आसाममध्ये मुस्लीम विवाह, घटस्फोट नोंदणी कायदा रद्द
मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांची घोषणा बाल विवाहाविरोधात कठोर कारवाईंतर्गत निर्णय
19-Jul-2024
Total Views | 52
नवी दिल्ली : “आसाम सरकारने राज्य ‘मुस्लीम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा, 1935’ रद्द केले असून हे दोन्ही कायदे आता आसाम रिपीलिंग बिल 2024 द्वारे बदलले जातील,” अशी घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी गुरुवार, दि. 18 जुलै रोजी केली आहे.
मुख्यमंत्री सर्मा म्हणाले की, “राज्य सरकारने बालविवाहाविरुद्ध अतिरिक्त सुरक्षा उपाय करून राज्यातील भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आसाम मंत्रिमंडळाच्या बैठकीत आसाम निरसन विधेयक 2024 द्वारे “आसाम मुस्लीम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा 1935’ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.“
“आसाम मुस्लीम विवाह आणि घटस्फोट कायदा 1935’ आणि ‘आसाम मुस्लीम विवाह आणि घटस्फोट नोंदणी नियम 1935’ रद्द करणे, हा या कायद्याचा उद्देश आहे. येत्या पावसाळ्यात हे विधेयक आसाम विधानसभेत मांडले जाईल. आसाम मंत्रिमंडळाने राज्यात मुस्लीम विवाहांच्या नोंदणीसाठी कायदा आणण्याचे निर्देश दिले आहेत. या विषयावर विधानसभेतही चर्चा होणार आहे,” असेही मुख्यमंत्री सर्मा यांनी म्हटले आहे.