ठाण्यातील महाविद्यालयात कौशल्य विकासाचे धडे!

आ. निरंजन डावखरे यांच्या हस्ते केबीपी महाविद्यालयात, तर आ. संजय केळकर यांच्या हस्ते जोशी-बेडेकर महाविद्यालयात उद्घाटन

    21-Sep-2024
Total Views | 43
 
thane college
 
ठाणे, दि. २० : (Thane) महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील ५८ महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रां’चे ऑनलाईन उद्घाटन शुक्रवार, दि. २० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
 
ठाण्यातील कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) महाविद्यालयातील केंद्राचे उद्घाटन आ. निरंजन डावखरे यांच्या हस्ते, तर जोशी-बेडेकर महाविद्यालयातील केंद्राचे उद्घाटन आ. संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ सुरू झाले. तर ठाणे जिल्ह्यातील ५८ महाविद्यालयांमध्ये ही केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या महाविद्यालयांमधील केंद्रांमधून कौशल्य विकास कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वागळे इस्टेट येथील केबीपी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. आ. निरंजन डावखरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन, भविष्यातील प्रगतीसाठी कौशल्य विकासाचे धडे घेण्याचे आवाहन केले.
 
‘आदर्श विकास मंडळा’चे अध्यक्ष सचिन मोरे व प्राचार्य संतोष गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केबीपी महाविद्यालयातील केंद्रात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी, अकाऊंट असिस्टंट, डिजिटल मिडिया मॅनेजमेन्ट, वेब डेव्हलपमेंट आणि इतर अनेक कोर्सेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
 
जोशी-बेडेकर महाविद्यालयात वर्धा येथील लाईव्ह प्रक्षेपण
 
‘विद्या प्रसारक मंडळा’च्या के. जी. जोशी कॉलेज ऑफ आर्ट्स आणि एन. जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे शुक्रवारी ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रा’चे उद्घाटन आ. संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एक लाख लाभार्थींना प्रमाणपत्र वितरण आणि ७५ हजार लोन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. वर्धा येथील कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले. याप्रसंगी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, परिवहन सदस्य विकास पाटील, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुचित्रा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
 
राज्यातील एक हजार ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रां’चे उद्घाटन
 
‘पीएम विश्वकर्मा योजने’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील एक हजार ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रां’चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले, भारत सरकारकडून ‘स्कील इंडिया मिशन’च्या माध्यमातून कौशल्य विकासाला सशक्त केले जात आहे. आज तरुणांना बदलत्या गरजांनुसार कौशल्य पुरवले जात आहे. स्कील इंडियासारख्या अभियानामुळे भारताच्या कौशल्याला जगभरात ओळख मिळाली. ‘पीएम विश्वकर्मा योजने’च्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षांपासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर, विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करायच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागिदारी अनुसूचित जातीजमाती आणि इतर मागासवर्गीय समाजाची आहे. या समूहातील कारागीर उद्योजक व्हावेत, असा आमचा प्रयत्न असून, त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या बहुआयामी प्रगतीचा नायक शेतकरीच राहणार आहे. त्याच्या समृद्धीसाठी सरकार सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121