लाल रंगाचा प्रकाश अन् भयंकर आवाज; ग्रामस्थांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
20-Sep-2024
Total Views | 53
नाशिक : (Yeola) नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसुल येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. अंदरसुल येथे सायंकाळी सात वाजताच्या सुमारास डॉ. हरीश रोकडे यांच्या शेतातून लाल रंगाचा प्रकाश अन् भयंकर मोठा आवाज होत आकाशातून एक रहस्यमयी यंत्र जमिनीकडे येताना काही शेतकऱ्यांनी पाहिले. ते दृश्य पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली. यंत्र शेतात कोसळल्यानंतर डॉ. रोकडे आणि काही शेतकऱ्यांनी जवळ जाऊन पाहताच त्यांना सदर यंत्रावर कोरियन भाषेमध्ये लिहिलेला मजकूर आढळून आला. त्यामुळे हे कोरियन बनावटीचे एक शास्त्रीय उपकरण असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या घटनेची माहिती स्थानिकांनी तलाठी कमलेश पाटील यांना कळवली. तलाठी पाटील यांनी पाहणी केल्यानंतर तहसीलदार आबा महाजन आणि तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी घटनेची दखल घेत घटनास्थळी भेट दिली आहे. मात्र आकाशातून हे यंत्र थेट शेतात येऊन कोसळल्याने परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. हे यंत्र नेमके काय आहे आणि आकाशातून कसे पडले याचा शोध अजूनही सुरू आहे. तसंच, सुरुवातीला ग्रामस्थांनी आकाशातून एलियनच आलेत की काय, असे तर्क-वितर्क लावले होते. मात्र, तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार, हे यंत्र एखाद्या यानाचा किंवा यंत्राचा भाग असू शकते, असं म्हटले जात आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.