रसिका शिंदे-पॉल
मुंबई : ‘मसान’ या चित्रपटापासून अभिनेता विकी कौशल याचा अभिनयातील प्रवास सुरु झाला. यानंतर एकाहून एक दर्जेदार चित्रपट त्याने दिले. नुकताच त्याचा बॅड न्यूज हा चित्रपट प्रदर्शित झाला. याच निमित्ताने ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बातचीत करताना तो बऱ्याच गोष्टींबाबत व्यक्त झाला. विकी कौशल याने दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात काम केले होते. आणि त्यानंतर पुन्हा एकदा ‘छावा’ या ऐतिहासिकपटात ही अभिनेता आणि दिग्दर्शकाची जोडी एकत्र दिसणार आहे.
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट लवकरच येणार असून या निमित्ताने विकी म्हणाला की, “छावा चित्रपटात मी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत असल्यामुळे मानसिक, शारिरिक ट्रेनिंग मी घेतलं आहे. कारण, इतकी ताकदवान भूमिका साकारण्यासाठी मला पुर्णपणे त्या भूमिकेत, व्यक्तिरेखेत स्वत:ला झोकून देऊन काम करणं फार गरजेचं होतं. आणि दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्यात एक वेगळीच उर्जा मिळते. कारण, दिग्दर्शक म्हणून लक्ष्मण आणि अभिनेता म्हणून माझाही हा पहिला ऐतिहासिकपट आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी तयार होण्यात, अभ्यासपुर्वक सादरीकरण करण्यात दिग्दर्शकांनी फार मदत केली”.
पुढे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्याबद्दल बोलताना विकी म्हणाला की, “लक्ष्मण फारच साधे आहेत. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातून ते मुंबईत आले आणि स्वत:ची गोष्ट त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून सांगितली आहे. दादरमधील शिवाजी पार्क येथे त्यांची वडापावची गाडी होती. आणि तिथपासून त्यांचा दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास उल्लेखनीय झाला आहे. त्यामुळे लक्ष्मण उत्तेकर जी सामान्य माणसं स्वत:च्या जीनवातील अनेक संघर्षांशी लढत असतात पण तरीही सुख शोधण्यासाठी चित्रपट पाहायला येतात अशा प्रेक्षकांसाठी खास ते चित्रपट बनवतात आणि म्हणूनच मला त्यांच्या चित्रपटांत काम करायला आवडतं”, अशी कबूली विकी कौशल याने दिली.