तसे काहीच नाही. माझ्या मतदारसंघातील रोजच्या कार्यपद्धतीवर माझे मार्गक्रमण सुरु आहे. त्यामुळे अशा बातम्या या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार, यात कोणतीही शंका नाही," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, "विधानसभा निवडणूकीतील पराभव आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर ज्याने चुकीचे काम केले, कुणाकडे बोट दाखवले असेल तर अशा लोकांच्या बाबतीत आत्मचिंतन करावे. वरीष्ठांनी यात लक्ष घालून ३० वर्षांचा शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळण्यामागे कोण कारणीभूत आहे, याचे कारण शोधायला हवे. ज्यांनी ही परंपरा खंडित केली आणि विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केली याबाबतचा सर्वे करायला हवा. यात जे व्यक्ती दोषी आढळले त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी," अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
पराभवानंतर ठाकरेंनी घेतली बैठक!
"पराभवानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री येथे पराभूत उमेदवारांची बैठक घेतली होती. या बैठकीत पराभवाचे कारण आणि आत्मचिंतन करण्यात आले. त्यादृष्टीने आम्हाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत," असेही त्यांनी सांगितले.
एसीबी चौकशीमुळे टांगती तलवार!
“माझी आणि माझ्या कुटुंबाची एसीबी चौकशी सुरू होती. आम्ही याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सुट्टीनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे. त्यांचा निर्णय काय असेल ते माहिती नाही, पण आमच्यावर टांगती तलवार आहे, हे मला निश्चितपणे माहिती आहे," असेही ते म्हणाले.