तब्बल एक दशकाच्या प्रतिक्षेनंतर जम्मू -काश्मीरमध्ये होतेय विधानसभा निवडणूक! दुपारपर्यंत झालं 'इतकं' मतदान…

मतदानाच्या पहिला टप्प्याला सुरूवात; दुपारी १ वाजेपर्यंत ४१ % मतदान

    18-Sep-2024
Total Views | 67
 
J&K elections
 
मुंबई : (Jammu-Kashmir Assembly Election 2024) ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० ची तरतुद रद्द केल्यानंतर तब्बल १० वर्षांनंतर होणारी जम्मू आणि काश्मीरमधील ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. या केंद्रशासित प्रदेशात २३.२७ लाखांहून अधिक मतदार लोकशाहीने दिलेला सर्वात महत्त्वाचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील सात जिल्ह्यांतील २४ विधानसभा जागांवर मतदान होत आहे. पहिल्याच टप्प्यात २१९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाम जिल्ह्यांतील १६ विधानसभा मतदारसंघात विस्थापित काश्मिरी पंडितांनाही मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या विधानसभा निवडणुकीकरिता दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांना सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तसेच मतदानाला सुरुवात होताच मतदाते मतदान केंद्रांवर रांगा लावून आपला मताधिकार बजावताना दिसले.
 
"एकूण २३.२७ लाख मतदार मतदान करण्यास पात्र आहेत आणि २१९ उमेदवारांचे भविष्य ठरवतील," असे निवडणूक आयोगाने सांगितले. जम्मू विभागात आठ मतदारसंघांचा समावेश असून त्यामध्ये इंदरवाल, किश्तवार, पद्दार-नागसेनी, भदेरवाह, डोडा, डोडा पश्चिम, रामबन आणि बनिहालचा समावेश आहे. तर काश्मीर विभागात १६ मतदारसंघ आहेत. यामध्ये पंपोर, त्राल, पुलवामा, राजपोरा, जैनपोरा, शोपियान, डीएच पोरा, कुलगाम, देवसर, दुरू, कोकरनाग (एसटी), अनंतनाग पश्चिम, अनंतनाग, श्रीगुफ्वारा-बिजबेहारा, शांगस-अनंतनाग पूर्व आणि पहलगाम या मतदारसंघाचा समावेश आहे.
 
जम्मू आणि काश्मीरमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत ४१ %  मतदान झाले आहे.
 
 असे आहे मतदानाचे प्रमाण
 
अनंतनाग - ३७.९०%
डोडा - ५०.८१%
किश्तवार - ५६.८६%
कुलगाम - ३९.९१%
पुलवामा - २९.८४%
रामबन - ४९.६८%
शोपियान - ३८.७२%
 
 
 
९० जागांवर तीन टप्प्यात होणार मतदान
 
जम्मू-काश्मीरच्या ९० विधानसभा जागांवर १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. ८ ऑक्टोबरला या निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे.
 
भाजपा पूर्णतः स्वतंत्र तर काँग्रेसची मात्र नॅशनल कॉन्फरन्सबरोबर युती
 
निवडणूक लढवत असणाऱ्या प्रादेशिक पक्षांमध्ये जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (NC), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP), पीपल्स कॉन्फरन्स (PC), जम्मू आणि काश्मीर पीपल्स मूव्हमेंट (JKPM) आणि अपना पार्टी यांचा समावेश आहे. काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती केली. तर भारतीय जनता पक्ष पूर्णतः स्वबळावर आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पीडीपीने सर्वाधिक २८ तर भाजपने २५ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर दोन्ही पक्षांनी मिळून येथे सरकार स्थापन केले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121